Logo

जीवो जीवस्य जीवनम - हिरालाल पगडाल

- 01/12/2021   Wednesday   9:41 am
जीवो जीवस्य जीवनम - हिरालाल पगडाल

चिंतन भाग 3 आज माणूस हाच पृथ्वीतलावरचा सर्वात हुषार आणि बुद्धिमान प्राणी आहे. त्याची प्रगती थक्क करणारी आहे. त्याने चंद्रावर पाऊल ठेवले.त्याने समुद्राचा तळ धुंडाळला. त्याने यंत्र शोधून काढली त्याच्या जोरावर तो आपल्या शारीरिक शक्तीच्या

 असंख्य पटीने कामे करू शकतो, त्याने औषधे शोधली, या औषधांच्या जोरावर तो अनेक रोग आणि व्याधींवर मात करू शकतो, त्याने वाहने  तयार केली त्यांच्या सहाय्याने  तो प्रचंड वेगाने एकीकडून दुसरीकडे  जाऊ शकतो.त्याने आगीवर नियंत्रण मिळवले आणि त्याचा त्याने ऊर्जेसारखा वापर करून प्रचंड प्रगती केली आहे. पाण्यावर नियंत्रण मिळवले आहे ,पाणी अडवून साठवून पाहिजे तेथे नेऊन त्याचा हवा तसा वापर करतो आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शेती, उद्योग, व्यवसाय,आरोग्य, शिक्षण ,भाषा ,संस्कृती,संचार,प्रकाश, करमणूक, कला, क्रीडा, अवजारे,शस्रे आणि शास्रे इत्यादी बाबतीत त्याची प्रगती अचंबित करणारी आहे. माणसाने आपल्या अक्कलहुषारीने आजची प्रगत सृष्टी उभी केली आहे. त्याने आपली इच्छाशक्ती, कौशल्य, तंत्रज्ञान आणि साधने याच्या सहाय्याने या गोष्टी निर्माण केल्या आहेत. पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरणा बरोबरच त्याने स्वतःचे स्वतंत्र सांस्कृतिक पर्यावरण निर्माण केले आहे.
           हिंदीत एक म्हण आहे 'जान है तो जहाँ है'। हे खरे आहे की जो पर्यंत आपल्या कुडीत जीव आहे तो पर्यंतच आपल्यासाठी जग आहे,अन्यथा सगळे व्यर्थ आहे. जीव हेच माणसासाठी एक कोडे आहे. जीवाचा शोध माणूस घेत आहे पण जीवाचे कोडे काही माणसाला अद्याप पूर्णपणे उलगडलेले नाही. पण त्याने जीव, जीवाचे अस्तित्व, जीवाचे प्रकार, जीवाचे संक्रमण , जीव वाचवणे ,जीवाचा जन्म ,जीवाची उत्क्रांती याचा बराच अभ्यास केला आहे
         आपल्या सुर्यकुलात फक्त पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. पृथ्वी व्यतिरिक्त इतर कोणत्याही ग्रहावर अद्याप तरी जीवसृष्टी आढळुन आलेली नाही.  मंगळ आणि चंद्र यांवर जीवसृष्टी असावी असा काही शास्त्रज्ञांचा अंदाज होता परंतु तेथेही जीवसृष्टी नाही हे अमेरिकेच्या नासा  व इतर राष्ट्रांच्या अंतराळ मोहिमेतून स्पष्ट झाले आहे.
         पृथ्वी निर्माण झाल्यावर शे  सव्वाशे अब्ज वर्षांनी म्हणजे सुमारे  तीनशे ते साडे तीनशे अब्ज वर्षांपूर्वी त्याचा पृष्ठभाग हळूहळू थंड झाला ,त्याच्यावर अनेक प्रकारचे खडक निर्माण झाले, हे खडक उंच सखल आहेत. पृथ्वीचा एकाहत्तर टक्के पृष्ठभाग पाण्याखाली आहे. त्याचे मोठमोठे महासागर तयार झाले. अवघा एकोणतीस टक्के भूभाग  आहे. पृथ्वीवर हवा, पाणी, वातावरण आहे. 
      सुमारे दोनशे कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील पाण्यात अलगी शेवाळ आणि त्यानंतर अमिबा, बॅक्टेरिया सारखे एकपेशीय जीव निर्माण झाले. त्यानंतरच्या दीडशे कोटी वर्षे हीच स्थिती राहिली.
    एक पेशीय जीवाच्या केंद्राचे विघटन होऊन एकाचे दोन ,दोनाचे चार अशा पद्धतीने अमर्याद संख्येने जीवांची उत्पत्ती होत आहे. सुमारे साठ कोटी वर्षांपूर्वी 'प्राचीन जीव युग' सुरू झाले. एकपेशीय जीवांचे बहुपेशीय जीवात रूपांतर व्हायला सुरुवात झाली. पाण्यात जलचर प्राणी निर्माण झाले. मासे व इतर जलचर प्राण्यांची खुपमोठी जीवसृष्टी पाण्यात निर्माण झाली. 
    पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील गुरुत्वाकर्षनामुळे समुद्राला भरती ओहोटी येते, त्यावेळी भरती बरोबर समुद्रातील जलचर प्राणी किनाऱ्यावरील जमिनीवर येऊ लागले,  त्यातील काही  प्राणी उत्क्रांत होऊन जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी राहू लागले त्यातून कासव, बेडूक, मगर, सुसर सदृश्य उभयचर प्राणी निर्माण झाले. प्राण्यांच्या बरोबरीने वनस्पतींची देखील मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली.त्यात सूक्ष्म पासून मोठ्या आकाराची झाडे आहेत.
     सुमारे वीस कोटी वर्षांपासून ते पाच कोटी वर्षांपर्यंत 'मध्यजीव युग' सुरू झाले. पृथ्वीवर कीटक, मोठमोठे विशालकाय प्राणी, डायनसोर, सरपटणारे प्राणी असे भूचर तयार झाले तसेच आकाशात संचार करणारे नभचर म्हणजेच पक्षी देखील तयार झाले.काळाच्या ओघात पृथ्वीवर अनेक भौगोलिक घडामोडी घडून गेल्या त्यात अनेक जीव नष्ट झाले, डायनासोर देखील असेच नष्ट झाले आहेत, पण त्याचे अश्मीभूत अवशेष आजही सापडत आहेत त्यामुळे पृथ्वीवर पाच कोटी वर्षांपूर्वी डायनासोर सारखे विशालकाय प्राणी होते हे वास्तव आहे.
      पृथ्वीवर असंख्य प्रकारचे भूचर प्राणी आहेत. त्यात कीटक आहेत, पक्षी आहेत,सरपटणारे प्राणी आहेत, सस्तन प्राणी आहेत.
जीव कोणताही असो 'वंश सातत्य' हे त्याचे वैशिष्ट्य आहे. सर्व प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आपला वंश जन्माला घालतात . बहुसंख्य जलचर प्राण्यांचा जन्म अंडीतून होतो पण त्यासाठी  नर मादी जलचरांचा संयोग आवश्यक असतो. कीटकांचा जन्म अंडी,अळी, कोष त्यानंतर कीटक अशा अवस्थेतून होतो. पक्षांचा नरमादी संयोग होतो, त्यानंतर मादी पक्षी अंडी घालते. घातलेली अंडी मादी पक्षी आपल्या पंखाखाली उबवते व त्यातून पक्षाचा जन्म होतो. सस्तन प्राणी आपल्या अपत्याला जन्म देतात . त्यासाठी सस्तन प्राण्याची चार वैशिष्टये आहेत १)नर मादी संयोग २)आईच्या उदरात वाढ ३)आईच्या उदरातून जन्म ४)आईच्या दुधावर वाढ. 
      प्रत्येक जीव हा जन्माला येतो, तो शासोच्छवास करतो, तो लहानाचा मोठा होतो, तो विशिष्ट आयुष्य जगतो. त्याला अन्न मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तो अन्न खाऊन आपले उदरभरण करतो, खाल्लेले अन्न पचवतो , त्यातून त्याच्या शरीरात ऊर्जा तयार होते. या उर्जेमुळेच तो हालचाल करू शकतो.  उत्सर्जन प्रक्रियेद्वारे मैला बाहेर टाकतो. एका विशिष्ठ कालावधीनंतर जीवाचा मृत्यू अटळ आहे. प्रत्येक जीव हा मर्त्य आहे. कोणताही जीव अमर नाही.
      पृथ्वीवरील जीव प्राणिज , वनस्पतीजन्य किंवा जैविक अन्नावरच जगतात. अनेक मोठे जीव छोट्या जीवाला मारून खातात त्या अर्थाने पृथ्वीवर 'जीवो जीवस्य जीवनम' या सूत्राने जीव जगतो. पृथ्वीवर मोठी अन्न साखळी आहे. त्याचा निष्कर्ष देखील 'जीवो जीवस्य जीवनम' हाच आहे.
       जमिनीवरील सस्तन प्राण्यात बहुसंख्य  प्राणी हे शेपटी असलेले चतुष्पाद प्राणी आहेत. या चतुष्पाद प्राण्यात अनेक संकर आणि संक्रमण होत नवनवे प्राणी पृथ्वीवर जन्माला आले आहेत.त्यांची वेगवेगळी कुळे  आहेत आहेत. उदा. मार्जार कुळ. 
        सुमारे दहा ते पंधरा लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर माकड /वानर यात विकास होत होत बीन शेपटीचे  वानर तयार झाले . त्यापैकी  गोरीला, ओरांगउट्टान, चिंपांझी ,बोनोबो हे मानवसदृश्य कपी (एप्स)आजही अस्तित्वात आहेत. 
       गोरीला नर हा मादी पेक्षा मोठा आणि वजनदार असतो, गोरीला दोन पायांवर उभा राहतो, चालतांना मात्र हाताचा उपयोग पाया सारखा करून चालतो. त्याचे हात लांब आहेत, तो मूठ आवळून चालतो. त्याची उंची साधारणपणे सव्वा मीटर ते पावणे दोन मीटर असते. वजन १४० ते २७५ किलोग्रॅम असते. त्याच्या अंगभर काळे केस असतात, चेहरा,हाताचे पंजे, पाऊल, कान यांवर केस नसतात. आखूड चेहरा, लांब नाकपुड्या, छोटे कान, बारीक डोळे असतात. तो झाडावर पंधरा मीटर उंची पर्यंत चढू शकतो. गोरीला मादी आणि पिले झाडावर खोपट करून राहतात तर नर गोरीला झाडाखाली खोपट करून राहतो.गोरीलाचे सरासरी आयुष्य ४० वर्षे आहे.
      गोरीला कळप करून राहतो, कळपाचे नेतृत्व तरुण नर करतो. गोरीलाचा गर्भधारणा काळ नऊ महिन्यांचा असतो, गोरीला मादी एकावेळी एकाच पिलाला जन्म देते. गोरीला हा शाकाहारी प्राणी आहे. तो मुख्यतः आफ्रिका खंडातील कांगो नदीच्या खोऱ्यात आढळतो. माणसाशी त्याचा ९८% पेक्षा जास्त डीएनए जुळतो. बोनोबो आणि चिंपांझी नंतर मानवाच्या जवळपास जाणारा गोरीला हाच प्राणी आहे.
     ओरांगउट्टानच्या अंगावर लालसर केस असतात, त्याच्या कंठातून तो वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतो, कपी वर्गातला सर्वात उंच व वजनदार प्राणी आहे. त्याचे बाहू लांब असतात,उंची साधारणपणे १४० सेंटीमीटर ते १८० सेंटीमीटर असते. तो हाताचा उपयोग चांगला करतो. तो झोपण्यासाठी झाडाच्या छोट्या फांद्या आणि पाला याचा वापर करून बिछाना तयार करतो.हा आशिया खंडात आढळणारा एकमेव कपी आहे तो सुमात्रा,इंडोनेशिया भागात सर्वसाधारणपणे विषुववृत्तीय जंगलात बारमाही पावसाच्या प्रदेशात आढळतो. त्यांची संख्या खूप कमी आहे. माणसाने काळजी घेऊन या प्राण्यांचे रक्षण केले पाहिजे, अन्यथा तोही अस्तंगत होण्याचा धोका आहे.
   चिंपांझी हा अमेरिका खंडातील विषुववृत्तीय जंगलात आढळतो, त्याच्या अंगावर काळे केस असतात, चेहरा,बोट,तळवे,पाऊल, घोटे यांवर केस नसतात. उंची सर्वसाधारणपणे १२० ते १५० सेंटीमीटर असते.  नराचे  वजन ४० ते ७० किलो तर मादीचे वजन २७ ते ५० किलो असते. मादीचा गर्भधारणा काळ आठ महिन्यांचा आहे. चिंपांझी १५ ते १५० च्या कळपाने राहतात.
   असे म्हणतात की बोनोबो हा कपी आदिमानवाचा पूर्वज आहे, परंतु हा आता लुप्त होत असलेला कपी आहे. याचे सरासरी वय चाळीस वर्षे आहे,  उंची सर्वसाधारणपणे १२० सेंटीमीटर असते. बोनोबो मध्ये मादीला अधिक महत्व आहे. बोनोबो मादी आणि तिचे पिल्ले आजीवन बरोबर राहतात.
       पृथ्वीचे वय सुमारे ४६५ अब्ज वर्षे आहे असे गृहीत धरले तर आजचा प्रगत मानव हा अवघे काही हजार वर्षे पासूनच पृथ्वीवर अस्तित्वात आहे. माणूस बुद्धिमान आहे,सृजनशील आहे.त्याचा जन्म आणि विकास याबाबत जाणून घ्यायला आपल्याला सगळ्यांना नक्कीच आवडेल पण त्यासाठी चिंतनच्या पुढच्या भागाची आपल्याला वाट पहावी लागेल.
                        - हिरालाल पगडाल, संगमनेर
                           ९८५०१३०६२१

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: