Logo

कथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची - नऊ कोटीचा राजा

- 30/11/2021   Tuesday   9:18 am
कथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची - नऊ कोटीचा राजा

थरथरत्या हाताने सखारामने दारावरची कडी वाजवली. दरवाजा उघडताच दोघे दचकले. राजबिंडे व्यक्तिमत्त्व बघून चकित झाले.

"या...आत या..काय काम काढले?" डॉक्टर बाबासाहेबांच्या आवाजाने दोघे भानावर आले. हळू पावलांनी त्यांनी घरात प्रवेश केला. बाबासाहेबांच्या चरणावर माथा ठेवण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाबासाहेबानी त्यांना खांद्याला धरुन उभे केले. सखारामने सारी कहाणी सांगितली. पायी प्रवास करीत कसे आलो हे कथन केले. त्यांच्यावर झालेला अन्याय एकूण बाबासाहेबांच्या मनात ज्वाला पेटल्या. त्यांची दीनवाणी स्थिती बघून डोळ्यात पाणी आले.
"हे बघा! मंडळी बाहेरगावी गेली आहे. तुम्ही हात पाय धुऊन न्याहारी करा." असे म्हणत बाबासाहेबांनी गरम चहा आणि तूप लावून तळलेल्या पोळ्या त्यांच्यापुढे ठेवल्या. 'आपला देवच आज आपल्याला जेऊ घालीत आहे' असे दगडू आणि सखारामला वाटत होते.

बाबासाहेबांनी दगडू कडून जमिनीचे कागद घेतले. कोर्टात जाण्याची तयारी करून त्यांना म्हणाले, "दगडू आणि सखाराम! काही तास तुम्ही मुंबई बघा. सायंकाळी या. रस्ता चुकू नका. मी कोर्टामधून येतो." सखाराम आणि  दगडूला खूप आनंद झाला होता. मुंबईची नवलाई बघत दोघे जिवलग मित्र फिरत होते.

कोर्टात येताच डॉक्टर बाबासाहेब आबेडकरांनी दगडूच्या केसमध्ये लक्ष घातले. जरुरी कागद तयार केले. सातारा जिल्हा कलेक्टरला फोन केला. पोलीसपाटील, सरपंच, तहसीलदार यांच्या नावे पत्र लिहिली. हे सर्व करीत असताना त्यांना दगडू आणि सखारामच्या चेहरा आठवत होता. लवकर ते घराकडे निघाले. चांगले बांगडे मासे घेऊन घरी आले. सखाराम आणि दगडू येण्याअगोदर स्वयंपाक तयार केला आणि कायद्याचे पुस्तक वाचीत बसले. सातारा शहराचे नाव निघताच त्यांना आपले बालपण आठवे. नकळत आईची आठवण होऊन डोळे ओले होत.

"काय दगडू? पहिली का मुंबई?" घरात येताच साहेबांनी प्रश्न केला. दगडूला गप्प बघून सखारामने उत्तर दिले, "भीतभीतच आम्ही फिरलो साहेब. जादूनगरी वाटली आम्हाला."
"आता जेवण करा. तुमचे काम मी केले आहे. दगडू! तुझी जमीन तुला लवकर मिळेल. चिंता करू नको. आनंदाने जेवण कर."
हात पाय धुवून दोघे जेवायला बसले. साहेबांनी स्वतः त्यांना ताट वाढली. तळलेले बांगडे, त्याचेच कालवण, बाजरीची गरम भाकर, कापलेला कांदा, लिंबाची फोड, एका ताटात गरमगरम भात. आपल्या समोरचे अन्न बघून दगडू आणि सखाराम चकित झाले. त्यांना समाधानाने जेवताना बघून साहेब म्हणाले, "लाजू नका. रमा बाहेरगावी गेलेली आहे. घरात कोणी नाही. मला येतो तसा स्वयंपाक मी केला आहे. मीठमिरची मागून घ्या."
जेवण आटोपल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दगडुच्या डाव्या हाताचा अंगठा चारपाच कागदावर उमटवून घेतला. संपूर्ण केस त्याला समजावून सांगितली. 
"राहत असाल तर राहा. जायचे असेल तर जा. रात्रीची गाडी तुम्हाला मिळेल." 
सखाराम आणि दगडू पुन्हा त्यांच्या चरणावर वाकले तेव्हा साहेब त्यांना म्हणाले, "पेटून उठा! आता अन्याय सहन करावयाचा नाही."
डोळे पुशीत त्यांनी साहेबांचा निरोप घेतला. दोघांचे गाडीभाड्याचे पैसे सखारमच्या हातात देण्यास साहेब विसरले नाही. 

सखाराम आणि दगडू लवकर परत आलेले बघून रखमाला नवल वाटले. सखारामच्या तोडून सारी माहिती ऐकून ती आनंदाने रडू लागली. दगडूच्या डोळ्यापुढून बाबासाहेबांची मूर्ती हलत नव्हती. सखाराम भारावून गेला होता. एके दिवशी दगडूच्या घरी सातारा कलेक्टरची माणसे आली. दगदुच्या हातात जमिनीचा ताबा असलेले कागद देत मुख्य अधिकारी म्हणाला, "दगडू! त्या आंबेडकरांची मेहरबानी. तुझी जमीन तुला मिळाली."

वाऱ्यासारखी बातमी गावात पसरली. महारवाडा खडबडून जागा झाला. सवर्णांच्या मनात धडकी भरली. दगडूच्या घरात दिवाळी साजरी होत होती. अख्खा महारवाडा त्याला भेटून गेला. हजारो वर्षापासून मानेवर लादलेले 'जोहर मायबापाचे जुलमी जू' फेकून अस्पृश्य असलेला महार समाज ताठ मानेने उभा राहत होता. डोळे भरून आपल्या मुक्तिदात्याला बघत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका हाकेला ओ देऊन घरदार वाऱ्यावर सोडून, मुलाबाळांसह त्यांच्या पाठीशी उभा राहत होता. दिवस-रात्र संघर्ष करीत होता. आपल्या भावी पिढीच्या उन्नतीसाठी प्राण तळहातावर घेवून सर्व प्रकारच्या अमानुष अन्यायाच्या विरोधात लढत होता.

आपल्या समाजातील घटकाकडे आईच्या मायेने बघणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ह्रदय करुणेचा सागर होते. म्हणूनच नऊ कोटी  समाजबांधवांच्या मुखातून एकच शब्द दुमदुमला होता, "नऊ कोटीचा राजा! दयाळू  राजा माझा!"

(कथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या : 
लेखक : सुभाष जाधव

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: