Logo

भेद सारे मावळू द्या - हिरालाल पगडाल

- 22/11/2021   Monday   11:04 am
भेद सारे मावळू द्या - हिरालाल पगडाल

चिंतन -१ भेद सारे मावळू द्या - हिरालाल पगडाल, संगमनेर. ९८५०१३०६२१

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो समाजातच लहानाचा मोठा होतो, समाजातच  त्याचे भाव विश्व तयार होते. नाती गोती, मान पान, देवाण घेवाण यातून माणसांचे काही सामायिक संबंध तयार होतात, त्यातून समाज आकाराला येतो. समाजात वावरतांना प्रत्येक माणसाच्या वाट्याला कमी अधिक प्रमाणात सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा येते. ज्या माणसाच्या वाट्याला अधिकची सत्ता/ संपत्ती / प्रतिष्ठा येते  त्याला आपल्या सत्तेचा,संपत्तीचा, प्रतिष्ठेचा मोठा गर्व असतो, अभिमान असतो. आपण जणू जग जिंकले अशा आविर्भावात तो त्याच्यापेक्षा कमी सत्ता,संपत्ती आणि प्रतिष्ठा असलेल्या व्यक्तींना हिणवीत असतो,दुखवीत असतो.
        माणसांचा हा अभिमान किंवा हे हिणवणे व्यर्थ आहे तसेच ते चूकही आहे, कारण हे जग, हे विश्व विराट आणि अनंत आहे. या विराट आणि अनंत विश्वाच्या तुलनेत माणसाची ही मालकी हक्काची भावना नगण्य आणि फुटकळ आहे.
     आपण असे पाहूया की, आपण जेथे आहोत. ते घर एखाद्या गल्लीत किंवा चौकात असते.  ती गल्ली किंवा चौक एखाद्या गावाचा भाग असते. ते  गाव किंवा शहर एका तालुक्याचा भाग असतो, तो तालुका एखाद्या जिल्ह्याचा भाग असतो. तो जिल्हा एखाद्या राज्याचा भाग असतो. जसे आपले महाराष्ट्र राज्य . आपले महाराष्ट्र राज्य भारत देशाचा भाग आहे. आपला भारत देश आशिया खंडाचा भाग आहे. आशिया खंडात भारतासारखे अठ्ठेचाळीस देश आहेत. आशिया खंड पृथ्वीचा भाग आहे. 
        पृथ्वीवर आशियासारखे पाच खंड आहेत. त्यात एकशेपंच्यानो देश आहेत. पृथ्वीवर एकोणतीस टक्के भूभाग असून पृथ्वीवरचा एकाहत्तर टक्के भाग पाण्याने वेढलेला आहे.पृथ्वीचा व्यास साधारणपणे १२हजार ७४२ किमी आहे. पृथ्वीचे क्षेत्रफळ सुमारे एक्कावन्न कोटी चौरस किलोमीटर आहे. या पार्श्वभूमीवर माणसाने स्वतःची संपत्ती,सत्ता, प्रतिष्ठा मोजून पहावी म्हणजे आपण एखाद्या डबक्यातील बेडका पेक्षाही क्षुद्र आहोत याची त्याला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.

          आपण आता फक्त पृथ्वीवर माणूस किती नगण्य आहे हे पाहिले.  पण आपण जर त्याही पुढे गेले तर आपले अस्तित्व किती सूक्ष्म आहे याची आपल्याला प्रचीती येईल. 
        आपली पृथ्वी एका सुर्यकुलाचा भाग आहे. हे  सुर्यकुल आपल्या सुर्या भोवती फिरत आहे. आपला सूर्य पृथ्वीच्या एकशेसात पट मोठा आहे. त्याचा व्यास साधारणपणे तेरा लाख नव्वद हजार किलोमीटर आहे.  या सुर्यकुलात शुक्र बुध पृथ्वी मंगळ शनी गुरू युरेनस नेपच्यून असे आठ ग्रह आहेत शिवाय आठ ग्रहांचे मिळून जवळपास शंभर उपग्रह आहेत, असंख्य लघुग्रह, धुळीचे लोट इत्यादी आहेत. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर १४९.६ दशलक्ष किलोमीटर आहे. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर  पोहोचण्यासाठी ८.३ मिनिटे लागतात. सूर्याचा प्रकाश एक वर्षात जितके लांब जातो त्याला एक प्रकाश वर्ष म्हणतात. 
       आपला सूर्य एक तारा आहे, आपण त्याच्या कुलाचे घटक आहोत. आपले सुर्यकुल  मंदाकिनी नावाच्या आकाशगंगेचा घटक आहे. आपल्या आकाशगंगेत दोनशे अब्ज तारे आहेत. मंदाकिनी आकाशगंगेच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंतचे अंतर एक लाख प्रकाशवर्ष इतके आहे. अंतराळात आपल्या आकाशगंगे सारख्या असंख्य आकाशगंगा आहेत. या सर्व आकाशगंगा मिळून एक दर्शिका बनते आणि अनेक दर्शीकांचे मिळून एक  ब्रह्मांड बनले आहे. जर विशाल आणि अनंत ब्रह्मांडाचा विचार केला आणि त्याच्या तुलनेत माणसाने स्वतःला मोजले तर तो किती नगण्य आहे हे आपल्याला समजेल. माणसाला त्याची जात, धर्म, वंश,भाषा, प्रांत, पैसा याचा खूप अभिमान असतो, पण जात,धर्म, वंश, भाषा, प्रांत आणि पैसा हे सारे मानव निर्मित असून ते नश्वर आहेत. आपण सगळे कल्पनेचे खेळ खेळत माणसा माणसात भेदभाव करतो. असा भेदभाव करणे चूक आहे,अमानवीय आहे.
       या निमित्ताने कवी वसंत बापट यांच्या कवितेतील दोन पद्य पंक्ती येथे अधोरेखित करतो
       भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना ।
       मानवांच्या एकतेची, पूर्ण होवो कल्पना ।।

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: