Logo

शिवसेना नक्की कुणाची? आयोगाचे दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

- 24/07/2022   Sunday   8:38 am
शिवसेना नक्की कुणाची? आयोगाचे दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

शिवसेनेत मोठी फूट पडली. आमदारांपाठोपाठ खासदारांनी बंडखोर एकनाथ शिंदेंचा गट जवळ केला आहे. त्यानंतर आता प्रश्न उपस्थित झाला आहे तो खरी शिवसेना कोणाची? हा. याचे उत्तर लवकरच मिळणार आहे. कारण, शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागणीनंतर आता आयोगाने फर्मान सोडले आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना म्हणजेच मूळ शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि फुटीर तथा बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांना आपापले पुरावे ८ ऑगस्ट पर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे

खरी शिवसेना कुणाची? या करिता दि.८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेपर्यंत पुरावे सादर करा असे निर्देश आता भारतीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांना दिले आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन झाले आहे. आता शिवसेना आमचीच असा दावा शिंदे यांनी केला आहे. तर ठाकरे यांनीही शिवसेना आमचीच म्हणणाऱ्यांना भुलू नका म्हटले आहे, दरम्यान सध्या आदित्य ठाकरे यांनीही शिव संवाद यात्रा काढली आहे.
सुमारे महिनाभरापासून खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न जनतेला पडला आहे. कारण शिंदे गट खरी शिवसेना आमची असल्याचे म्हणत आहे. त्याचबरोबर संजय राऊत, आदित्य ठाकरेआणि उद्धव ठाकरे खरी शिवसेना आमची असल्याचे म्हणत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोठा पेच निर्माण झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. हे प्रकरण सध्या केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत गेलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपली कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे. येत्या १५ दिवसात कागदपत्रे जमा करण्याची मुभा देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी एका गटाला घेऊन वेगळी भूमिका जाहीर केल्यापासून महाराष्ट्रातले राजकारण ढवळून निघाले आहे.

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: