Logo

'विकास मानवाचा' - हिरालाल पगडाल, संगमनेर

- 09/01/2022   Sunday   11:07 am
'विकास मानवाचा'  - हिरालाल पगडाल, संगमनेर

जीवसृष्टी आणि मानवी उत्पत्ती बाबत धर्म आणि विज्ञान यांच्यात मोठी मतभिन्नता आहे. बहुसंख्य धर्मग्रंथात जीवसृष्टी आणि मानव उत्पत्ती ही देवाची निर्मिती मानलेली आहे. किंबहुना ही सृष्टी, जीव, जंतू, माणूस हा सगळी देवाचीच अगाध लीला आहे

अशी धारणा धार्मिक माणसांमध्ये आजही कायम आहे. देवभोळी माणसे देवांवर श्रध्दा आणि विश्वास ठेवून जगतात. ते सृष्टीची निर्मिती, जीवाची आणि माणसांची निर्मिती कशी झाली याची चिकित्सा करीत बसत नाहीत. सगळेच धर्म  आपला  धर्मग्रंथ अपौरुषेय आहे असे मानतात. तो देवनिर्मित आहे अशी त्यांची धारणा असते, त्यामुळेच त्यात बदल संभवनीय नसतो. हे अपौरुषेय मानलेले धर्मग्रंथ  अपरिवर्तनीय असतात.
      विज्ञानाला परिवर्तन आणि मतभिन्नता मान्य असते. सप्रमाण बदल विज्ञान स्वीकारतो. विज्ञानाचे नियम, निष्कर्ष हे कार्यकारणभावाशी निगडित असतात. हे नियम, निष्कर्ष व्यक्तीसापेक्ष नसतात. विज्ञानाच्या नियमांना आणि निष्कर्षांना आव्हान देता येते. धर्म आणि धर्मग्रंथातील नियम आणि निष्कर्ष यांना आव्हान देणे धर्मगुरू आणि धर्मातील अनुयायांना मान्य नसते.
       बायबलमध्ये पृथ्वी, समुद्र, जमीन, आकाश, अंतराळ, प्रकाश, अंधार, दिवस, रात्र ,सूर्य,चंद्र,तारे, पशु, पक्षी,जलचर, प्राणी, फळे, वनस्पती हे सारे देवाने निर्माण केले. यांवर सत्ता गाजवणारा मनुष्य ,नर नारी  हे सारे   देवाने  निर्माण केले आहे असे सांगितलेले आहे. पवित्र शास्र ,बायबलमध्ये  हे सगळे देवाने पहिला दिवस ते सहावा दिवस यात निर्माण केले असे लिहिलेले आहे. मानवी उत्पत्ती बाबत बायबल मध्ये हे जे सांगीतलेले आहे. त्याला 'दैवी उत्पत्तीचा सिद्धांत' म्हणतात.  
       ब्रिटीश जीव शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन याने पहिल्यांदा दैवी उत्पत्तीच्या सिद्धांताला नाकारले. त्याने इ.स.१८५८ मध्ये उत्क्रांतीवादाचा सिध्दांत (क्रमिक विकासवादाचा सिध्दांत) मांडला. या सिद्धांतानुसार सर्व सजीव पृथ्वीवर निसर्गनियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत उत्क्रांत होतात (जुळवून घेऊ शकतात) त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात. ज्यांना हे जमत नाही त्या प्राणिजाती नष्ट होतात व त्यांची जागा नव्या जाती घेतात. हे बदल घडायला कोट्यवधी वर्षे जावी लागतात. या सिद्धांतामुळे जगात हलकल्लोळ माजला. चर्चला मानणारे, धर्मग्रंथ प्रमाण मानणारे रूढीवादी, परंपरावादी, धर्मवादी माणसे खवळून उठली, त्यांनी डार्विनच्या सिद्धांताला जीवतोड विरोध केला. डार्विनने आपला सिध्दांत स्पष्ट करणारी तीन पुस्तके लिहिली 1)The Voyage of the Beagle  2)The Origen of species. 3) The Descent of man  डार्विनच्या या तीन पुस्तकांनी विज्ञानाला प्रमाण मानणाऱ्या चिकित्सक माणसांच्या अनेक शंका कुशंका दूर केल्या. 
         परंपरावादी मंडळींनी कितीही विरोध केला तरी काळाच्या ओघात डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिध्दांत खरा ठरला. The survival of fittest हा डार्विनचा सिध्दांत जगन्मान्य झाला. डार्विन नंतर अनेक मानववंश शास्त्रज्ञ, जीव शास्त्रज्ञ यांनी अधिकचे संशोधन करून जीवाची उत्पत्ती, मानवाची उत्पत्ती कशी झाली हे शोधून काढले. आज डी एन ए सारखे तंत्र उपलब्ध झाल्यामुळे मानवी उत्पत्ती बाबत शास्त्रज्ञ अधिक अधिकारवाणीने बोलत आहेत.
          पृथ्वीवर प्राण्यांच्या,वनस्पतींच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. डायनासोर सारखा विशालकाय प्राणी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. जीवाला जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो, या संघर्षात त्याला निसर्गाशी, वातावरणाशी, परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते, जे जुळवून घेतात ते टिकतात, ज्यांना असे जुळवून घेणे शक्य झाले नाही ते नष्ट झाले आहेत. 'जे तंदुरुस्त तेच वाचतात' द सर्व्हायावल ऑफ फिटेस्ट  हा साधा सोपा नियम जीवसृष्टीला लागू आहे. जे फिटेस्ट होते तेच सर्व्हायवल आहेत. 
         भूख,भय,निद्रा, मैथुन ही चार प्राणिमात्रांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मनुष्य हा देखील प्राणीच असल्यामुळे त्याच्यात ही चारही वैशिष्ट्ये आहेत. पण तरीही इतर प्राणी आणि माणूस यांच्यात काही बाबतीत जमीन अस्मानाचा फरक आहे.
      मनुष्य वगळता इतर सर्व प्राणी निसर्गाला आहे त्या स्थितीत स्वीकारतात, त्यात ते स्वतःच्या डोक्याने काहीही बदल घडवीत नाहीत, तसे करण्याची प्रतिभा त्यांच्यात दिसत नाही.
      भूक ही सर्व प्राण्यांची सामाईक गरज आहे. भूतलावरचे पशू पक्षी निसर्गात उपलब्ध असलेले वनस्पतीजन्य किंवा प्राणिजन्य अन्न मिळवतात आणि आपले उदरभरण करतात. ते आपल्या अन्नाच्या उपलब्धीसाठी भटकंती करतात पण स्वतःसाठी लागणारे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाहीत.
     पृथ्वीवर हिंस्र प्राणी आहेत, मांसाहारी प्राणी आहेत,शाकाहारी प्राणी आहेत,सरपटणारे प्राणी आहेत,तसेच पक्षी, कीडे,जीव,जंतू, जलचर आहेत, परंतु एका मर्यादे पलीकडे माणूस वगळता कोणत्याच जीवाकडे नवनिर्मितीचे कौशल्य नाही. अगदी आदीमानवाचा पूर्वज म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या गोरीला, चिंपाझी, वोरांगउट्टान, बोनोबो या बीन शेपटीच्या वानरातही असे कौशल्य नाही. 
      मानवात मात्र असे कौशल्य आहे, त्याच्या जवळ असलेले तंत्रज्ञान, साधने, इच्छाशक्ती आणि कौशल्य याच्या जोरावर त्याने नवनिर्मिती केली आहे. किंबहूना सांस्कृतिक पर्यावरण निर्माण केले आहे. आज त्याने पृथ्वीतलावर जी नवनिर्मिती केली आहे ,जे सांस्कृतिक पर्यावरण निर्माण केले आहे. ते एकाएकी झालेले नाही.
        माणसाच्या विकासाचे देखील अनेक टप्पे आहेत. वानर ते कपीमानव हा टप्पा गाठायला त्याला खूप मोठा काळ लागलेला आहे. मानववंशशास्त्र अभ्यासकांनी मानवाच्या उत्पत्तीचा आणि विकासाचा जीवाश्म अवशेषशाच्या सहाय्याने अभ्यास केला आहे. 
      नोव्हेंबर १९२४ मध्ये रेमंड डार्ट या मानववंश शास्त्रज्ञाला  आफ्रिकेच्या दक्षिण भागात  होसवाल जवळ टोरा या ठिकाणी उत्खनणात एका बालकाचे अवशेष सापडले, त्याला 'ऑस्ट्रेलो पिथेकॉस आफ्रिकनस' हे नाव देण्यात आले. ऑस्ट्रेलो म्हणजे दक्षिणी आणि पिथेकॉस म्हणजे मानव सदृश्य प्राणी. १९७४ साली आफ्रिकेतील इथिओपिया मध्ये  मानवी मादीचा अष्मीभूत सापळा सापडला. संशोधकांच्या मते तो ३.१८ लाख वर्षांपूर्वीचा आहे. संशोधकांनी तीला 'लुसी' असे नाव दिले. तिलाच'मानव माता' म्हणूनही संबोधले. 'ऑस्ट्रेलो पिथेकोस आफ्रिकनस' हा मानव सदृश्य प्राणी पृथ्वीवर एक ते चार लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. तो आपल्या पुढच्या दोन पायाचा उपयोग हाता सारखा करू शकत असे. तो शरीराचे संतुलन राखण्यासाठी पाठीत वाकून चालत असे, त्याचा पाठीचा कणा वाकलेला होता. त्याची उंची  चार फूट होती. त्याच्या मेंदूचा आकार ४५० ते ७०० घन सेंटीमीटर होता. 'ऑस्ट्रेलो पिथेकोस आफ्रिकनस' या मानव सदृश्य प्राण्याचा विहार आफ्रिकेतील सवाना प्रदेशापुरता सीमित होता असे अनुमान मानववंश शास्त्रज्ञांनी काढलेले आहे.
       'ऑस्ट्रेलो पिथेकोस आफ्रिकनस' या मानव सदृश्य प्राण्यानंतरचा मानवी विकासाचा पुढचा टप्पा 'जीवाश्म मानव' म्हणजेच 'होमो इरेक्टसचा' आहे. होमो म्हणजे मानव , इरेक्टस म्हणजे ताठ उभा. होमो इरेक्टस म्हणजे  दोन पायांवर उभा राहून चालणारा माणूस. 'ताठ कण्याचा माणूस'. 
          इ.स. १८९१ मध्ये इउजीन डुबॉय या मानववंश शास्त्रज्ञाने  जावा म्हणजेच इंडोनेशियातील सोलो नदी काठी ट्रीनील येथे  जीवाष्म शोधून काढले. प्रा. डेव्हिडसन ब्लॅक यांना१९२६ मध्ये चीन या देशात पेकिंग जवळ दोन दात अवशेष स्वरूपात आढळले. हे जीवाश्म अवशेष 'होमो इरेक्टस' या कपी मानवाचे आहेत. जावा आणि पेकींग बरोबरच आफ्रिका, भारत, युरोपातील हंगेरी फ्रांस आदी ठिकाणी होमो इरेक्टसचे जीवाश्म अवशेष आढळले. भारतात नर्मदा नदीच्या उत्तर बाजूला,मध्यप्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील हथनोरा येथे  मादीची कवटी सापडली , हे अवशेष डॉ.अरुण सोनकिया यांनी शोधून काढले. त्यामुळे भारतात देखील प्राथमिक स्तर मानव उत्पत्ती झालेली होती. भारतात काही लाख वर्षापूर्वी 'होमो इरेक्टस' हा मानव अस्तित्वात होता हे आता जगाने मान्य केले आहे.
      १९ लाख वर्षांपूर्वी ते ७०००० वर्षा पूर्वी पर्यंत होमो इरेक्टस हा कपीमानव असावा असे अनुमान मानववंश शास्त्रज्ञांनी काढले आहे.  या मानवाला 'जीवाश्म मानव' म्हणजेच 'होमो इरेक्टस' म्हंटले जाऊ लागले. 
        होमो इरेक्टस पूर्वीचे बीन शेपटीचे वानर गोरीला, चिंपांझी, वोरांग उट्टान, बोनोबो इ. दोन पायांवर उभे राहतात पण चालतांना चतुष्पाद प्राण्यासारखेच चालतात. होमो इरेक्टस म्हणजेच जीवाश्म मानव.  हा पहिला प्राणी आहे जो दोन पायांवर  उभे ताठ राहून चालतो. त्यामुळे त्याचे दोन्ही हात मुक्त झाले. त्याच्या हाताचा अंगठा प्रत्येक बोटापर्यंत पोहोचत होता त्यामुळे त्या हाताने तो कोणत्याही वस्तूची घट्ट पकड करू लागला, वस्तू फेकून मारणे त्याला शक्य झाले. त्याचे हात मुक्त असणे हेच नवनिर्मितीसाठी  सहाय्यभूत ठरले. होमो इरेक्टस दगड, काठी, हाडे यांचा हत्यारा सारखा वापर करू लागला. त्यामुळे त्याला अती उंच झाडावरची फळे पाडून खाणे जसे जमू लागले तसेच छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार करणे अधिक सुलभ होऊ लागले. त्याला त्याच्यापेक्षाही धिप्पाड आणि अजस्त्र प्राण्यांची शिकार करणे शक्य होऊ लागले.
    होमो इरेक्टसच्या मेंदूचा आकार ७५० ते १३०० घन सेंटीमीतर होता. त्याचे कपाळ अरुंद आणि तिरपे होते. त्याचे नाक चपटे आणि रुंद होते, त्याचे ओठ जाड होते. त्याची दातांची ठेवण जवळपास आजच्या माणसाशी मिळतीजुळती होती. त्याची उंची सरासरी पाच ते साडे पाच फूट होती, त्याचे वजन सरासरी पन्नास ते साठ किलो होते.
      होमो इरेक्टसला मानवी विकासातील प्रथम स्तर समजले जाते. याचा पाठीचा कणा सरळ होता.ऊन वारा पावसाशी संघर्ष करीत जगतांना त्याने हत्यारे निर्माण केली ती प्रगत आणि प्रमाणबध्द होती. त्या हत्यारांच्या वापरामुळे  त्याचा सांस्कृतिक विकास देखील होत होता. इ. स.पूर्व दोन लाख ते एक लाख वर्षांपूर्वी त्याने आगीवर नियंत्रण मिळवलेले होते.           
        मानवी विकासाच्या पुढच्या टप्प्यात 'निएण्डरथल मानव' महत्त्वाचा आहे. त्याला 'शक्तिमान मानव' म्हणूनही ओळखले जाते. त्याचे अवशेष जर्मनी देशातील निएण्डरथल येथे सापडले. या मानवाचा विस्तार युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडात झालेला होता.निएण्डरथल मानवाचा मेंदू विकसित होता. त्याच्या मेंदूचा आकार १४०० घन सें. मी. होता. तो झोपडीत राहत होता, तो सर्वहारी होता. म्हणजेच तो मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही प्रकारचे अन्न खात होता. त्याला जुजबी  आवाज काढण्याची क्षमता प्राप्त झाली होती. तो चामड्याचे कपडे वापरत होता. गोटे आणि छिलके तासून त्यापासून त्याने भाला, कुऱ्हाड आदी हत्यारे बनवली होती. तो समूहाने राहत होता. दगडावर दगड घासून अग्नी निर्माण करण्याची कला त्याला अवगत होती, अन्न भाजण्यासाठी तो अग्नीचा वापर करीत होता. रात्रीच्या अंधारात प्रकाश निर्मितीसाठी देखील तो अग्नीचा वापर करीत असे. मृत व्यक्तीच्या प्रेताचा  तो दफनविधी करीत होता. हा निएण्डरथल मानव तीस हजार वर्षांपूर्वी नष्ट झाला.
       मानवी विकासाच्या पुढचा टप्पा 'होमो सेपियन' म्हणून ओळखला  जातो. याला 'बुद्धिमान मानव' म्हणतात. हा आधुनिक मानवाचा पूर्वज आहे. याचे अवशेष फ्रान्स मधील क्रोमोनान येथे आढळले म्हणून याला क्रोमोनान मानव असेही म्हणतात.त्याचाही विस्तार युरोपसह आशिया आणि आफ्रिका खंडात झालेला होता. क्रोमोनान मानव गुहेत राहत होता, त्याच्या मेंदूचा आकार १६५० घन सें. मी. होता, 
            होमो सेपियन हा ताठ उभे राहुन चालणारा हा मानव आधुनिक मानवाचा पूर्वज आहे. हा देखील समूहाने राहत होता. याची जीभ लवचिक व पातळ होती, त्याचे स्वरयंत्र विकसित झालेले होते, त्यामुळे तो शब्दांचे उच्चारण करू शकत होता. त्यामुळे भाषा विकसित झाली.त्याची हत्यारे,अवजारे अधिक प्रगत आणि अचूक होती. तो गुहेत नुसता राहत नव्हता तर त्याने गुहेत काढलेली रंगीत चित्र आजही अवशेष रुपात अस्तित्वतात आहेत.हा अधिक विचार करणारा मानव होता. 
            मानवाने अग्नीवर नियंत्रण मिळवले.त्याला अग्नीचा वापर हवा तेंव्हा करता येऊ लागला. मानव शिजवलेले अन्न खाऊ लागला. कालौघात त्याच्या तोंडाचा,दाताचा,जबड्याचा आकार छोटा होत गेला, तोंडाचा आकार लहान होतांनाच त्याच्या मेंदूचा आकार मात्र मोठा होत गेला. मानवाच्या मेंदूचा आकार वाढल्याने त्याची प्रतिभा आणि प्रगल्भता वाढत गेली यासाठी मानवी विकासाची अगणित वर्ष खर्ची पडली आणि आजचा आधुनिक प्रतिभासंपन्न प्रगल्भ मानव साकार झाला.
      होमो सेपियन मानव ते आधुनिक मानव या उत्क्रांतीचा अभ्यास केवळ जीवशास्त्र किंवा मानववंशशास्त्र पुरता मर्यादित करून चालणार नाही. हा कालखंड मानवी प्रगतीचा खूप गतीमान कालखंड आहे. या काळात माणसाने जी प्रगती घडवून आणली ती विविधांगी आहे. त्या प्रगतीचे अनेक पैलू आहेत. हे पैलू काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण चिंतनच्या पुढील भागात करणार आहोत. 
- हिरालाल पगडाल, संगमनेर
- ९८५०१३०६२१

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: