Logo

धर्मसत्तेचा राज्यसत्तेवर प्रभाव नको!- दिवंगत प्रा. एन. डी. पाटील

- 20/01/2022   Thursday   10:27 am
 धर्मसत्तेचा राज्यसत्तेवर प्रभाव नको!- दिवंगत प्रा. एन. डी. पाटील

एन.डी.सरांचा आजच्या राजकीय- सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रातील लेख, जरुर वाचा! (अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, वार्षिक विशेषांक २०१६)

गेल्या काही दिवसांत अशा घटना आणि अशी वक्तव्ये येत आहेत की ज्यातून धर्मसत्ता श्रेष्ठ की राजसत्ता...? अशा अंगाने गोंधळ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

परवाच काही दिवसांपूर्वी हरियाणामध्ये विधानसभेत सभापतींच्याही आसनाच्या वर बसून एका नग्न महाराजांचं प्रवचन झालं आणि त्यात ते असं म्हणाले की,
“धर्म पती आहे आणि राजकारण पत्नी आहे. सबब, पत्नीने पतीच्या म्हणण्यानुसार आचरण करावे. अर्थात धर्मानुसार राजकारण व्हावे..!”
आणि यानंतर काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाणिज येथील नरेंद्र महाराजाच्या पायी नतमस्तक झाले आणि त्यांनी असे उद्गार काढले की,
“जेव्हा जेव्हा राजसत्ता पथभ्रष्ट होते, तेव्हा तेव्हा तिला धर्मसत्ता ताळ्यावर आणते...!”

थोडक्यात, दोन्ही विधानावरून राज्यसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असावा, अशी भूमिका अलिकडेच कानावर आली आहे. हे धोरण तद्दन चुकीचे आहे. लोकशाहीला आणि प्रजासत्ताकाला छेद देणारे आहे. लोकशाहीच्या जमान्यामध्ये ही पुराणातली वांगी आता बाजारात चालणार नाहीत. पुराणातली वांगी पुराणात! प्राचीन काळात घडलं, याची आता फक्त उजळणी करणं एवढंच हितावह आहे. त्याचं अनुकरण करणं आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये उचित ठरणार नाही. एकतर एक काळ असा होता की, जेव्हा जनतेचे हक्क प्रस्थापित झालेले नव्हते, लोकशाहीचा जमाना आला नव्हता. राजेशाहीच्या काळामध्ये तर ‘राजा हा ईश्वराचाच अंश आहे’ असं त्याकाळी समजलं जायचं! आणि फ्रान्सचा राजा चौदावा लुईस हा स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत होता! आणि याचपद्धतीने तो राज्यकारभार करत होता. त्या भूमिकेचा परिपाक म्हणून 1793 मध्ये जी फ्रान्सची क्रांती झाली, त्यामध्ये ही सगळी राजेशाही गेली आणि नवीन अशी जनतेची सत्ता आली आणि जनतेच्याच क्रांतीने सिद्ध केलं की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये ईश्वराचा अंश असलेल्याचा दावा करणारी कोणतीच सत्ता आम्हाला मान्य नाही आणि आता लोकांचीच सत्ता हा लोकशाहीचा गाभा आहे.
आज ज्या जमान्यात आपण जगतो आहोत, त्या जमान्यात धर्म आणि राज्य यांच्या सीमारेषा स्वच्छ आणि सुस्पष्ट झाल्या पाहिजेत. आणि याचं उत्तर आपल्या राज्यघटनेत यथार्थपणे दिलेले आहे राज्यघटनेत आपला हा देश ‘धर्मनिरपेक्ष’ राहील, असं म्हटलेलं आहे. ‘धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्वधर्मसमभाव नव्हे!’ धर्मनिरपेक्षतेचा स्वच्छ अर्थ असा की,‘राज्याला धर्म नसतो!’  हे विधान कुणाला आवडो, न आवडो...! कुणाला पटो, न पटो...त्यांच्या पटण्याचा आणि आवडण्याचा प्रश्न शिल्लक राहिलेला नाही. फक्त आपल्या भारतानेच नव्हे तर जगातील बहुतांशी देशांनी अशा धर्मनिरपेक्ष व्यवस्थेलाच पसंती दिली आहे...!

आणि ही पसंती सहजासहजी राज्यसत्तेने दिलेली नाही. राज्यसत्तेला या लोकांच्याच लढ्यातून हे स्वीकारावं लागलं आहे. तेव्हा आता कुणी पुन्हा उलट्या दिशेने घड्याळाचे काटे फिरवायला निघाला आणि राज्यसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असावा, असं कुणी म्हटलं, तर त्याचं म्हणणं आता जनता ऐकणार नाही. आता या प्रश्नांची उजळणी का करावी लागतेय..? तर जेव्हा आपण 1950 साली घटना स्वीकारली, ही राजघटना स्वीकारण्यापूर्वी, 1857 पासूनचा लढा ध्यानात घेतला तर असं लक्षात येईल की भारतीय स्वातंत्र्यासाठी हिंदू-मुस्लिम-शिख अशा सर्वच जातीधर्माच्या लोकांनी एकत्रितपणे लढे दिलेले आहेत.

 स्वातंत्र्यचळवळीचा इतिहासच आपल्याला असं सांगतो की या देशात राहणारे सारे लोक एक आहेत, त्यांच्या आशा-आकांक्षा एक आहेत.
खरं तर हे सारे अवास्तव प्रश्न आजच्या राजकारणामध्ये प्रतिगामी शक्तींनी नवीन उभे केलेले आहेत. आता या प्रतिगामी शक्तीच त्यांची विचारसरणी लादण्याच्या प्रयत्नात हे सारे वाद निर्माण करत आहेत.

स्वातंत्र्य मिळाल्यावर केलेल्या भाषणात पंडित नेहरू म्हणाले, त्याप्रमाणे इथे आता धार्मिकदृष्ट्या कुणी श्रेष्ठ आणि कुणी कनिष्ठ असं राहणार नाही. त्यामुळे राजकीय सत्ताच ही देशातील प्रमुख सत्ता असेल, तिच्या डोईजड असणारी धार्मिक सत्ता नेहरूंच्या स्वप्नातील नव्हती..

आणि लक्षात घ्या, ज्या दिवशी धार्मिक सत्ता राजसत्तेच्या वर येईल, त्यादिवशी लोकशाहीचा खात्मा झालेला दिसेल आणि याचा विपरीत परिणाम म्हणून या देशाची शकले शकले उडतील...!

देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे होत असतानाही आपण अजून अंधश्रद्धेतूनच बाहेर पडलेलो नाही. ज्यावेळी बाकीची राष्ट्रे सुपरसॉनिकच्या वेगाने प्रगती करताहेत, त्यावेळी आमच्याकडे चर्चा काय..? तर राजसत्तेवर धर्माचा प्रभाव असावा की नसावा...! खरं तर या अगदी खुळचट स्वरुपाच्या चर्चा आपण करतो आहोत. एखाद्या सुसंस्कृत राष्ट्राला बालिश वाटाव्यात, अशा या चर्चा आज आपणाला कराव्या लागताहेत. जेव्हा राज्यकर्तेच अशा तर्हेची भूमिका घेतात की, आमच्यावर धर्मसत्तेचा अंकुश असायला हवा, तेव्हा आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा त्याला कडाडून विरोध आहे, ही भूमिका आम्ही कदापिही मान्य करू शकत नाही. कारण यापूर्वीच्या इतिहासामध्ये या धर्मसत्तेने राजसत्तेला वेठीला धरलं आहे...!
अगदी तुम्ही जर 16 व्या शतकात गेलात, तर मार्टिन ल्यूथर किंगने जेव्हा पोपशाहीच्या विरोधात लढा सुरू केला, तेव्हा याचा अनुभव आलेला आहे.

मार्टिन ल्यूथर किंगने पोपच्या थोतांडाविरोधात लढा सुरू केला.
त्या काळात पोप अडाणी, धर्मश्रद्ध जनतेचा गैरफायदा घेऊन आपली गडगंज संपती जमा करत होता. तुम्ही कितीही पापे करा, मरणापूर्वी फक्त माझ्याकडून माफीपत्रे घेतलीत, तर तुमची सगळ्या पापापासून तुमची मुक्ती होईल. तेंव्हा जे लोक पापी, दुर्वर्तनी होते, लबाड्या करून संपत्ती जमावणारे होते, ते साहजिकच भरभक्कम रकमा देऊन या पोपच्या नादी लागले. तेव्हा मार्टिन ल्यूथर किंग या तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाने बुद्धिप्रामाण्याच्या जोरावर त्या पोपच्या या धर्मश्रद्धेच्या नावावर होणार्याक फसवणुकीच्या प्रकाराला कडाडून केला. त्याने ही माफीपत्रे भर चौकात जाळून कृतिशीलपणे विरोध केला.
ही माफीपत्रे जाळल्यानंतर पोपचे धाबे दणाणले. पोपला वाटलं की, आपलं व्हॅटिकन साम्राज्य डळमळलं. तेव्हा पोपने जर्मनीच्या राज्यकर्त्यावर दबाव आणून त्याला जर्मनीतून हद्दपार करावयास भाग पाडलं. तिथून मार्टिन ल्यूथर किंग फ्रान्सला गेल्यावर तिथूनही त्याला हद्दपार करावयास पोपने दबाव आणला. अशातर्हेरने मार्टिन ल्यूथर जिथे जिथे गेला तिथून त्याला हाकलायला पोपने राजसत्तेला भाग पाडलं. म्हणजे ते सारे राजे हे पोपच्या म्हणजे धर्मसत्तेच्या दबावाखाली होते. आणि पोपच्या तालावर राजेशाही काम करत होती.
म्हणजे धर्मसत्ता आपल्या फायद्यासाठी लोकांच्या धार्मिक भावनांचा अशा पद्धतीने उपयोग करून त्यावर कुणी आवाज उठवला, तर राजसत्तेलाही वेठीस धरू शकते, हे आजवरचा इतिहास सांगतो...
मग आता विचार करा... तीच अवस्था आम्हाला आमच्या देशात आणायची आहे का...?

आणि या नाणिजच्या नरेंद्र महाराजाचा इतिहास अत्यंत वादग्रस्त आहे. काही वर्षांपूर्वी इस्लामपूरजवळील वाळवे तालुक्यात एका ठिकाणी या महाराजाची हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा बनाव झाला. नरेंद्र महाराज लोकांची फसवणूक करतात,अंधश्रद्धा वाढीस लागावी, अशी कृत्ये करतात आणि सामान्य लोकांचे शोषण करतात, म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि आम्ही सर्वजण त्या सगळ्या बनावाला, त्या मिरवणुकीला विरोध केला.

तेव्हा या नरेंद्र महाराजाने ‘नरेंद्र दाभोलकर आणि एन. डी. पाटील यांचे हातपाय तोडा,’ असं वक्तव्य केले होते. तेव्हा नरेंद्र महाराज एवढे चमत्कारी असतील तर आपल्या मंत्रसामर्थ्याच्या चमत्कारानेच हातपाय का तोडत नाहीत..?  डॉ. दाभोलकरांनी तर खुलेआम त्यांच्या आश्रमात जाऊन चमत्काराच्या दाव्याविषयी त्याची पोलखोल केली आणि त्याचे पितळ उघडे पाडले...! तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अशा भोंदू महाराजासमोर नतमस्तक होऊन असे वक्तव्य करणे निश्चितच निषेधार्ह आहे...!

आमच्या देशाचा राज्यकारभार करण्यासाठी या देशाने एक राज्यघटना स्वीकारली आहे, त्या राज्यघटनेमध्ये हा देश धर्मनिरपेक्ष आहे, असे आपण जाहीर केलेले आहे. राज्यघटनेमध्ये आतापर्यंत ज्या दुरुस्त्या झाल्या, त्या संसदेच्या सार्वभौमत्वाने झाले. या दुरुस्त्या करण्याचा अधिकार कुठल्या धर्मसत्तेला नाही, तर 125 कोटी जनतेचा आहे आणि या जनतेच्या वतीने संसदेचा आहे. बाकी सगळ्या सत्ता या संसदेच्या सत्तेपेक्षा खाली आहेत. संसद हे सर्वोच्च सत्तास्थान आहे.

जेव्हा मध्यंतरीच्या काळात काही लोकांनी ही राज्यघटनाच मोडून काढण्याचा प्रयत्न केला, तिचा गाभा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातला एक प्रयत्न असा केला गेला की,आपली जी संसदीय लोकशाही आहे, ती बदलून अमेरिकेप्रमाणे अध्यक्षीय लोकशाही आणण्याचा प्रयत्न काही प्रतिगामी शक्तींनी केला. परंतु या देशातील जनतेने तो हाणून पाडला.

या अयशस्वी प्रयत्नानंतर संसदेवर देखील धर्मसंसद आमची आहे आणि आम्ही धर्मसंसद म्हणून काही निर्देश देणार अशा तर्हेरचा कांगावा त्यांनी केला, त्यालाही लोकांनी विरोध केला. म्हणून आज आम्ही असं मानतो आहोत की, या देशामध्ये जो कारभार चालेल तो कारभार फक्त लोकांनी निवडून दिलेल्या संसदेचाच आहे...!

धर्मामध्ये लुडबूड न करण्याचे आश्वासन देऊन धर्मनिरपेक्षता यशस्वी करता येत नसते. पण मुल्ला-मौलवींच्या दबावाला बळी पडून तलाकपीडित मुस्लिम महिलेला मिळणारी पोटगी बंद करण्याचा निर्णय राजीव गांधी सरकारने घेतला, तो अत्यंत चुकीचा होता. मोजक्या मुल्लामौलवींशी चर्चा करुन धर्मसत्तेपुढे झुकणं हा मोठा अपराध होता.

धर्मसत्ता आहे म्हणून कुणी एखाद्या माणसावर गुलामगिरी लादू शकत नाही, धर्मसत्ता आहे म्हणून कुणी कुणाला सती जायला भाग पाडू शकत नाही. म्हणजे हे जे कायदा करुन समाजात बदल घडतो, त्याचीच प्रचिती गेल्या चार वर्षांत जादूटोणाविरोधी कायद्याबाबतही आपल्याला आलेली आहे. या कायद्यानंतर अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आणि लोकांनाही आपल्या हक्कांची जाणीव झाली. म्हणजे त्यामधून कायद्याचा वचक निर्माण होऊन आता अंधश्रद्धेमधून फसवणुकीचे प्रकार कमी झाले.
पण आज अशी परिस्थिती आहे की, प्रचंड दारिद्र्य आहे आणि लोक आपल्या दारिद्य्राच दोष नशिबाला देतात,आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी भोंदू बाबांच्या नादी लागतात. लोकांना आपल्या खर्याल वास्तवातील प्रश्नाविषयी जागं करणं आणि त्यासंबंधी वैज्ञानिक दृष्टिकोनातून मार्ग शोधण्यासाठी प्रवृत्त करणं, हा आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचा भाग आहे आणि त्यासाठी आज आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीची वाटचाल हळूहळू का होईना; पण नेटाने चाललीय. ज्या वेगाने ती जायला हवी, असं आपल्याला वाटतं, तितक्या वेगाने ती जात नाहीय, कारण समाज नवीन विचार स्वीकारायला सहजासहजी तयार होत नाही. आर्थिक वैफल्यामुळे जास्तीत जास्त लोक या भोंदू लोकांच्या नादाला लागतात, तेव्हा आर्थिक परीस्थिती सुधारायला हवी.

सामान्य लोक आपल्या अडीअडचणीमुळे इतके बेजार आणि हैराण झालेले आहेत की तुकाराम महाराज म्हणाले त्याप्रमाणे ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग,’ अशापद्धतीने भाकरीसाठी त्यांना झटाव लागतं आणि अशी माणसंच अंधश्रद्धेला बळी पडतात. म्हणून समाजव्यवस्थेत होणारे बदल हे आर्थिक बदलाशीही निगडित असतात.

या लेखाचा शेवट मी अशापद्धतीने करतो की, राज्यघटना आपण जेंव्हा 26 जानेवारी 1950 ला स्वीकारली, तर राज्यघटना तयार करण्याच काम पूर्ण झाल्यावर 25 नोव्हेंबर 1949 च्या समारोपाच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, “यानंतर हा देश एका विरोधाभासामध्ये प्रवेश करणार आहे.हा विरोधाभास असा की, त्या दिवशी राजकीय क्षेत्रात समान हक्क व समता आलेली असेल, पण त्याचवेळी सामाजिक व आर्थिक क्षेत्रात जी विषमता आज आहे, ती तशीच राहणार आहे.”

एका बाजूला राजकीय समता आणि दुसर्या् बाजूला आर्थिक व सामाजिक विषमता असा हा विरोधाभास फार काळ या देशात चालणार नाही. तो तुम्हाला निपटून काढावा लागेल आणि जर तो निपटून काढला नाही, तर या विषमतेच्या टापाखाली किंकाळ्या फोडणारे वर्ग स्वस्थ बसणार नाहीत. ते या परिस्थितीतून मार्ग शोधतील. त्यावेळी तुम्ही महत्प्रयासाने उभा केलेला हा लोकशाहीचा डोलाराते खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत.

आजमितीला मी असं मानतो की, बाबासाहेबांचं हे भाषण ‘भिंतीवरचे लिखाण’ आहे. त्यामध्ये शाश्वत असे विचार आहेत, त्यात आश्वासक बाबी आहेत आणि अशा परिस्थितीत तुम्ही सामाजिक, आर्थिक विषमतेच्या टापाखाली किंकाळ्या फोडणार्याब वर्गाला त्यांच्या समस्यातून मुक्त करणार आहात की नाही...? हा खरा लढा आहे.

आणि हे जे अडथळे आहेत की, धर्मसत्ता श्रेष्ठ की, राजसत्ता...तर... ज्या दिवशी या देशांमध्ये धर्मसत्ता या जनतेने निवडून दिलेल्या संसदेवर मात करेल, तो दिवस या देशासाठी अत्यंत काळा आणि वाईट असेल.पण तो क्षण या देशामध्ये कदापि अवतरणार नाही, अशी श्रद्धा देखील या देशातील जनता आजवरच्या इतिहासानुसार बाळगू शकते, असं मला वाटतं...!

(प्रसिद्धी : अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, वार्षिक विशेषांक २०१६)*

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: