Logo

महाराष्ट्रात प्राचीन बौद्ध लेणी कोणकोणत्या गावात आहेत?

- 22/03/2023   Wednesday   12:08 pm
महाराष्ट्रात प्राचीन बौद्ध लेणी कोणकोणत्या गावात आहेत?

संपूर्ण भारतात सर्वाधिक लेण्या या महाराष्ट्रात आहेत. लेण्या, किल्ले, व भव्य मंदिरे ही वास्तुकलेतील आश्चर्य आहे आहेत. सर्वप्रथम लेणी निर्मिती होत गेली. एखाद्या डोंगराचा अखंड पाषाण खोदून त्यात विहारे, दालने, मंदिरे, मूर्त्या, कोनाडे, स्तंभ, नक्षीकाम, वेलबुट्ट्या कोरल्या जात. लेण्यांची निर्मिती सर्वप्रथम बौद्ध धर्मियांनी केली. बौद्ध भिक्षू,

धर्मप्रसारक, धर्मपंडित, तत्वज्ञ यांचा शिष्यपरिवार यांच्या निवासासाठी निवांत, निर्वेध, अध्ययन अध्यापनासाठी तत्कालीन धर्मप्रिय व विद्याप्रिय समर्थ शासकाने या लेण्यात तयार करून घेतल्या. बहुतांश लेण्या गौतम बुद्धाच्या महानिर्वाणानंतर निर्माण झाल्या. इसवीसनपूर्व पाचवे शतक ते इसवी सन पूर्व दुसरे शतक हाच बहुतेक लेण्यांचा निर्मिती काळ. बौद्ध लेण्यात मोठ मोठी विस्तीर्ण दालने,विहार, चैत्य, स्तूप, मंडप, बुद्ध मूर्ती, बुद्ध जीवनातील प्रसंग, जातक कथा कोरलेल्या असतात. शिवाय निर्माणकर्ता स्वनामाची, द्रव्य खर्चाची, दानशूर लोकांची नोंद असणारा शिलालेखही लेण्यात कोरून ठेवी. लेणीनिर्मिती हे अद्भुत आणि आश्चर्यकारक काम आहे. कात्रीने कागद कापावा इतक्या सहजपणे व बारकाईने पाषाण कोरलेला असतो. दोन दोन किलोमीटर डोंगरातील अखंड पाषाण कोरताना त्यात गोंधळ न होऊ देता व्यवस्थितपणा, सुबकपणा व सौंदर्यशिलता जपलेली असते. लेण्या खोदून निघालेली खडी, दगड, खपरे, चुरा यांचे व्यवस्थापन काय केले असावे हा ही विचाराचा भाग आहे. काही लेण्यात भिंतीच्या पृष्ठावर, छताच्या अंतर्गत पृष्ठावर, चौकोनी षटकोनी अष्टकोनी स्तंभांच्या पृष्ठावर बुद्ध जीवनातील प्रसंगाची सुंदर चित्रे काढून नैसर्गिक रंगाने रंगवलेली आहेत. हजारो वर्षांनंतरही काही लेण्यात ही चित्रे तितकीच टवटवीत आहेत मात्र काही लेण्यांत पुसट होत गेली आहेत. जगाच्या पाठीवरचा कोणत्याही देशाचा माणूस महाराष्ट्रातील लेण्या पाहून आश्चर्याने भारावून जातो. आधुनिक प्रगत तंत्रज्ञानालाही अशक्य वाटावे असे हे काम आहे. असे अद्भुत लेणी काम आमच्या महाराष्ट्रात आहे याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. महाराष्ट्रात ज्या लेण्या आहेत त्यापैकी काही लेण्या सुस्थितीत असून त्या प्रेक्षणीय आहेत. त्यांचे सौंदर्य व रेखीवपणा अबाधित आहे. तर बर्‍याच लेण्या काळाच्या ओघात नैसर्गिक व मानवी आघाताने क्षतिग्रस्त झालेल्या आहेत. ७५% हून अधिक पडझड झालेल्या लेण्याही अजूनही आवर्जून पहाव्यात अशाच आहेत. लेणी निर्मिती विशिष्ट हेतूने मानवी वस्तीपासून दूरच केली जाई. त्यामुळे महाराष्ट्रातील लेण्यांची ठिकाणे ही डोंगर-दऱ्यातून, झाडी जंगलातून वसलेली आहेत. महाराष्ट्रात बौद्ध लेण्या असलेली ठिकाणे अनेक आहेत. परंतु उल्लेखनीय, प्रेक्षणीय व सुस्थितीचा निकष लावता त्यांचा क्रम खालील प्रमाणे लावता येईल लेणीचे स्थान व मार्गावरची किंवा जवळच्या गावाचे नाव देण्याचा प्रयत्न केला आहे.

१. पितळखोरा लेणी - ही भारतातील सर्वात जुनी लेणी आहे. लेणी बरोबरच येथील स्तंभचित्रेही प्रेक्षणीय आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड पासून जवळच पंधरा ते वीस किलोमीटर ही लेणी आहे.

२. वेरूळ लेणी - औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद पासून तीस किलोमीटरवर ही लेणी आहे. लेण्या सुस्थितीत असून अत्यंत प्रेक्षणीय आहेत. यातील सोळावे कैलास लेणे हे जगप्रसिद्ध असून त्यातील शिल्पकाम अद्भुत व प्रेक्षणीय आहे.

३. अजिंठा लेणी - औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात औरंगाबाद पासून शंभर किलोमीटरवर ही लेणी आहे. येथील शिल्पकाम व भित्तिचित्रे अत्यंत प्रेक्षणीय आहेत. जगभरातील प्रवासी ही लेणी पाहण्यासाठी येतात.

४. नाशिक जवळील पाथर्डीची पांडवलेणी - ही लेणी नाशिक शहराजवळ असून सुस्थितीत व प्रेक्षणीय आहे.

५. कार्ले लेणी - कार्ले येथील लेणी व त्यातील चैत्यगृह अत्यंत प्रेक्षणीय आहे. या लेण्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात लोणावळ्यापासून जवळच आहेत.

६. कान्हेरी लेणी - मुंबईत बोरीवली जवळील एका बेटावर या लेण्या सुस्थितीत व प्रेक्षणीय आहेत.

७. भाजे लेणी - लोणावळ्या जवळच्या मळवली स्टेशनपासून जवळच असणाऱ्या डोंगरावर या लेण्या आहेत.

८. बेडसे लेणी - भाजे लेण्या जवळच आहे.९. कोंढाणे लेणी - लोणावळ्याजवळ राजमाची या ठिकाणी आहेत.

१०. जुन्नर परिसरातील लेणी - अ) लेण्याद्री लेणी समूह. हा जुन्नर पासून जवळच आहे. ब) मानमोडी लेणी क) अंबिका लेणी ड) आंबा लेणी ई) भूतलिंग लेणी फ) भीमाशंकर लेणी.

११. वाई लेणी - या लेण्या वाईजवळील लोणारा गावाजवळ आहेत.

१२. ठाणाळे लेणी - रायगड जिल्ह्यात पाली जवळ.

१३. कुडा लेणी - रायगड जिल्ह्यात रोह्याजवळ.

१४. गांधारपाले लेणी - रायगड जिल्ह्यात महाड जवळ.

१५. पांडवदरा लेणी - कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा जवळ.

१६. डोंगराई लेणी - सातारा जिल्ह्यात कराड जवळ.

१७. आगाशिव लेणी- सातारा जिल्ह्यात कराड-जाखीणवाडी जवळ.

१८. बिजासन लेणी - चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावाच्या टेकडीवर या लेण्या आहेत.

१९. पोहाले लेणी - या लेण्या कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याजवळ आहेत.वरील सर्व लेण्या बौद्ध लेण्या आहेत. हिंदू लेण्यात हिंदू देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या असतात. उदाहरणार्थ मुंबईजवळच्या घारापुरीची लेणी किंवा वेरुळचे कैलास लेणे परंतु काही दुर्लक्षित लेण्यात काही लोक हिंदू देवतांच्या मूर्ती किंवा शिवलिंगाची स्थापना करतात हे मूळ लेण्यावर केलेले अतिक्रमणच होईल. ते विसंगत व विरूप वाटते. काही लेण्यातून असे प्रकार झाले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने आपल्याजवळच्यातरी लेण्या पाहून घ्यायला पाहिजेत. परंतु लेण्या पाहताना गांभीर्य राखले पाहिजे. सहभोजनासाठी, नशा पाण्यासाठी, धिंगाणा घालण्यासाठी, छेडछाडीसाठी, फोटोंच्या खेचाखेचीसाठी, प्लास्टिक कचरा करण्यासाठी, मोडतोड करण्यासाठी, खिळ्याने खरवडून किंवा चुन्याने किंवा रंगाने नावे लिहिण्यासाठी,फाजिल जाहिराती करून लेण्या विद्रूप करण्यासाठी लेण्यांकडे फिरकू सुद्धा नये. त्यापेक्षा घरी बसलेले बरे ! या सर्वच लेण्या मी प्रत्यक्ष पाहिलेल्या नाहीत. बऱ्याच पाहिलेल्या आहेत. बऱ्याच लेण्यांची माहिती ही संदर्भ पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके यातून मिळविली आहे. काही चुका असण्याची शक्यता असते. ते समजून घ्यावे. जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।। हाच प्रमाणिक प्रयत्न !!

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: