Logo

ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या निमित्ताने - युवराज संभाजी राजे छत्रपती

- 20/03/2020    
ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या निमित्ताने - युवराज संभाजी राजे छत्रपती

महापुरुषांना जाती - प्रांताच्या बंधनात अडकवून चालणार नाही, असं मला वाटतं. मी त्या शिवाजी महाराजांचा वंशज आहे, ज्यांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. मी त्या राजर्षी शाहू महाराजांचा वंशज आहे, ज्यांनी बहुजन समाजाला न्याय दिला. सर्व जाती-पातींना सोबत घेऊन जाण्याची शिकवण शिव- शाहूंनी दिली आहे. कुणी कोणत्या जातीत जन्माला आला म्हणून श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नसतो. तो आपल्या कर्तृत्वाने मोठा किंवा लहान ठरत असतो.

राजर्षी शाहू महाराजांनी दाखवून दिले आहे, की सामान्य अस्पृश्य समाजातील व्यक्ती सुद्धा विचाराने आणि कर्तृत्वाने मोठा असेल तर त्याचा आदर केला पाहिजे. ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या निमित्ताने राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संबंधांवर थोडासा प्रकाश टाकावा म्हणून....
कोल्हापूर राज्यातील  माणगाव येथे २१ व २२मार्च १९२०रोजी अखिल महाराष्ट्र अस्पृश्य वर्गाची परिषद झाली, त्याला आज १००वर्षे पुर्ण झाली. या परिषदेचे प्रमुख पाहुणे राजर्षी शाहु छत्रपती महाराज तर , अध्यक्ष डाँ. बाबासाहेब आंबेडकर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यापक कार्याची सुरुवात या परिषदे पासून झाली. 
बाबासाहेबांच्या जिवनातील सामाजिक, राजकीय, वैचारिक, संघटनात्मक वाटचालीत "माणगाव" परिषदेचे महत्व मोठे आहे.
राजर्षी शाहू महाराजांनी, केलेल्या भाषणात पुर्वास्पृश्य समाजाला आपल्या "जातीचा पुढारी करा"असे आवाहन करुन, डॉ आंबेडकरांना 'पंडित' व 'विद्वानांचे भुषण' म्हणून गौरवलेले होते. येऊ घातलेल्या भारताचे नेतृत्व सुद्धा आंबेडकर करतील अशी भविष्यवाणी राजर्षींनी केली होती.
 भाषणाच्या सुरुवातीस शाहू राजांनी आंबेडकरांचा उल्लेख "माझे प्रिय मित्र आंबेडकर" असा करताच हजारो दलितांनी महाराज आणि बाबासाहेब यांचा अखंड जयघोष करीत टाळ्यांचा पाउसच पाडला. प्रत्यक्ष छत्रपती आंबेडकरांना "प्रिय मित्र" म्हणतात याचे त्यांना कौतुक वाटले.
डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या नेत्रुत्वामुळे दलित उद्धाराच्या चळवळीला निर्णायक उभारी मिळाली.
22 तारखेला आंबेडकरांनी मांडलेला एक ठराव संमत करण्यात आला तो सर्वांनी वाचावा. तो असा, "श्रीमन्महाराज शाहू छत्रपती सरकार, इलाका करवीर यांनी आपल्या राज्यात बहिश्कृतांना समानतेचे हक्क देऊन, त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभिले आहे. याबद्दल (कृतज्ञता म्हणून) त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सनाप्रमाणे साजरा करावा."
यातून आपल्याला हे लक्षात येईल की त्याकाळी महापुरुषांनी सर्व समाज एकत्र आणण्यासाठी किती प्रामाणिक प्रयत्न केले होते. त्याच बरोबर  त्यांचा परस्पर संबंध सुद्धा आदरयुक्त होता हे ही लक्षात येईल.
पण उठता, बसता फुले, शाहु ,आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या या महाराष्ट्रात परस्पर जातीतले आंतर कमी करण्यासाठी आपल आयुष्य खर्ची करणाऱ्या या महापुरुषांच्या नावावरच आज जातींची अस्मिता कुरवळण्याचे प्रयत्न चालू आहेत. 
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल 'स्वराज्य'  सर्वसामान्य शेतकरी व कष्टकऱ्यांच होत. राजर्षी शाहू छत्रपतींची वाटचाल शिवछत्रपतींच्या आदर्शावरतीच चालत होती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून या दोघांना अभिप्रेत असणारेच सुराज्य मांडले. असे मला वाटते.
आजच्या दिवशी, माणगाव परिषद शताब्दी च्या निमित्ताने आपण सर्वांनी हाच संकल्प करूया की सर्वच महापुरुषांची जातीय बंधनातून मुक्तता करूया. आणि सर्व समाज एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करूया.

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: