Logo

सत्याचा शोध - हिरालाल पगडाल, संगमनेर

- 23/11/2021   Tuesday   8:39 am
सत्याचा शोध -  हिरालाल पगडाल, संगमनेर

हे विश्व विराट आणि अनंत आहे. कोणी निर्माण केले हे ब्रह्मांड ?, कधी निर्माण झाले हे ब्रह्मांड ? कसे निर्माण झाले हे ब्रह्मांड? असे एक ना अनेक प्रश्न माणसाला पडत आलेले आहेत. जो माणूस चिकित्सक आहे तो या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न करतो.

जो माणूस स्थितीशील आहे, ज्याला डोक्याला कोणताही ताप नको आहे तो या भानगडीत पडत नाही. 'बाबा वाक्यं प्रमाणम' या न्याय्याने थोरामोठ्यांनी जे सांगितले, लिहून ठेवले तेच खरे असे समजून आपली वाटचाल चालू ठेवतो. बहुसंख्य माणसे ही सारी देवाची किमया आहे असे समजतात आणि शांत राहतात. ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ती असू द्यावे समाधान ।। हे त्यांचे साधे सोपे गणित असते. पण याने प्रश्न सुटत तर नाहीत, उलट नवे प्रश्न निर्माण होतात. माणसाच्या या श्रद्धेचा चपखल फायदा उठवून त्याला भक्तीच्या बाजारात ओरबाडले जाते.  भक्त सत्य काय असत्य काय याची शहानिशा करत नाही. देव धर्म, पूजा अर्चा, कोप  प्रकोप, भूत बाधा, नशीब कर्म प्राक्तन, पाप पुण्य, पूर्वजन्म   पुनर्जन्म, जप जाप, उपास तपास, भूत भविष्य, आकार निराकार या चक्रात देवाभोळी माणसे अडकून पडली आहेत. 'आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे काही चालेना' यांवर भक्ताचा ठाम विश्वास असतो. आपण जणू कळसूत्री बाहुली आहोत, जे काही चालले ते ईश्वराच्या इच्छेनुसार चालू आहे अशी त्याची पक्की धारणा आहे.
      याच धारणेचा फायदा दलाल मंडळी घेतात. ते  देव आणि भक्त यांच्यात मध्यस्थ बनतात . भक्तांची जी देवांवर श्रध्दा असते त्याचा फायदा घेऊन हि मंडळी स्वतःची पोतडी भरतात. भक्त आहे तिथेच राहतो पण देवाचे नावाने दलाली करणारी मंडळी गब्बर बनत जातात. या दलालांनी भक्तांची  मती गुंग करून टाकली आहे. कोणताही धर्म ,कोणताही पंथ याला अपवाद नाही.
       जो माणूस प्रश्नांची खरी उत्तरे शोधायला बिचकतो तो माणूस भ्रामक आणि काल्पनिक उत्तर मान्य करतो , त्याला देवाच्या नावावर जो बाजारहाट चालू असतो त्यात गुरफटून जाण्याशिवाय पर्याय नसतो.
     काही माणसांना मात्र प्रश्न पडतात ,ते त्याचे उत्तर शोधण्यासाठी जंग जंग पछाडलेले असतात. ते प्रत्येक बाबीला का? आणि कसे?     (Why and How) असे प्रश्न विचारतात आणि त्याच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करतात. असे  प्रश्न अनेक संशोधकांना पडले म्हणूनच त्यांनी अनेक शोध लावले आणि सृष्टीतील अनेक नियम  शोधून काढले. 
      माणसांना प्रश्न  पडलेच पाहिजेत आणि त्याची उत्तरे देखील शोधलीच पाहिजे. शोधता शोधता उत्तरे सापडतात , या उत्तरातून माणसाचे जगणे अधिक सुखकर  होण्यास मदत होते.
     हे 'ब्रह्मांड', हे 'विराट आणि अनंत विश्व' कसे निर्माण झाले आहे, केंव्हा निर्माण झाले आहे या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ध्यास माणसाने हजारो वर्षांपासून घेतला आहे. काहींनी त्या उत्तराच्या जवळपास जाण्यापर्यंत मजल मारली आहे.
     तेरा ते वीस अब्ज वर्षांपूर्वी आपल्या विश्वाची निर्मिती झाली असावी. काही शास्त्रज्ञांच्या मते तेरा ते वीस  अब्ज वर्षापूर्वी हे विश्व एक बिंदू स्वरूपात होते, त्यानंतर एक महास्फोट (big bang) झाला. त्यातून रिकाम्या अंतराळात काही द्रव्य फेकले गेले, त्यातूनच  आज अस्तित्वात असलेल्या विश्वाची निर्मिती झाली, दर्शिका, आकाशगंगा, सुर्यकुल ,पृथ्वी हे सारे त्यानंतरच निर्माण झाले.
         १९३१ मध्ये जॉर्ज लेमायटर या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा महास्फोटाचा सिध्दांत मांडला. एडविन हबल या शास्त्रज्ञाने अतिशय सूक्ष्म आणि दीर्घकाळ अंतराळाचे निरीक्षण केले आणि हे विश्व केंद्रबिंदू पासून पसरले जात आहे, विश्वातील घटकांचे एकमेकांपासूनचे अंतर वाढत आहे. ते   दूर दूर जात आहेत, त्यामुळे आकाशगंगा देखील एकमेकांपासून दूर जात आहेत, त्यांच्यातील अंतर वाढत आहे. असे निरीक्षण नोंदवले आहे.
        तेरा ते वीस अब्ज वर्षांपूर्वी एका महास्फोटातून विश्वाची निर्मिती झाली हा एक सिद्धांत आहे. हा सिद्धांत मान्य केला  तरी त्यापूर्वीची स्थिती काय होती याबाबत कोणीही काहीही ठामपणे भाष्य केलेले नाही, त्याबद्दलची संदिग्धता आणि कुतूहल आजही कायम आहे. पण जो काही ज्ञात सिध्दांत आहे तो काही कमी महत्वाचा नाही . शास्त्रज्ञ त्याचा शोध घेत आहेत. जो पर्यंत मानवाला विश्वाच्या निर्मितीचे गूढ उकलण्याची जिज्ञासा आहे तो पर्यंत माणूस काहींना काही प्रयत्न करत राहणार आणि गूढ उकलण्याच्या दिशेने प्रयत्न करीत राहणार हे मात्र नक्की.
     आपली पृथ्वी कशी निर्माण झाली याबाबतीत देखील खगोल शास्त्रज्ञांनी काही सिध्दांत मांडले आहेत. आपली पृथ्वी सुर्यकुलाचा भाग आहे, ती सुर्या भोवती फिरते आहे. दोन ते चार अब्ज वर्षांपूर्वी सूर्यापासून लांब फेकले गेलेले तुकडे तुकडे स्वरूपातील द्रव्य पदार्थ एकमेकांशी आकर्षित होऊन त्याचे काही ग्रह, बटू ग्रह, लघु ग्रह, धुमकेतू, धुळीचे महाकाय लोट बनले. यां सर्वाचे मिळून आपली सूर्यमाला तयार झाली आहे. त्यातील एक ग्रह आपली पृथ्वी आहे असा सिध्दांत काही शास्त्रज्ञ मांडतात.
    मी शाळेत होतो तेव्हा म्हणजे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी आमच्या भूगोलाच्या पुस्तकात आणखी एक वेगळाच सिध्दांत मांडलेला आहे. आपल्या सुर्या जवळून एक तारा पास झाला, तो पास होतांना त्या ताऱ्याच्या आकर्षणामुळे सूर्याचा  काही भाग खेचला गेला. तो तारा निखळून निघून गेला पण सूर्यापासून तूटलेले तुकडे सूर्याभोवती फिरत राहिले, फिरता फिरता ते स्वतः गोल गरगरीत झाले, त्यांचे ग्रह तयार झाले. पृथ्वी याच प्रक्रियेतून निर्मा ण झाली असा काही शास्त्रज्ञांचा दावा आहे.
   सूर्य हा एक तप्त वायुरूप गोळा आहे, त्याच्यावर सतत वायूंचे स्फोट चालू आहेत, त्यामुळे तो तप्त व प्रकाशमान आहे. त्याच्यापासून दूर फेकले गेलेले तुकडे देखील सुरुवातीला तप्त आणि वायुरूप होते.  पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता स्वतः भोवती फिरते आहे त्यामुळे पृथ्वी गोलाकार बनली. त्याचे कवच हळूहळू थंड होत गेले तरी पृथ्वीच्या पोटात तप्त लाव्हारस आजही आहे आणि कधी कधी तो लाव्हारस ज्वालामुखीच्या स्फोटातून बाहेर पडतो आणि तो थंड  झाला की त्याचा खडक बनतो हि प्रक्रिया आजही चालू आहे., पृथ्वी हा सुर्यकुलातील वातावरण असलेला एकमेव ग्रह आहे.  पृथ्वीवर पाणी आहे. त्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी आहे.
        'पृथ्वी गोल आहे, आणि ती स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते' हा सिद्धांत कोपर्निकस, गॅलिलिओ यांनी मांडला.  तो सिद्धांत सप्रमाण सिध्द देखील केला.
       गॅलिलिओने आकाशातील ग्रह तारे यांचे निरीक्षण करणारी दुर्बीण शोधली. त्या दुर्बिणीतून सुर्यकुलातील ग्रह, उपग्रह यांचे निरीक्षण केले.  पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी नाही ,पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे ठाम प्रतिपादन गॅलिलिओने केले.  तत्कालीन धर्ममान्यतेनुसार पृथ्वी भोवती सूर्य तारे फिरतात असे मानले जात होते. गॅलिलिओच्या सिद्धांतामुळे धर्म मार्तंड खवळले. इ.स.१६३३ मध्ये चर्च द्वारा गॅलिलिओचा छळ झाला, त्याला तुरुंगात टाकण्यात आले. त्याला बळजबरीने माफी मागायला लावली. त्याचे सिद्धांत चूक आहेत असे त्याच्याकडून बळजबरीने लिहून घेतले. दुर्दैवाने गॅलिलिओचा मृत्यू बंदिवासातच झाला. गॅलिलिओ कडून बळजबरीने काहीही लिहून घेतले, त्याला बंदिवासात टाकले त्याने सत्य बदलले नाही. काळाच्या ओघात गॅलिलिओचे प्रतिपादन बरोबर होते हे सिध्द झाले. चर्च, पोप चूक होते हे स्पष्ट झाले. साडे तीनशे वर्षानंतर १९९२ साली पोपने  गॅलिलिओचे सिध्दांत बरोबर होते हे मान्य केले . इ.स.१६३३ मध्ये चर्चने गॅलिलिओला केलेली शिक्षा, व दिलेली वागणूक चूक होती हे देखील पोपने मान्य केले.
        एक खरे आहे की, जगात चमत्कार वगैरे काहीही नाही. ही सृष्टी आणि सृष्टीतील सर्व घडामोडी नियमबद्ध आहेत. त्या पैकी काही नियमांचा उलगडा माणसाला झाला आहे. अद्यापही बऱ्याच नियमांचा उलगडा माणसाला होणे बाकी आहे.  सृष्टीतील अनेक बाबी बाबत माणसाला अज्ञान आहे. या अज्ञानाची उकल करण्याचा प्रयत्न विज्ञान करीत असते, म्हणूनच 'जे अज्ञानाचे  रूपांतर ज्ञानात करते त्याला विज्ञान म्हणतात.
      विज्ञानाचे निष्कर्ष हे सत्याच्या कसोटीवर उतरलेले असतात. विज्ञानाचे  निष्कर्ष  सर्वांना स्वीकारावेच लागतात, कारण विज्ञानाचे निष्कर्ष  सार्वत्रिक असतात, त्यात व्यक्तिसापेक्ष बदल होत नाही. त्यात निश्चितपणा असतो. त्याची अनुभूती सर्वांना सारखी येत असते. विज्ञान सातत्याने आपणच शोधलेल्या नियमांचे शोधाचे सूक्ष्म अवलोकन करीत असते. त्यामुळे माणसाच्या ज्ञानात नवी भर पडत असते. अशी नवी भर पडत असतांना जुने शोधलेले शोध किंवा नियम देखील बेदखल होऊ शकतात.
        विज्ञान आणि सत्य एकमेकांशी निगडित असतात. आनंदी जगण्यासाठी सत्याची साथसोबत आवश्यक असते. सत्य नेहमी पवित्र असते म्हणूनच ते शीव देखील असते. जगात जे जे सत्य आणि शीव आहे तेच सुंदर देखील आहे. सत्य स्वीकारणे, सत्याची साथसोबत करणे आणि सत्याचा शोध घेणे म्हणजेच खरे जीवन होय.

हिरालाल पगडाल, संगमनेर ९८५०१३०६२१

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: