Logo

एक साधी गजल.. - ज्ञानेश वाकुडकर

- 17/04/2021   Saturday   10:29 am
एक साधी गजल.. - ज्ञानेश वाकुडकर

एक साधी गजल, जन्म जावा भरून अन् तुझ्यासारखे जग असावे तरुण !

एक साधी गजल, जन्म जावा भरून
अन् तुझ्यासारखे जग असावे तरुण !

ह्या सरी बोलल्या थेट बरसायचे..
ढग अचानक कुणी बंद केले वरून ?

याद विरहातली बोचते केवढी 
पाहिली का कधी सांग हाती धरून ?

का नवी भांडणे रोज करतेस तू..
त्या जुन्या पावत्या वापरून वापरून ?

शब्द पाळायला सांग ओठासही
जन्म झाले किती, भेटण्याचे ठरून ?

पेरण्याची तुला हौस नाही म्हणे..
शेत का ठेवले, हे असे नांगरून !

देवळांचे नवे टोल नाके नको..
चल तुझे काम कर, माणसाच्या घरून !

मी पुन्हा जन्म का घ्यायचा सांग ना
जे कराया हवे, सर्व झाले करून !

ही मिठी वेगळी, ती मिठी वेगळी..
थेट आकाशही पाहते थरथरुन !
-
ज्ञानेश वाकुडकर
नागपूर १७/०४/२०२१

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: