Logo

विविधांगी मकर संक्रांती -हिरालाल पगडाल, संगमनेर

- 14/01/2022   Friday   7:27 pm
विविधांगी मकर संक्रांती -हिरालाल पगडाल, संगमनेर

सर्वांना मकर संक्रांती आणि भूगोल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

भारतात मकर संक्रांती हा एकमेव सण आहे, जो तिथी नुसार नव्हे तर तारखेनुसार साजरा करतात. सर्वसाधारणपणे हा सण १४जानेवारीला असतो .याही वर्षी तो १४ जानेवारीलाच आहे. परंतु २०१९ आणि  २०२० साली तो १५ जानेवारीला होता. आगामी दोन वर्षे म्हणजे २०२३ आणि २०२४ साली मकर संक्रांत १५ जानेवारीला आहे, आणि २०२५ साली पुन्हा १४ जानेवारीला मकरसंक्रांत असणार आहे. याचे कारण मकर संक्रांत हा सण सूर्याच्या भासमान भ्रमनावर अवलंबून आहे. ज्यादिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यादिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते.
     राज्य भूगोल मंडळाने १४ जानेवारी हा दिवस भूगोल दिन म्हणून जाहीर केला आहे, त्यामुळेच महाराष्ट्रात भूगोल प्रेमी हा दिवस भूगोल दिन म्हणून साजरा करतात.
   मकर संक्रांत हा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो पण त्याचे स्वरूप सर्वत्र वेगवेगळे आहे.
     महाराष्ट्रात देशावर या दिवशी घरोघर तीळ घालून गूळपोळ्या करतात. 'तिळगुळ घ्या गोड बोला' असे म्हणत समवयस्क एकमेकांना तिळगुळ देतात आणि अलिंगन देतात. तर वडीलधारी मंडळी लहानग्यांना तिळगुळ देतात आणि लहानगे त्यांच्या पाया पडतात . विवाहित स्त्रीया हळदीकुंकूचे कार्यक्रम करतात, वाण वाटतात. गहू,ऊसाचे तुकडे, हळकुंडे, कापूस इ.द्रव्य टाकून सुगडाचे दान करतात. नवीन सुनेला आणि लहान बाळाला हलव्याच्या दागिन्यांनी नटवतात. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच किंक्रांतला लहान बाळाला बोरन्हाण घालतात. बोर,गाजर,हरभरा, मुरमुरे, चॉकलेट, तिळगुळ इ.ने आठवा भरतात व त्याने आंघोळ घालतात. 
      कोकणात सुवासिनी स्रियां दुसऱ्याच्या घरच्या आघणात आपल्या घरचे तांदूळ नेऊन वैरतात. दुसऱ्याच्या घरी उंबरठ्याच्या आत खेळणा रांगणा म्हणून असोला नारळ सोडतात. कोकणात संक्रांतीला तळलेले पदार्थ करायचे नाहीत असा संकेत आहे. म्हणून कोकणात संक्रांतीला इडली व तिच्या जोडीला गुळ घालून नारळाचा रस हे पक्वान्न करतात.
      दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू मध्ये हा सण 'पोंगल' म्हणून साजरा करतात. पोंगल सण तीन दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी 'भोगी पोंगल' असतो. दुसऱ्या दिवशी 'सूर्य पोंगल' असतो. या दिवशी सुवासिनी स्रियां पहाटेच सुस्नान करून ओलेत्याने अंगणात दुधातली तांदळाची खीर शिजवतात ,खिरीला उकळी आली की, पोंगल पोंगल असे मोठ्या मोठयाने ओरडतात. खिरीचे जेवण झाल्यानंतर एकमेकांच्या घरी जातात,परस्परांना भेटी देतात. ग्रामदेवतेला,गाईला खिरीचा नैवेद्य देतात. तिसऱ्या दिवशी 'मुट्टू पोंगल' असतो, या दिवशी गायीची पूजा करतात, गाय, बैल  यांना स्नान घालून सजवतात, गोडधोड खाऊ घालतात, त्यांना मोकळे सोडतात, त्यांची मिरवणूक काढतात.
      उत्तरेत या दिवशी खिचडी बनवतात. भावजय आपल्या ननंदेला वस्त्र, फळ, मिष्टान्न, तीळ, डाळ, तांदूळ उपहार म्हणून पाठवते, त्याला सनक्रांत देना म्हणतात
      हिमालयाच्या सखल भागात या दिवशी पिठाचे पक्षी करून ते तुपात तळतात व लहान मुलांच्या गळ्यात बांधतात.दुसऱ्या दिवशी ते कावळ्यांना खाऊ घालतात.
      बंगालमध्ये या दिवशी काकवीत तीळ घालून 'तिळूवा' नावाचा पदार्थ तयार करून तो इष्टमित्रांना देतात. तांदळाच्या पिठात तुपसाखर मिसळून 'पिष्टक' नावाचे खाद्य तयार करतात व ते वाटतात.
     संकांतीचा सण हा स्नेह वर्धनाचा सण आहे.एकमेकांना तिळगूळ देऊन शुभचिंतन करण्याचा हा सण आहे.या निमित्ताने वैरभाव कमी होऊन सलोखा वाढवणे शक्य होते. जात,पात, धर्म, पंथ, गरीब, श्रीमंत असे भेद विसरून सामाजिक सलोखा ,राष्ट्रीय एकात्मता वाढवणारा हा सण आहे.
     *सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा*
       
        हिरालाल पगडाल, संगमनेर
         ९८५०१३०६२१

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: