Logo

काळाराम मंदिर प्रवेश चळवळीची ९२ वर्षे .....

- 02/03/2022   Wednesday   2:41 pm
काळाराम मंदिर प्रवेश चळवळीची  ९२ वर्षे .....

अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश चळवळीला आज ९२ वर्षे पूर्ण झाली आहेत. बाबासाहेबांच्या ह्या मंदिर प्रवेश चळवळी अगोदर ही, अस्पृश्यांचे मंदिर

प्रवेशासाठी आंदोलने,संघर्ष झाला आहे,ज्याला फारसे यश आले नाही. १८७४ मध्ये मद्रास राज्यात अस्पृश्यांनी मीनाक्षी मंदिरात प्रवेश करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १९२४ मध्ये पेरियार यांनी त्रावणकोर राज्यातील वायकोम येथे मंदिर प्रवेश आंदोलन सुरू केले. अमरावती मध्ये अंबा देवीच्या मंदिरात प्रवेशासाठी १९२८ ला सत्याग्रहाची सुरुवात झाली. परंतु त्यास फारसा पाठिंबा मिळू शकला नाही. या व्यतरिक्त पुण्यातील पार्वती मंदिर प्रवेशासाठी ऑक्टोंबर १९२९ मध्ये संघर्षाला सुरुवात झाली. 

खरंतर महाडच्या सत्याग्रहामुळे   बाबासाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यात एक चेतना निर्माण झाली, माणुसकीचे हक्क मिळविण्यासाठी साद घातल्यावर अस्पृश्यवर्ग धावून येतो याचीही प्रचिती आली होती, त्यामुळे नाशिक मंदिर प्रवेश करून श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव पाळता येणार नाही असा संदेश देऊन समतेची प्रतिष्ठापना कदाचित त्यांना करायची होती. 

सत्याग्रहाचा दिवस रविवार, २ मार्च १९३० ठरला, सकाळपासून लोकं जमली होती, बाबासाहेब सत्याग्रहीना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते, ते तुकाराम काळे यांच्या घरी उतरले. बाबासाहेबांचे कार्यकर्ते सभास्थानी हजर होते त्यात प्रामुख्याने दादासाहेब गायकवाड,तुकाराम काळे,पतीतपावन दास,सावळाराम दाणी,अमृतराव रणखांबे,संभाजी रोकडे,रंगनाथ भालेराव,के.बी.जाधव, डी.एन.पगारे, पुंजाजी नवसाजी जाधव, दिवाकर पगारे ,बापू शेजवळ ,वस्ताद रुपाजी पगारे ,शंकरदास बरवे, लिंबाजी भालेराव, विठ्ठलराव रणखांबे,बापूसाहेब गायकवाड,श्री.ढेंबे,बापूजी खंबाळेकर,सखाराम गंगाराम काळे पहिलवान (वस्ताद ), रामा पाला,आप्पा गायकवाड, जी.एन.पगारे,आर.आर.दाणी इत्यादि नाशिक जिल्ह्यांतील प्रमुख मंडळी हजर होती. तसेच संगमनेरचे पी.जे.रोहम , नंदुरबारचे श्री.लळीगकर,सुभेदार घाडगे ( पुणे ) त्याचप्रमाणे मुंबईचे भास्करराव कद्रेकर,देवराव नाईक,डी.व्ही.प्रधान, गं.नी . सहस्रबुद्धे, शिवतरकर , श्री.कवळी आदि प्रमुख मंडळी प्रामुख्याने हजर होती. बाबासाहेबांचे भाषण झाले, सूर्य माथ्यावर आला होता, आणि मोर्चा काळाराम मंदिराच्या दिशेने निघाला, मेनरोड वर मोर्चा येताच सनातन्यांची सूर्याच्या उन्हापेक्षा हा पंधरा हजारांचा जनसमुदाय पाहून आग-आग झाली, मंदिराजवळ मोर्चा आला परंतु मंदिराचे दरवाजे बंद केले होते,त्यांना कुलूप लावले होते, बंदूकधारी पोलिसांचा पहारा होता, नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर गार्डन साहेब होते, फौजदारापैकी नायर,कर्णिक आणि शेळके होते,इन्स्पेक्टर पारशी होते अनेक अधिकारी,मॅजिस्ट्रेट आणि मामलेदार होते, बाबासाहेब कलेक्टर गार्डन यांना म्हणाले,आमचा हा सत्याग्रह मानवी हक्क प्रस्थापित करण्यासाठी आहे,हा सत्याग्रह आम्ही अतिशय शांततेत करू,मात्र मंदिराचे दरवाजे जो पर्यंत बंद आहेत तो पर्यंत आम्ही मंदिराच्या चारही दरवाज्यांवर धरणे धरून बसू, दरवाज्यावर पंचवीस-पंचजविस जणांच्या तुकड्या ठेवून इतर सत्याग्रहिंचा मोर्चा रामकुंडावर गोदावरी नदीच्या पात्राकडे आला, अप्पा गायकवाड,दाणी,अहिर,जाधवआणि डांगळे यांनी रामकुंडाच्या पश्चिम बाजूला बसून रामकुंडाचे पाणी भरण्याचा बैठी सत्याग्रह केला होता,तेथे ओढा असून त्याच्या शेजारी आता गांधी स्मारक आहे,त्या सत्याग्रहीना सवर्ण हिंदूंकडून बरीच मारहाण झाली,सत्याग्रही छावण्याकडे निघाले तेव्हा यशवंतमहाराज घाटावर सवर्ण सत्याग्रहींवर दगडांचा मारा करीत होते, महिना झाला तरी सत्याग्रहिनी दरवाजावर बैठी सत्याग्रह सुरूच ठेवला, सनातन्यांची माथी भडकलेली होती, त्यांनी आपला रोष नाशिक जिल्ह्यातील खेडोपाडी वळवला, त्या हल्ल्यांत शिरस,पिंपळगांव,चेहली, चिंचोली,बाघाड,संसरी, धोंडवार,मोहाडी,टकावे, देवळेनगर,दारणा, सांगवी, पाथर्डी व नाशिक रोड प्रेसमधील महार कामगारांवर अत्याचार,मारपीट व छळ चालू झाला.सत्याग्रहांत भाग घेतलेल्या गावोगावच्या महारवाड्यांचें तेल, मीठ, पाणी बंद केलें व त्यांच्यावर संपूर्ण सामाजिक बहिष्कार टाकला.

एक बातमी आली की, उत्तरेकडील दरवाज्याच्या बाजूने एका माणसाच्या घराच्या वाटेने सनातनी,पुजारी,यात्रेकरू मंदिर प्रवेश करीत आहेत, हे कळताच सत्याग्रहीनी आपला मोर्चा तेथे वळवला, तितक्यात डीएसपी तेथे पोहचले व सत्याग्रहिना अटक केली,त्यात प्रामुख्याने दादासाहेब गायकवाड यांच्या घरातील पुरुषांना व महिलांना अटक झाली,दादासाहेब गायकवाड,रनखांबे,दाणी,साळवी यांना अटक झाली, लागलीच बाबासाहेब महाड चवदार तळ्याचा खटला चालवून नाशिककडे घाईघाईने रवाना झाले.

रामनवमी जवळ आली,शेवटी बाबासाहेबांच्या विचाराने आणि गावच्या मंडळींच्या सल्याने एक करार झाला की, रथ दोघांनी मिळून ओढायचा, पण अस्पृश्य आपल्या जोडीने रथ ओढणार म्हणून सनातन्यांची माथी भडकली होती, त्यामुळेच त्यांनी झालेला करार पाळला नाही, सत्याग्रहीना सोडून त्यांनी रथ पळवत पटांगणात आणला,रथ ओढण्यासाठी सत्याग्रहीनी आपल्यातीलच काही पहिलवानांची नेमणूक केली होती,ते रथावर धावून गेले,दोराला हात घातले त्याचक्षणी सनातनी, सत्याग्रहिना धक्काबुक्की करू लागले, सत्याग्रहिनी जोर धरून रथ पुढे ओढला, सनातन्याकडून दगडांचा वर्षाव होऊ लागला,लाठ्या सज्ज झाल्या,खरतर सनातन्यांच्या रोख वेगळाच होता,बाबासाहेबांच्या जीवाला घात करण्याची त्यांची पावले पडू लागली,ही गोष्ट सत्याग्रहिनी ओळखली, ते बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब आम्ही हा माणुसकीचा लढा लढऊ, पण आपल्या जीवाला काही होता कामा नये,आपण सुरक्षित ठिकाणी जावे, पण बाबासाहेब सत्याग्रहीना म्हणाले,ह्या साऱ्या सत्याग्रही सैनिकांना रणात सोडून मी एकटा कदापि जाणार नाही,जे साऱ्या सत्याग्रहींचे होईल तेच माझे होईल,त्यात माझा प्राण गेला तरी मला त्याची पर्वा नाही, पण मला तुम्ही असला सल्ला देऊ नका, खरा सेनापती कधीही रणांगण सोडून जात नाही. बाबासाहेबांचे उदगार ऐकून सत्याग्रही अजून जोमाने रथ ओढू लागले, दगडांचा आणि लाठ्यांचा वर्षाव होतच होता, सनातनी बाबासाहेबांच्या दिशेने दगडी भिरकावीत होते,भास्करराव कद्रेकर यांनी बाबासाहेबांच्या  डोक्यावर छत्री धरली होती, भास्कररावांचे डोके दगडाने फुटले तरीही त्यांनी बाबासाहेबांच्या डोक्यावरची छत्री बाजूला घेतली नाही. पोलिसांचा हस्तक्षेप झाला आणि रथ कर्टुला भागातील पटांगणावर पडून राहिला. १९३० पासुन सुरू झालेला हा सत्याग्रह १९३४-३५ पर्यंत सुरू राहिला, कदाचित जगात हिंदू धर्म हा एकच धर्म असा असावा जो स्वधर्मीय लोकांना इतक्या मोठ्या संख्येने मंदिर प्रवेश नाकारतो.

दादासाहेब गायकवाड ह्या सत्याग्रह कमिटीचे सेक्रेटरी होते,त्या नात्याने त्यांनी बाबासाहेबाना पत्र पाठवले,त्या पत्राच्या आधाराने मंदिर प्रवेश सत्याग्रहाचे उद्दिष्ट स्पष्ट करणारे सडेतोड निवेदन पत्र बाबासाहेबानी मुंबई प्रांताच्या गव्हर्नरला पाठवले होते. बाबासाहेबानी गव्हर्नर यांना दुसरे निवेदन पाठवले त्यात ठळक विषय होते ते, १) दंगलीचे मूळ २) अस्पृश्य मंडळींवरील संकट ३) पोलिसांची वृत्ती आणि ४) डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचे धोरण. यातील "पोलिसांची वृत्ती" बद्दल बाबासाहेब त्यावेळी काय म्हणाले हे इथे आवर्जून द्यावेशे वाटते, बाबासाहेब म्हणतात,"या परिस्थितीत माझी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कांही तक्रार आहे असे मत बनवावयाचें नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावलें असेंच मी म्हणेन. विशेषत: या आणीबाणीच्या प्रसंगांत पोलीस इन्स्पेक्टर्स मि.शेळके, मि.नगरकर ,मि.कराका यांनी प्रसंशनीय कामगिरी केली. माझी तक्रार आहे ती स्पृश्य हिंदु पोलिसांच्या विरुद्ध आहे. कारण त्यांनी उघडपणे स्पृश्यमंडळींची बाजू घेऊन अमानुषपणे अस्पृश्यांवर हल्ला केला आणि आपला अस्पृश्यांबद्दलचा द्वेष प्रकट केला, त्या पोलिसांची नांवनिशीवार माहिती त्यांच्या वरिष्ठांकडे दाखल करीन. त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाखाली इलाज करण्याचा आपण आदेश द्याल असा मला विश्वास वाटतो". बाबासाहेबानी हे किती परखड आणि निडरपणे मांडले आहे आज ही आपल्याला खैरलांजी असो अथवा भीमाकोरेगाव चा भ्याड हल्ला असो वा रमाबाई नगरचा बेछूट गोळीबार असो वा हत्याकांड असो काही अपवाद वगळता पोलिसांच्या ह्या जातीय वृत्तीचा अनुभव आजही काळाराम सत्याग्रहावेळी झाल्या इतकाच ताजा आहे. 

आज काळाराम मंदिर सत्याग्रहाला ९२ वर्षे पूर्ण झाली तरी, त्या तथाकथित उच्चवर्णीय मानसिकतेत काही बदल झाला असे वाटते का? आजही दलितांना मंदिर प्रवेश निषिद्ध असे फलक मंदिरात दिसतात, लहान मुलगा खेळताना मंदिरात गेला म्हणून तप्त उन्हात त्याला नग्न बसवलं जातं, धिंड काढली जाते,दंड ठोठावला जातो किंवा संपूर्ण समाजाला वाळीत टाकलं जातं, त्यांच्याशी व्यवहार बंद केला जातो. ही झाली सनातन्यांची मानसिकता पण ह्या ९२ वर्षात काहीएक अपवाद सोडता एक चित्र बदललं की, डिप्रेस क्लास आज त्यांच्या अधिकारांबाबत जागृत आहे, आपल्या हक्कासाठी संघर्ष करण्यास तो तयार आहे,तेव्हा बाबासाहेबांचा मंदिर प्रवेश हेतू साध्य झाला असे म्हणण्यास हरकत नाही, ज्यावेळी समस्त डिप्रेस क्लासला कळेल की, मंदिरात आपले भविष्य नसून शिक्षण,रोजगार आणि नवनवीन संधीत आहे, मंदिरात दान केलेला पैसा हा आपल्याच विरोधात वापरला जातो त्यामुळे अशा मंदिरात देणग्या,वर्गणी देणे म्हणजे आपणच आपल्या चितेचा सरण सजवण्यासारखे आहे, बाबासाहेबानी जवळजवळ सहा वर्षे हा मंदिर सत्याग्रह केला पण सनातनी,सवर्णांच्या हृदयाला पाझर फुटला नाही, आजही जेव्हा देशाच्या राष्ट्रपतीना दलित असल्या कारणाने मंदिरात प्रवेश नाकारला जातो, तेव्हा तथाकथित उच्च जातीच्या लोकांचे हृदय परिवर्तन होईल का? असे अजून आपल्याला वाटते????????? काही स्वयंघोषित फेसबुक लेखक,अभ्यासक म्हणतात की बाबासाहेबानी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा कालबाह्य झाल्या आहेत,त्या प्रतिज्ञा म्हणजे कट्टरवाद आहे,तर अशा नर्मदेतील गुळगुळीत गोट्यांना सांगू इच्छितो की, बावीस प्रतिज्ञा हा कट्टरवाद नसून त्या मंदिर प्रवेश नाकारणाऱ्या,संपूर्ण गावाला वाळीत टाकणाऱ्या, धिंड काढणाऱ्या व जीवे मारणाऱ्या लोकांच्या मानसिकतेपासून दिलेले "सरंक्षण कवच" आहे हे जेव्हा कळेल तो सुदिन असेल. 

बाबासाहेबांसोबत पंधरा हजार लोकं काळाराम मंदिर सत्याग्रहात सामील झाले, त्यातील काहींचे उत्तरार्धातील फोटो मिळाले जे बाबासाहेबांसोबत ह्या सत्याग्रहात बरोबरीने होते,ह्यात महिलांचा विशेष समावेश होता, त्यातील शोधलेले निवडक फोटो खाली देत आहे, ज्यांनी बाबासाहेबांसारख्या सेनापतीच्या नेतृत्वात मानवतेचा लढा लढला त्या सर्व बहादूर सत्याग्रहीना मानाचा जयभिम....

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: