Logo

सम्राट अशोक जयंती साजरी करूया - बौद्ध परंपरा रूढ करूया!

- 29/03/2023   Wednesday   7:44 am
सम्राट अशोक जयंती साजरी करूया - बौद्ध परंपरा रूढ करूया!

२९ मार्चला प्रियदर्शी सम्राट अशोक यांची जयंती आपण साजरी करीत आहोत. बौध्द म्हणून प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की आपण सम्राट अशोक यांचे स्मरण करावे, त्यांचा जन्मोत्सव थाटात साजरा करावा. त्यांचा दडलेला इतिहास लोकांसमोर आणावा, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करावी. याबाबत ठरवून काही समाजोपयोगी कृतीकार्यक्रम घ्यावेत. या उद्देशाने सम्राट अशोक यांच्या बाबतचा हा लेख.

अनेकांच्या मतानुसार, सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते. सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासात सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते.

धम्माराखित, धर्माराजिका, धम्माराजिका, धम्मारज्ञ, चक्रवर्तीं, सम्राट, राज्ञश्रेष्ठ, मगधराज, देवानामप्रिय, प्रियदर्शी, भूपतिं, मौर्यराजा, धर्माशोक, धम्मशोक, असोक्वाध्हन, अशोकवर्धन, प्रजापिता, धम्मानायक, धर्मनायक, अशोक महान अशा विविध नावांनी सम्राट अशोक भारतीय इतिहासात ओळखले जातात.


*सम्राट अशोकांचे कार्य*


चक्रवर्ती सम्राट अशोक (जन्म इ.स.पू. ३०४ -मृत्यू इ.स.पू. २३२) हे मौर्य घराण्यातील महान व प्रसिद्ध सम्राट होते. त्यांनी अखंड भारतावर इ.स.पू. २७२ - इ.स.पू. २३२ दरम्यान राज्य केले. हा भारतीय समाजातील सर्वात महत्वाचा लोककल्याणकारी राजा ज्याने अर्धा आशिया खंड काबीज केला होता. आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला.

बौद्ध धम्म संस्कृती आणि साहित्य कलेच्या बाबतीत अभ्यास करताना सम्राट अशोकाच्या कारकीर्दीचा अभ्यास आणि संशोधन करणे फार अत्यावश्यक ठरते. सम्राट अशोक यांनी कलिंगाच्या युद्धातील मानवी हत्या आणि रक्तपात पाहून विरक्त चित्ताने गौतम बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला आणि प्रज्ञा करुणा शील संवर्धनासाठी नैतिक स्वरूपाच्या राजाज्ञा आणि धम्मज्ञान शिलालेखांच्या स्वरूपात कोरून सार्वजनिक स्थळी उभारल्या. आपली कन्या संघमित्रा आणि पुत्र महेंद्रला सिलोनला पाठवून धर्मग्रंथ आणि बुद्ध शिकवणीचा धम्माचा प्रचार आणि प्रसार जगभर केला. सार्वजनिक धर्मशाला, पाठशाला, विहार संघ, आराम स्तूप आणि लेण्यांची निर्मिती करण्यासाठी येथील लोककलावंतांना, बुद्धिवंतांना, महाथेरो, भदन्त, भिक्खू आणि श्रामणेर यांना प्रेरणा दिली. अशोकाच्या अशा लोककल्याणकारी कार्यातून नालंदा, तक्षशिला सारख्या जागतिक पातळीवरील विश्वविद्यालय/विद्यापीठांची निर्मिती करण्यासाठी प्रेरणा मिळाली. नालंदा आणि तक्षशिला येथील विश्वविद्यालयातील विद्वानांनी विविध ज्ञानशाखांचे अध्ययन करून ज्ञानोपासना केली. बुद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आणि अध्ययन करण्यासाठी बौद्ध पंडितांना, भिख्खूना निवांतपणे आपल्या विद्याशाखेत अध्ययन करता यावे म्हणून बौद्ध लेण्यांची निर्मिती करण्यासाठी प्रेरणा दिली. सम्राट अशोकाच्या या लोकहित आणि कल्याणकारी कार्यापासून स्फूर्ती घेऊन पुढे मौर्यकाळात आणि त्यानंतरच्या काळातील अनेक राजे, महाराजांनी, धनवंतांनी या देशातील आपल्या साम्राज्यातील, राज्यातील प्रदेशातील बौद्ध धम्म प्रचार-प्रसार करण्यासाठी भव्य मंदिरे, शाळा, धर्म पाणवठे, मठांची आणि लेण्यांची निर्मिती केली.


*विचारवंतांची/विद्वानांची मते*


"काही बाबतीत चक्रवर्ती सम्राट अशोकांची तुलना अलेक्झांडर द ग्रेट, ऑगस्टस सीझर, चेंगीजखान, तैमूर, रशियाचा पहिला पीटर किंवा पहिला नेपोलियन यांच्याशी केली जाऊ शकते; पण अलेक्झांडरसारखा अशोक अति-महत्त्वाकांक्षी नव्हता. ऑगस्टस सीझरसारखा तो एक आदर्श शासनकर्ता होता; आपण हुकूमशहा म्हणून ओळखलं जावं असं जे सीझरला वाटायचं तसं अशोकाला कधीच वाटलं नाही. आपली तशी ओळख व्हावी अशी त्याची कधीच इच्छा नव्हती. अशोक एक सामर्थ्यवान सेनापती होता; पण आपल्या पराक्रमाबद्दल, विजयाबद्दल पहिला नेपोलियन जसा सदैव असंतुष्ट असायचा तसं अशोकाच्या बाबतीत नव्हतं. प्रजाजनांनी आपल्यावर प्रेम करावं, असं त्याला मनापासून वाटत असे. चेंगीसखान, तैमूर आणि रशियाच्या पहिल्या पीटरने त्यांच्या प्रजेवर जशी दहशत बसवली होती, तशी दहशत सम्राट अशोकने कधीच बसवली नाही. मनाचा मोठेपणा किंवा उमदेपणा, मनातला शुद्ध भाव, स्वभावातला प्रामाणिकपणा, स्वत:च्या प्रतिष्ठेबद्दलची किंवा मानमरातबाबद्दलच्या स्पष्ट स्वच्छ कल्पना आणि मनातलं सर्वांबद्दलचं प्रेम या अशोकाच्या, इतरांपेक्षा वेगळेपणाने जाणवणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे त्याला गौतम बुद्धांच्या किंवा येशू ख्रिस्ताच्या पंक्तीत नेऊन बसवले होते."

-माधव कोंडविलकर (ग्रंथ- 'देवांचा प्रिय राजा प्रियदर्शी सम्राट अशोक')


"भारताच्या इतिहासात एकच असा 'एकमेव' म्हणण्यासारखा कालखंड आहे, जो स्वातंत्र्याचा काळ, अतिशय महत्त्वाचा काळ आणि वैभवाचा काळ म्हणता येईल आणि तो काळ म्हणजे मौर्य सम्राट अशोकांच्या राज्यकारभाराचा काळ होय.

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर (ग्रंथ -ॲनिहिलेशन ऑफ कास्ट)

“जगाच्या इतिहासात असे हजारो राजे आणि सम्राट होऊन गेले जे स्वत:ला 'हिज हायनेस', 'हिज मॅजेस्टीज', 'हिज एक्झॉल्टेड मॅजेस्टीज' अशा त्यांचे उच्चपद दर्शवणाऱ्या इतर अनेक पदव्या लावून घेत असत. हे सगळेजण काही काळापुरते प्रसिद्ध झाले आणि मग झटकन विस्मृतीतही गेले; पण सम्राट अशोक! ते मात्र एखाद्या तेजस्वी ताऱ्यासारखे सतत तळपतच राहिले आहे, अगदी आजपर्यंत."

-एच्.जी. वेल्स (ग्रंथ - आऊलटाईट ऑफ हिस्टरी)

"इतिहासातल्या पानापानांवर हजारो राजांच्या नावांची अक्षरश: गर्दी झाली आहे; पण त्या गर्दीमध्येही सम्राट अशोकांचे नाव झळकत असलेले दिसते. खरं तर त्यांचे एकट्याचेच नाव एखाद्या ताऱ्यासारखे चमकते आहे."

-ब्रिटीश इतिहासतज्ज्ञ एच्.जी. वेल्स

"आजपर्यंत होऊन गेलेले सम्राट आणि इतर प्रभावशाली व्यक्तींमध्ये सम्राट अशोक हे नक्कीच असे एकमेव सम्राट होते, ज्यांनी युद्ध जिंकल्यानंतर असा निश्चय केला होता की, भविष्यात एकाही शत्रूशी परत युद्ध करायचे नाही."

- पंडित जवाहरलाल नेहरू (ग्रंथ- द डिस्कव्हरी ऑफ इंडिया)

"सम्राट अशोक हे इतिहासातील असे एक महान बादशाह होते, ज्यांची सत्ता अफगाणिस्तानपासून मद्रासपर्यंत अशी प्रचंड मोठी होती आणि तरीही ते असे वेगळेच बादशहा होते, जे उत्तम लढवय्ये असूनही, ज्यांनी कलिंग देशावर विजय मिळवल्यानंतर, युद्ध करणं पूर्णपणे बंदच करून टाकलं होतं. ख्रिस्तपूर्व २५५ मध्ये, मद्रासच्या पूर्व किनाऱ्यावर असणाऱ्या कलिंग देशावर त्यांनी आक्रमण केले, तेव्हा भारतीय द्वीपकल्पाचा अगदी शेवटच्या टोकापर्यंतचा सगळा भाग जिंकून घ्यायचा, हाच कदाचित त्यांचा हेतू होता. ही त्यांची मोहिम फत्ते झाली; पण त्या युद्धातील क्रुरपणा आणि भयानकपणा पाहून अशोकांच्या मनात युद्धाबद्दल आत्यंतिक तिरस्कार, कमालीचा तिटकारा निर्माण झाला. अजूनही उपलब्ध असलेल्या त्यांच्या काही शिलालेखांवरून असे दिसते की, त्या युद्धानंतर त्यांनी असे जाहीरच करून टाकले की, त्यापुढे ते कधीही युद्ध करून इतरांवर विजय मिळवणार नाही, तर धम्माच्या मार्गाने जाऊन इतरांची मने जिंकून घेईल आणि खरोखरच तिथून पुढचं सगळं आयुष्य त्यांनी बौद्ध धर्माचा जगभर प्रसार करण्यातच व्यतीत केलं. त्यानंतर त्यांच्या अवाढव्य साम्राज्यावर त्यांनी अतिशय शांततेने आणि कर्तृत्व पणाला लावून राज्य केले. तरी ते नुसचेच धर्मवेडे नव्हते. लोकांच्या खऱ्या गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी सम्राट अशोक अठ्ठावीस वर्षे अगदी मनापासून आणि समजूतदारपणे झटले. इतिहासाच्या पानांपानावर ज्यांच्या नावांची अक्षरश: गर्दी झाली आहे, ज्यांच्या वैभवाची, ऐश्वर्याची, दयाळूपणाची प्रसन्न व्यक्तिमत्त्वांची, त्यांच्या राजेशाही बिरूदांची आणि अनेक गोष्टींची रकाने भरभरून माहिती दिलेली आहे, अशा हजारों राजांमधल्या निवडक दहा राजांमध्येसुद्धा सम्राट अशोकाचं नाव तळपळतच राहिलं आहे, बहुधा त्यांचं एकट्याचंच नाव एखाद्या तेज:पुंज लक्षवेधी ताऱ्यासारखं चमकत राहिलं आहे. व्होल्यापासून थेट जपानपर्यंत अजूनही त्यांचं नाव आदराने घेतले जातं. चीन, तिबेट आणि अगदी भारतातसुद्धा अजूनही त्यांचे महत्त्व मानले जाते. आत्ता हयात असणाऱ्या बऱ्याच लोकांनी, कॉन्स्टेंटाईन किंवा चार्लेमॅन यांची नावेही कदाचित ऐकली नसतील; पण सम्राट अशोकांच्या आठवणी मात्र त्यांच्या मनात अजूनही आहेत."

 -एच्. जी. वेल्स (ग्रंथ- 'द आऊटलाईन ऑफ हिस्टरी')


"अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की, एखाद्या देशातले सगळेच लोक जर अहिंसेने वागत असतील, तर त्या देशाचे संरक्षण कसे केले जाईल? अशा काल्पनिक प्रश्नाचं उत्तर देणं खरं तर जरासं अवघडही आहे; पण ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात, एका सम्राटाने, 'अहिंसा आणि अनुकंपा' या तत्त्वांचा अवलंब करून भारतावर राज्य केले होते. त्यांचे नाव सम्राट अशोक- शांती आणि सामाजिक न्याय यांचा सम्राट. जुलूम-जबरदस्ती करून, स्वत:च्या ऐषारामासाठी सुख-समाधानासाठीच फक्त तजवीज करून किंवा स्वत:चा डामडौल मिरवत त्यांनी राज्य केले नाही तर स्वत:च्या ऐहिक सुखोपभोगांचा त्याग करत आणि स्वत:च्या प्रजेला समानतेने आणि न्यायाने वागवत त्यांनी राज्यकारभार पाहिला. आत्ताच्या जगात शांती, न्याय आणि एकोपा प्रस्थापित करण्यासाठी, आत्ताचे राज्यकर्ते, प्रशासक, राजकारणी लोक, मुलकी कर्मचारी, धार्मिक नेते आणि सर्वसामान्य लोक, या सर्वांनाच सम्राट अशोकांचे हे आदर्श असे उदाहरण मार्गदर्शक ठरू शकेल."

-दुली चंद्र जैन आणि सुनीता जैन (ग्रंथ- 'अशोका एम्परर ऑर मॉन्क')

"सम्राट अशोक हे शांततेसाठी वाहून घेतलेला महामानव होते आणि इतिहासात ते असे एकमेव सम्राट होऊन गेले, ज्यांनी कलिंगच्या लढाईत विजय मिळवल्यानंतर पुन्हा कुठलेच युद्ध न करण्याचा निर्धार केला होता. स्वत:चं उरलेलं पूर्ण आयुष्य फक्त आपल्या प्रजेच्याच नाही तर तमाम मानवजातीच्या सेवेसाठी वाहून घेतलं होतं. या सेवाव्रतात दिसलेला त्यांचा दानशूरपणा, उपकारबुद्धी, मनाचा मोठेपणा आणि दिलदार वृत्ती, संपूर्ण इतिहासात अगदी अभावानेच दिसून येते. भारतीय इतिहासात सम्राट अशोकांनी खरोखरच एक सवर्णकाळ निर्माण करून दाखवला."

-डॉ. कीर्तीसिंघे


*सम्राट अशोक यांची अनुकंपा*


अशोकाने कलिंगचे युद्ध पार पडल्यानंतर जिंकलेल्या रणांगणाची व शहरांची पहाणी करायची ठरवली, व त्यावेळेस त्याने फक्त सर्वत्र पडलेले प्रेतांचे ढीग, सडण्याचा दुर्गंध, जळलेली शेती, घरे व मालमत्ता पाहिली. ते पाहून अशोकाचे मन उदास झाले व यासाठीच का मी हे युद्ध जिंकले, व हा विजय नाही तर पराजय आहे, असे म्हणून स्वतःला त्या प्रचंड विनाशाचे कारण मानले. हा पराक्रम आहे की दंगल, आणि बायका मुले व इतर अबलांच्या हत्या कशासाठी व यात कसला प्रराक्रम असे स्वतःलाच प्रश्न विचारले. एका राज्याची श्रीमंती वाढवण्यासाठी दुसऱ्या राज्याचे अस्तित्वच हिरावून घ्यायचे? ह्या विनाशकारी युद्धानंतर शांती, अहिंसा, प्रेम, दया ही मूलभूत तत्त्वे असलेला बौद्ध धर्मीयांचा मार्ग अशोकाने अवलंबायचे ठरवले. त्याने स्वतः बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणूनही काम करायचे ठरवले. यानंतर अशोकाने केलेले कार्य त्याला इतर कोणत्याही महान सम्राटांपेक्षा वेगळे ठरवतात. ज्यात क्रूरकर्मा राज्यकर्त्याचे महान दयाळू सम्राटात रूपांतर झाले. अशी कलिंगचे युद्ध ही इतिहासातील एक अतिशय वेगळी घटना समजली जाते. बौद्ध धर्माचा जगभर झालेल्या प्रसारास खूप मोठ्या प्रमाणावर अशोकाने केलेले कार्य जबाबदार होते असे बहुतेक इतिहासकार मानतात. अशोकाने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलावली होती बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवले अग्नेय अशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्ये त्याने धर्मप्रसारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले, त्याचप्रमाणे अशोकाने अनेक सोयी निर्माण करण्यावर भर दिला उदा. माणसांना तसेच पशूंना मोफत औषध उपचार मिळावे याची त्यांनी सोय केली होती, अनेक नवे रस्ते बांधले, प्रवासामध्ये लोकांना सावली मिळावी यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली, नव्या धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या अशा प्रकारे त्याने अनेक लोकोपयोगी आणि कल्याणकारी कार्य केलं होतं. त्याचप्रमाणे बौद्ध धर्माचा मोठा प्रसार आणि प्रचार करण्याचे कामही अशोकानी केले.

१९७१ साली सम्राट अशोकांचा एक लघु शिलालेख मध्य प्रदेशातील पांगुरारीया (प्रत्यक्षात नक्तितालाई) या खेड्याजवळ सापडला. या शिलालेखातील मजकुराचे योग्य भाषांतर जर्मनीतील प्रा. हॅरी फाल्क यांनी केल्यानंतर वरील समजुतीला छेद मिळाला असून *सम्राट अशोक तरुणपणापासूनच बौद्ध विचारधारा मानणारा होता हे सिद्ध झाले आहे.* राजकुमार अशोक उज्जैन प्रांताचा अधिकारी असताना आपल्या मैत्रिणीसोबत (नक्तितालाई) येथे सहलीला आला होता असे या शिलालेखात लिहिलले आढळले आहे. या ठिकाणी बौद्ध भिक्षु संघाचे वास्तव्य होते याचे अनेक पुरावे आजही येथे पहायला मिळतात.


*लोकोपयोगी राज्यकारभाराचे महामेरू*


वैशाली (बिहार) येथील अशोक स्तंभ पांगुरारीया (नक्तितालाई) शिलालेखाचा छाप

अशोकाच्या ह्या कार्यात त्याला विदिशाकुमारी देवीपासून झालेल्या मुलांची मोठी मदत झाली. अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा ह्यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जाऊन तेथील राजाला बौद्ध धर्माची शिकवण दिली यामुळे भारतापुरते मर्यादित राहिलेला हा धर्म भारताबाहेर पसरण्यास सुरूवात झाली. असे मानतात की अशोकाने बौद्धधर्मीयांसाठी हजारो स्तूपांची व विहारांची निर्मिती केली. त्यांतील काही स्तूपांचे अवशेष आजही पहावयास मिळतात. यातील मध्यप्रदेशात सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे, हा स्तूप अशोकाने बांधला असे मानतात. अशोकाने आपल्या कारकीर्दीतील पुढील वर्षांमध्ये अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले, जंगलामध्ये चैनीसाठी होणारी प्राण्यांची शिकारीवर बंदी आणली, प्राण्यांवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारची हिंसकतेवरही बंदी आणली तसेच शाकाहाराला प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षा मिळालेल्या कैद्यांना अशोकाने सहिष्णूपणे वागवले. गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे तसेच, शेतकऱ्यांसाठी पाण्याचे कालवे बांधले. त्याच्या राज्यात सर्व प्रकारच्या जातिधर्माच्या लोकांना सहिष्णुरीत्या वागवले जाई. अशोकाने आपले एकेकाळी ज्याच्यांशी युद्धे केली त्यांच्याशीही मैत्रिपूर्ण संबध वाढवले. सम्राट अशोकाने अनेक समाजोपयोगी कार्ये केली.

अशोकाने आपल्या कारकीर्दीत राज्यात अनेक रुग्णालये व महामार्गाचे जाळे निर्माण केले, रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड ही अशोकाचीच कल्पना आहे, असे मानतात. आपण सम्राट असल्याच्या अधिकाराचा फायदा त्याने समाजोपयोगी कार्यासाठी केला. त्यानंतर अशोकाला धम्मअशोक असे म्हणू लागले. अशोकाने धम्माची प्रमुख आचारतत्त्वे विशद केली, अहिंसा, सर्व जातिधर्मांबद्दल सहिष्णुता, वडिलधाऱ्या माणसांना मान देणे, संतांना, शिक्षकांना योग्य तो मान देणे, दासांना माणुसकीने वागवणे. अशा आचारतत्त्वांना जगात कोणताही समाज नाकारू शकणार नाही.

अशोकांच्या इतिहासकारांनुसार त्यानी कलिंगाच्या युद्धानंतर कोणतेही प्रमुख युद्ध छेडले नाही परंतु त्यांना शेजारी राष्ट्रांशी ग्रीक राज्ये, चोळ साम्राज्य यांच्याशी नेहमी युद्धाची शक्यता वाटत होती. परंतु अशोकानी पूर्वायुष्यातील केलेल्या मोहिमांमुळे व मगधच्या सामर्थ्यामुळे बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्याच्या शेजारी राज्यांनी त्याला छेडण्याचे साहस केले नाही. अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले तरी मगधाचे सैनिकी सामर्थ्य अबाधित ठेवले. अशोकाला ग्रीक जगताची माहिती होती असे कळते. तसेच चंद्रगुप्त मौर्याने केलेल्या ग्रीकांविरुद्धच्या मोहिमांमुळे मौर्य साम्राज्याची कीर्ती ग्रीस, इजिप्तपर्यंत पोहोचली होती असे कळते.


*सम्राट अशोक यांची जयंती*


चैत्र शुक्ल अष्टमी रोजी दरवर्षी भारतामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोकांची जयंती साजरी केली जाते. बिहार सरकारने २०१६ मध्ये १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या दिवशीच 'अशोक जयंती' असल्याचा शोध घेऊन साजरी केली होती. ४ एप्रिल २०१७ मध्ये सम्राट अशोकांची २,३२१ वी जयंती साजरी करण्यात आली. त्यांचा जन्म इ.स.पू. ३०४, बिहार व निर्वाण (निधन) इ.स.पू. २३२ मध्ये झालेले आहे. बौद्ध धर्मीय हा सण मोठ्या उत्सात साजरा करतात. २०१७ मध्ये, सम्राट अशोकांची २,३२१ वी जयंती भारतभर साजरी करण्यात आलेली आहे. अशोकांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सम्राटांच्या कार्य व कतृत्वाविषयी माहिती दिली जाते. बिहार मध्ये अशोक जयंती महोत्सवात प्रमुख्य पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे उपस्थित होते.

राष्ट्रध्वजाच्या तीन रंगातील मध्यभागी अशोकचक्र आहे. ते चक्र अशोकचक्र म्हणून जरी ओळखले जाते. दुसरी महत्त्वपूर्ण ओळख म्हणजे आपल्या भारताची राजमुद्रा (राजचिन्ह) चार सिंहाधिष्ठित अशोकस्तंभ होय.

       सम्राट अशोक हा जम्बुद्वीपाचा अर्थातच भारत खंडाचा पहिला चक्रवर्ती सम्राट होय. अशोकाचे राज्य कंबोज, कंदहार म्हणजे वर्तमानातील पाकिस्तान, अफगाणिस्तान, बलुचिस्तानपर्यंत पसरलेले होते. वायव्य दिशेला योन, गंधार, पितनिक, आंध्र, कलिंग (आजचे ओडिसा), भोज, पुलिंद, ताम्रपर्णी (आजचे सिरीलंका) पर्यंत होते. सम्राट अशोकाच्या राज्याची सीमा मगध, पाटलीपुत्र, खलतिक पर्वत (बराबर टेकड्या) कोसंबी, लुम्बिनी गाम (तोसली, समापा व खपिंगल पर्वत किंवा जोगड पर्वत त्यांच्यासह) कलिंग अटवी (मध्य भारतातील जंगलाचा भाग) सुवर्णगिरी, इसिल, उज्जयिनी व तक्षशीलापर्यंत होती. (सम्राट अशोकाचा राज्यविस्तारासंबंधी प्राचीन भारताचा राजकीय इतिहास हेमचंद्र राॅय चौधरी पृ. ३१३ ते ३२१ जिज्ञासूंनी पहावा.) सम्राट अशोकाचे साम्राज्य खूप दूरवर पसरलेले होते. ब-याचशा लहान लहान राज्यांनी सम्राट अशोकाचे मांडलिकत्व पत्करले होते.

प्रा. डाॅ. दीपकराज कापडे सम्राट अशोक यांच्या विषयी दै. सम्राट मधील २४ मार्च २०१८ रोजीच्या लेखात लिहितांना म्हणतात,  "सम्राट आशोकाचे नाव उच्चारताच सर्वप्रथम आपला तिरंगी ध्वज  (राष्ट्रध्वज) डोळ्यासमोर येतो. राष्ट्रध्वजाच्या तीन रंगातील मध्यभागी अशोकचक्र आहे. ते चक्र अशोकचक्र म्हणून जरी ओळखले जात असले तरीही ते धम्मचक्र आहे. दुसरी महत्त्वपूर्ण ओळख म्हणजे आपल्या भारताची राजमुद्रा  (राजचिन्ह) चार सिंहाधिष्ठित अशोकस्तंभ होय. सारनाथ येथील शासकीय वस्तुसंग्रहालय येथे हा स्तंभ सुरक्षित आहे. या स्तंभाच्या माथ्याच्या बाजूला पालथ्या कमळाचा आकार दिलेला आहे. खांबावर एक वर्तुळाकार चिरेबंदी असून तिच्या चार बाजूस हत्ती, बैल, घोडा व हरिण कोरलेले आहे. तसेच प्रत्येक दोन प्राण्यांच्यामध्ये एक याप्रमाणे चार धम्मचक्र आहेत. या चिरेबंदीवर स्तंभशिर्ष म्हणून चारी दिशांना तोंड केलेले अजस्त्र आकाराचे चार सिंह पाठीकडून एकमेकांना चिकटून उभे आहेत. हे सर्व सिंह एकाच अखंड पाषाणातून कोरलेले आहेत. हेच अशोक चिन्ह सर्व संग्राहक प्रगतीशील व शांतताप्रिय, सर्वधर्म समावेश भारतीय गणराज्याची राजमुद्रा म्हणून ओळखले जाते. या अशोकस्तंभाप्रमाणेच ३०-४० स्तंभ सम्राट अशोकाच्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी उभारले होते. या स्तंभातील सुबकता, कोरीवता, घोटीवपणा, प्रमाणशीरता, जिवंतपणा, उदात्त कल्पकता आणि भव्यता आजही आदर्शवत आहे. सम्राट आशोकाचा अनेक उपाधींनी इतिहासामध्ये उल्लेख केलेला आढळून येतो. आपल्या पूर्जांप्रमाणे अशोकानेही 'देवांना प्रिय' हे बिरूद धारण केले. सामान्यतः तो स्वतःला 'देवांना प्रिय पियदसि' म्हणवीत असे. अशोक हे नाव फक्त साहित्यात व दोन प्राचीन शिलालेखात आढळते. ते असे-सम्राट अशोकाच्या मास्कि शिलालेख व महाक्षत्रप पहिल्या रुद्रदामनचा जुनागड शिलालेख. एका मध्ययुगीन शिलालेखात म्हणजे कुमारदेवीच्या सारनाथ शिलालेखात 'धर्माशोक' असे नाव आढळते. भारतातील इतर राजांच्या उपाधीपेक्षा ह्या उपाध्या अधिक विनम्र आहेत. काही ठिकाणी पूर्ण उपाधींचा उपयोग न करता निव्वळ 'देवानं पिय' असाच प्रयोग केलेला आढळतो. 'बराबर'च्या गुहेतील अभिलेखात फक्त 'पियदस्सि' असाच उल्लेख आढळतो. 'देवानंपिय' या संज्ञेचा शब्दशः अर्थ आहे देवांचा प्रिय. सिरीलंकेतील साहित्यात देवानपिय हा शब्दप्रयोग सम्राट अशोकासाठी नव्हे, तर त्याचा समकालीन सिरीलंकेचा राजा 'तिस्स'साठी उपयोगात आणला जात होता. सम्राट अशोकाच्या पूर्वजांमध्ये किंवा त्याच्या समकालीन राजांमध्ये कोणत्याही राजाला देवनंपिय या उपाधीने संबोधले जात नव्हते. परंतु सम्राट अशोकाच्या आठव्या शिलालेखात पूर्वकालीन देवानपियांचा उल्लेख केलेला आढळतो. सम्राट आशोकाला 'पियदसि' म्हणूनही अनेक ठिकाणी उपाधी दिल्याचे आढळून येते. 'पियदसि' याचा अर्थ आहे 'तो, ज्याची दृष्टी स्नेहपूर्ण आहे.' तसेच तो, ज्याचे व्यक्तिमत्व, मुख करुणामय आहे. असे म्हटले जाते की, सम्राट अशोक सिंहासनावर आरुढ झाल्यानंतर लोकांकडून हे नाव त्यास दिले गेले. कंदाहारातील अभिलेखात या उपाधीचा उल्लेख आढळतो. चक्रवर्ती-उपनिषदांच्या पूर्वी चक्रवर्ती हा शब्द वापरलेला दिसून येत नाही. सर्वप्रथम तो मैत्रायणी उपनिषदात असल्याचे आढळते. महाभारतात चक्रवर्ती म्हणजे प्रतापी राजा असा अर्थ आहे.

      परं चाभिप्रयातस्य चक्रं तस्य महात्मनः।

      भविष्यत्यप्रतिहतं सततं चक्रवर्तिनः ।। (१.७३.३०)

       सम्राट अशोकाला राजकीय लक्षणांमध्ये 'चक्रवर्तिन' हा शब्दप्रयोगही अनेकदा वापरात आलेला दिसून येतो. बौद्ध साहित्यात 'चक्रवर्तिन' चे विवरण करण्यात आलेले आहे. चक्रवर्तिन म्हणजे अशा सार्वभौम सम्राटाचे साम्राज्य की, ज्याने संपूर्ण जम्बुद्वीपावर राज्य केले. सम्राट आशोकाचे राज्य न्यायपूर्ण होते. तसेच त्याच्या राज्यात समृध्दी होती. तो इतका धर्मपारायण होता की, त्यामुळे त्यास देवतातुल्य मानले जात होते. सम्राट अशोकाच्या मनात व्यक्तिशः चक्रवर्ती होण्याची इच्छा असल्याचे दिसत नाही, तसेच असते तर तसा संदर्भ आढळून आला असता. चक्रवर्ती सम्राटाच्या शक्तीचे चक्र संपूर्ण जम्बुद्वीपाच्या साम्राज्यात फिरले होते. प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ रोमिला थापर या सम्राट अशोकाच्या संदर्भात 'अशोक और मौर्य साम्राज्य का पतन' या ग्रंथात म्हणतात - 'चक्रवर्तिन' की प्रतिमा के प्रतिक चिन्हों को सप्त रत्न कहा जाता था । सामान्यतः ये चक्र सार्वभौमिक शक्ति का प्रतिक, लक्ष्मी, सम्राज्ञी, युवराज, मंत्री, साम्राज्यिक गज और अश्व । अशोक के विचारों में सार्वभौमिक शक्ति की परिभाषा कहीं अधिक विनम्र और मानवतावादी रही होगी ।' (पृष्ठ  - २२७) सम्राट अशोक हा आपल्या साम्राज्यामध्ये स्वतःला महानिर्वाचित किंवा जनतेवर अधिराज्य करणारा राजा म्हणून वावरत नव्हता, तर तो स्वतःला पितातुल्य मानत असे. तो राजा आणि प्रजा यामध्ये पिता आणि त्याची लेकरे (संतान) अशाच प्रकारचा व्यवहार करीत होता. धोली येथील शिलालेखातील खालील पंक्ती त्याचे विचार अधिक सुस्पष्ट करताना दिसून येतात  -

       सब्बे मुनिस्से पजा ममा । अथा पजाए, इच्छा मि हक कींति सब्बेन हितसुखेन हिदलोकिक पाललोकिकेन युज्जेवू ति तथा... मुनिस्सेसु पि इच्छा मि हक...

       "सर्व प्रजा माझी संतान आहे, म्हणून मी इच्छा करितो की, माझी संतान या भूतलावर आणि परलोकात दोन्हीही ठिकाणी मंगल आणि सुखी होवोत. त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्रांसाठी सुखाची कामना करतो." कलिंग युद्धानंतर तथागत बुद्धांचा धम्म सम्राट अशोकाने स्वीकारला व आपल्या जीवनाच्या अखेरीपर्यंत तो तथागताच्या धम्मासाठीच कार्य करीत राहिला. सम्राट अशोकाने बुद्धधम्म प्रचारासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय, नियम व उपाययोजना केल्या होत्या. बौद्धतीर्थक्षेत्रांच्या पूजेचे महत्व, बौद्ध त्रिरत्नावर श्रद्धा व्यक्त करण्याची अपेक्षा, बौद्ध भिक्खूंच्या संघाशी निकटचा संबंध ठेवून त्यांच्यातील शिस्त, अनुशासन व एकात्मता राखण्याची महत्वपूर्ण कामे सम्राटाने केलीत. सम्राट आशोकाने आपली सांप्रदायिक श्रद्धा सर्वसामान्यांवर लादली नाही. परंतु नैतिकदृष्ट्या जे अयोग्य आहे, नीतीच्या मूलभूत तत्वांशी जो आचार-विचार, पद्धती विरोध करणा-या होत्या त्या अयोग्य, अनिष्ट आचारांचा नाश करण्याचा प्रयत्न त्याने जरुर केला. सम्राट अशोकाच्या मते नीती आणि सदाचार हेच सर्व धर्मांचे सार होते. सांप्रदायिक सिद्धांत व निष्फळ कर्मकांडाच्या आचरणावर निष्ठा ठेवता कामा नये, असे त्याचे विचार होते. सम्राट अशोकाने आपल्या प्रजाजनासाठी अत्यंत सुलभ असा वारसा सांगितला. त्या संदर्भात इतिहास संशोधक हेमचंद्र राॅय चौधरी हे वारसा हक्काबाबत सांगतात- 'आई, वडील व वडीलधारी या विषयी आज्ञाधारकच राहिले पाहिजे. सजीव प्राण्याबाबत (दयाबुद्धीचा) ठामपणा दर्शविला पाहिजे. सत्यच बोलले पाहिजे. ह्याच सर्व नैतिक सद्गुणांचे आचरण करावयास हवे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याने शिक्षकाचा आदर करणे अगत्याचे असून नातलगांविषयी योग्य ते सौजन्य दाखविणे आवश्यक आहे.  (प्राचीन भारताचा राजकीय इतिहास, पृष्ठ- ३६१) सम्राट अशोकाच्या शिलालेखावरुन असे आढळून येते की, अडीच वर्षांहून अधिक काळ सम्राट अशोक सामान्य अनुयायी  (उपासक) म्हणून राहिला. पहिल्या वर्षात त्याने परिश्रमपूर्वक प्रयत्न केले नाहीत. त्यानंतर थोड्या कालखंडानंतर त्याने संघात प्रवेश करून अत्यंत उत्साहाने धम्मप्रचाराचे कार्य हाती घेतले. लहान-मोठ्यांनी स्वतः परिश्रम करावेत असा जाहीरनामा काढला. आपल्या राज्यातील सर्वत्र आढळून येणा-या शिलांवर, दगडी स्तंभांवर उद्दिष्टांची नोंद चिरंजीव राहील असा जाहीरनामा लोकांप्रत जाऊ दिला. सम्राट अशोकाने सुरुवातीस आपल्या राजदरबारातील प्रशासकीय यंत्रणाच धम्मप्रचारासाठी राबविली. 'युत'-संज्ञक कनिष्ठ अधिका-यांमध्ये धम्मप्रसार करण्यासंबंधीचा आदेश दिला. तसेच राज्यामध्ये फिरस्ती करीत असताना धम्मप्रसार करण्यासंबंधीचा आदेश वरिष्ठ अधिकारी 'राजूक' आणि 'प्रादेशिक' यांनाही दिला. सम्राट अशोकाच्या राज्यावरील प्रतिष्ठापनेला तारा वर्षे पूर्ण झाल्यानंतर धम्मप्रसारासाठी धम्म-महामात्र नावाचे नवीन पद निर्माण केले व त्या अधिका-यांवर धम्मधिथान व धम्मवधि म्हणजे अनुक्रमे धम्मस्थापना व धम्मप्रचार ही महत्वाची कामे सोपवली. सम्राट अशोकाने आपल्या राजदरबारातील प्रमुख, अधिकारी, मंत्र्यांना धम्मप्रसाराच्या कामास लावले, परंतु सम्राट गप्प बसून राहिला नाही. त्यांनी विहारयात्रांबरोबरच धम्मयात्रांना आरंभ केला. धम्मयात्रेमध्ये त्याचा नित्यक्रम असा होता की, धम्माचा उपदेश व त्याविषयी चर्चा करण्याच्या हेतूने परिसरातील सर्व स्तरातील लोकांच्या गाठीभेटी घेणे. त्याबरोबरच पशूंची यज्ञासाठी होणारी हिंसा बंद केली. प्राणीमात्रांची यज्ञ वा नवससायासाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात कत्तल होत असे यासाठी त्याने आदेशच काढला होता. माणसांसाठी व प्राण्यांसाठी उपयुक्त असलेल्या वनौषधींची लागवड मोठ्या प्रमाणात केली. राज्यातील प्रत्येक रस्त्यावर आठ कोसाच्या अंतरावर एक विहीर खोदली. पाण्यात उतरण्यासाठी घाट बांधले. मनुष्य प्राण्याच्या व पशूपक्ष्यांच्या सुखासाठी वटवृक्ष व आम्रवने लावली. चैत्र शुक्ल अष्टमी हा चक्रवर्ती सम्राट आशोकाचा जन्मदिवस इसवीसनाच्या पूर्वीचा असल्यामुळे ख्रिस्तोत्तर तारीख देण्याचा प्रश्नच येत नाही. सम्राट अशोकाने चक्रवर्ती असूनही धम्मप्रचार व धम्मप्रचाराचे अभूतपूर्व असे कार्य केले. बिहार राज्य सरकारने २०१८ साली चैत्र शुक्ल अष्टमी ही २४ मार्च, २०१८ रोजी येत असल्यामुळे सरकारी सुटी जाहीर केलेली आहे. आम्ही डाॅ. बाबासाहेबांचे अनुयायी या महान सम्राटाला विसरणे शक्यच नाही."

*यावर्षी २९ मार्च रोजी गावोगावी सम्राट अशोक जयंती मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरी करण्यात यावी. किंबहुना २९ मार्च ते १४ एप्रिल हा "लोकोत्सव पंधरवडा" म्हणूनच साजरा करूया.

लेखन आणि संपादन- डॉ. संतोष भोसले, राज्याध्यक्ष, युवा बौद्ध धम्म परिषद, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य*

9011631853

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: