Logo

बामसेफ़च्या मुखोट्यात दडलेला संघ .....

- 20/04/2020    
बामसेफ़च्या मुखोट्यात दडलेला संघ .....

’ जय मुलनिवासी, ब्राम्हण विदेशी ’ असे सांगत बेंबीच्या देठापासुन ब्राम्हण व आंबेडकरी समुहाला शिव्या घालणारे संघटन म्हणजे बामसेफ़. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श सांगायचे आणि त्यांचा सिद्धांत नाकारायचा, त्यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याचा धिक्कार करण्यासाठी संघपरिवारानेच जन्माला घातलेले मनुवादी व्यवस्थेचे दुसरे अपत्य आणि हिंदुराष्ट्र निर्मीती करीता कार्यरत कर्मचा-यांचे एक मोठे संघठन म्हणजे बामसेफ़ आहे. त्याची पाळेमुळे आणि कार्यप्रणाली तपासली असता अनेक धक्कादायक बाबी समोर येतील.



बाबासाहेबांच्या जाती निर्मुलानाच्या विरोधात जावुन जाती गोळा करण्याचा हा उद्योग करण्याचा कांशीराम चा उद्देश काय होता ? तर त्याचे उत्तर येते संघपरिवाराच्या इशा-यावर हे सर्व घडविण्यात येत होते.बामसेफ़ च्या स्थापनेच्या वेळी कांशीराम ह्यांच्या डोळ्यासमोर आर एस एस चा आदर्श होता.नोंदणी नसताना आर एस एस चे सुरु असलेले कार्य ह्या बद्दल कांशीराम ह्यांना कौतुक होते.मुळात संघपरिवार हा देखील हिंदुना संघटीत करुन ’हिंदुराष्ट्र’ निर्मिती च्या ध्येयासाठी काम करीत आहे.संघाचे नेतृत्व वरच्या जातीचे लोक करीत असल्याने खालच्या जातीचे लोक त्यांचे नेतृत्व मान्य करीत नाहीत. ही संघासमोरची सर्वात मोठी अडचण होती.त्या साठी बामसेफ़चा वापर करण्यात आला.संघपरिवाराने वरच्या जातीचे संघठन करायचे आणि बामसेफ़ने खालच्या जातीचे असा हा खेळ आहे.आणि हिंदुंना संघटीत करुन ’हिंदुराष्ट्र ’ साकारायचे हा आहे दोन्ही संघटनांचा मुळ अजेंडा ठरविण्यात आला.
त्या साठी बामसेफ़ने "बॅकवर्ड अ‍ॅंड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्पलॉईज फ़ेडरेशन " अश्या जातीवाचक नावाचा स्विकार केला.या उलट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संघटना, संस्था, नियतकालिका ह्यांना नाव देतांना प्रचलीत धर्मव्यवस्था, सामाजिक व्यवस्था या विरोधातील लोकशाहीपुरक नावांची निवड केली होती.या उलट बामसेफ़ जातीवाचक नाव घेउन कामाला लागली. ही संघटना नेमकी काय आहे ह्याचे थोडक्यात उत्तर असे आहे -
·       जाती विरहीत समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी सहा हजार जातींचेच संघटन करते.
·       ’ जय भिम ’ एवजी ’ जय मुलनिवासी’ जयघोष करते.
·       पुणे कराराच्या निमीत्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याचा धिक्कार करते.
·       ’ वर्गणी एके वर्गणी ’ वसुली करते.
·       डॉ. बाबासाहेब आंबेडकर,भय्यासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाडा पासुन बाळासाहेब आंबेडकर आणि पुढे थेट नामांतर शहीदा पर्यंत सर्व विचारवंत, नेते, कार्यकर्त्यांना, समाजातील जनप्रतिनिधींना, दलाल, भडवे संबोधते.
·       बाबासाहेब स्वत:च्या घरी नेहरु करीता दारु ठेवत असत, असा नीच विनोद वामन मेश्राम भाषणात करतो.
·       बामसेफ़ी शिर्ष नेतृत्वच समलैंगिक, पैसा खाणारे, चारित्र्यहीन असल्या्चे आरोपाची भाषणे यु ट्युब वर उपलब्ध असलेले संघटन म्हणजे बामसेफ़.
·       शाहु, फ़ुले, आंबेडकरांसहीत आदर्शांची भली मोठी यादी असणारे परंतु भाषा, भाषणे, वर्तन व प्रवृत्ती प्रचंड विसंगती असणारे संघटन म्हणजे बामसेफ़.
·       जातीय अन्याय, अत्याचार,आरक्षण, शिष्यवृत्ती, जातीय दंगल ह्या साठी एकदाही मोर्चा, आंदोलन, जनहीत याचिका न करणारी संघटना म्हणजे बामसेफ़.
·       आंबेडकरी समुहाला ’धेड’, ’महार ’ संबोधणा-या कांशीरामला युगात्मा मानणारा वर्ग म्हणजे बामसेफ़.
 
पार्श्वभुमी :-
 
बामसेफ़ची स्थापना कांशीराम ह्यानी केली आहे.बामसेफ़ स्थापने बाबत त्याचे संस्थापक सदस्यात कमालीचे मतभेद आहे. डी.के. खापर्डे हे १९७३ ला पुण्यात तर सी.पी. थोरात हे १९७३ ला दिल्लीत स्थापना झाल्याचे सांगतात.बामसेफ़चे प्रवर्तक कांशीराम हे ६ डिसेंबर १९७८ ला बोट क्लब दिल्ली ला स्थापना झाल्याचे सांगतात.कांशीराम ह्यांनी ६ डिसेंबर हाच दिवस का निवडला ? जगातील शोषित,पिडीत व सर्वहारा समुहाच्या जिवनातील अत्यंत दु:खाचा दिवस.त्याच महापरिनिर्वाण दिनाला डी एस फ़ोर अर्थात जातीअधिष्ठीत संघटनेच्या स्थापना दिवस संस्थापक आणि संघटनेचा हेतु स्पष्ट करणारा आहे.दुसरे महत्वाचे म्हणजे सहा हजार जातीचे संघठन करताना बामसेफ़ हिंदु धर्माचे विरोधात भुमिका घेत नाही.ब्राम्हण, वैश्य व क्षेत्रीय यांना लक्ष करताना त्यांचे समाज व्यवस्थेतील स्थान कायम राखते.मनुचा धर्म व हिदुत्व ह्याचा त्याग करणे हे खरे समता, स्वातंत्र्य, बंधुता स्विकारण्या सारखे होते.परंतु बामसेफ़ ही जातींची संघटना असल्याने हिंदु धर्मातील सहा हजार जातींचे संघटन हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की, " जात ही केवळ संघठन विरोधी आहे, असे नव्हे तर सुधारणा विरोधी देखील आहे.जातीच्या आधारावर कोणत्याही योजनेची इमारत उभारता येत नाही.तुम्ही राष्ट्र निर्मीती करु शकत नाही.तुम्ही जातीच्या आधारावर काहीही करायला जाल तर ते कोसळुन पडल्याशिवाय राहणार नाही."
महाराष्ट्रातील हरिजनवादी डी. के. खापर्डे यांनी बहुजनवाद किंवा मुलनिवासीवादाचे विष आंबेडकरी समाजात पेरले आहे. " आर्य ब्राम्हण विदेशी होत व इथले संपुर्ण अनुसुचीत जाती, अनुसुचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक लोक या आर्यब्राम्हणा व्यतिरिक्त आहेत असल्या मुळे मुलनिवासी ठरतात," असा शोध लावण्यात आला.तोच मुलनिवासी सिद्धांत अनुसुचीत जाती, अनुसुचित जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक गळी उतरविला जात आहे. बामसेफ़च्या आदर्शांची यादी पाहील्यास लक्षात येते की त्या मध्ये बुद्ध, कबीर किंवा सम्राट अशोक नाहीत.त्याचे कारण संघपरिवार व बौद्ध संस्कृती च्या पारंपारिक संघर्षाला लक्षात घेवुन बामसेफ़ने बाबासाहेबांचे गुरु व आदर्श नाकारले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजव्यवस्थेची, संस्कृतीची, धर्मग्रंथांची कठोर चिकित्सा केली आहे. मानववंशशास्त्राच्या आधाराने त्यांनी जातीय व्यवस्थेचे सैद्धांतिक विश्लेषण केले आहे. आर्य बाहेरून आले व त्यांनी मूळच्या अनार्याना जिंकून दास्य किंवा गुलाम बनविले. आर्य म्हणजे ब्राह्मण आणि बाकीचे अनार्य म्हणे शूद्र वा बहुजन अशा आजवरच्या तकलादू इतिहासाला आंबेडकरांनी शूद्र पूर्वी कोण होते आणि अस्पृश्य मूळचे कोण होते, या दोन शोधप्रबंधांत छेद देणारे नवे निष्कर्ष काढले आहेत. शूद्र हे पूर्वी आर्यच होते, शूद्रांचे हिंदू-आर्य समाजात मूळचे स्थान दुसऱ्या म्हणजे क्षत्रिय वर्णात होते. ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यातील वर्चस्ववादातून शूद्रांना चौथ्या वर्णात टाकून त्यांना खालचा दर्जा देण्यात आला, असे बाबासाहेब सांगतात.आर्य परकीय असतील तर मग पूर्वाश्रमीच्या शूद्रांना आणि आताच्या बहुजनांना परके ठरविण्यासारखे आहे. त्यानंतर अस्पृश्य मूळचे कोण, याचाही बाबासाहेबांनी शोध घेतला आहे. ते म्हणतात, विभिन्न वंशांचा निर्णय करण्याचे वांशिक शरीररचनाशास्त्र हेच खरे शास्त्र असेल, तर हिंदू समाजातील विभिन्न जातींना या शास्त्राची कसोटी लावून पाहिल्यास अस्पृश्य हे आर्य आणि द्रविड वंशापेक्षा भिन्न वंशाचे लोक आहेत, हा सिद्धांत कोलमडून पडतो. या मोजमापावरून हे सिद्ध होत आहे की, ब्राह्मण व अस्पृश्य हे एकाच वंशाचे लोक आहेत. जर ब्राह्मण आर्य असतील तर अस्पृश्यही आर्यच आहेत. ब्राह्मण जर द्रविड असतील तर अस्पृश्यही द्रविडच आहेत. ब्राह्मण नाग वंशाचे असतील तर अस्पृश्यही नाग वंशाचे आहेत. त्या आधारावर अस्पृश्यतेला वंशभेदाचा आधार नाही, असा निष्कर्ष बाबासाहेबांनी काढला आहे. चातुवर्ण व्यवस्थेत अस्पृश्य या अवर्णाची उपपत्ती कशी झाली, त्यालाही कोणता संघर्ष कारणीभूत आहे, हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. परंतु बाबासाहेबांनी येथील सर्व समाजव्यवस्थेचे मूळ शोधून काढले आहे, शूद्र पूर्वी कोण होते हे सांगितले, अस्पृश्य मूळचे कोण होते, याचीही सैद्धांतिक उकल करून दाखविली आहे. मुलनिवासीवादाचे प्रचारक ब्राम्हण किंवा आर्य बाहेरुन आले असे मानतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र शूद्र पूर्वी कोण होते आणि अस्पृश्य मूळचे कोण होते, या ग्रंथात आर्य हे बाहेरुन आल्याचे नाकारले आहे.बामसेफ़ी बाबासाहेबांचा हा सिद्धांत नाकारतात.
त्या करीता हे मुलनिवासी बामसेफ़ी आर्य संस्कृती व सिंधु संस्कृती वेगवेगळ्या आहेत म्हणुन आर्य बाहेरुन आले होते असे ठोकुन देतात.त्यांना माहीतच नाही की, सिंधु संस्कृतीतुन  मिळालेल्या अवशेषात मुळ गोष्टी सिद्ध करणारी लिपीच अजुन वाचता आलेली नाही.त्याही पुढे जाउन बाबासाहेबांचा सिद्धांत खोटा ठरविण्यासाठी हे महाभाग ’ डी एन ए चाचणी’ मधुन ब्राम्हण किंवा आर्य हे बाहेरुन आल्याचे सिध्द झाले असे बरळतात.बाबासाहेबांच्या काळात ही चाचणी करण्याची सोय नव्हती म्हनुन बाबासाहेबांनी आर्य बाहेरुन आले असे सिध्द करता आले नाही. हे सांगण्याचे धाडस देखील बामसेफ़ी करतात ! मुळात " डी एन ए चाचणी व्दारे " जन्मलेल्या किंवा गर्भातील बालकाचे आई वडील कोणते एवढेच निश्चित करता येते.डी एन ए चाचणी व्दारे भारतातील सर्व जाती धर्म व त्यांचा वंश कोणता हे ठरविता येत नाही.हे सॅम्पल घेताना उच्च, मध्यम आणि निम्न जातीतील केवळ आठ जाती समुहातील केवळ दहा व्यक्तीची निवड करण्यात आली होती व ते देखील आंध्र प्रदेशातुन घेण्यात आले आहेत.जेंव्हा की या देशातील एका राज्यातच हजारो जाती आढळुन येतात. ह्या डी एन ए चाचणीतील दुसरी त्रुटी अशी आहे की, त्या मध्ये केवळ ब्राम्हण, क्षेत्रीय आणि वैश्यांचाच उल्लेख आहे.शुद्र, अतिशुद्र व आदिम जातींच्या सॅम्पलचा उल्लेख नाही किंवा त्यांचे तुलनात्मक विश्लेषण केले गेले नाही. तरीही अनुवांशिक संशोधनाचे विश्लेषण केले असता भारतीय ब्राम्हण जाती युरोशियन लोकांशी आनुवांशिक दृष्टीने निकटचे ठरत असले तरी ब्राम्हण जाती युरोशियन लोकांपेक्षा जास्त क्षेत्रिय व वैश्य जातीच्या जवळचे ठरतात.त्या मुळे क्षेत्रिय व वैश्य आणि ब्राम्हण हे भारतातील रहीवाशी ठरतात.त्यायोगे बाबासाहेबांनी ’हु वेअर शुद्राज’ मध्ये केलेले संशोधन खरे ठरते.तरी देखील मुलनिवासीवादाचे पुरस्कर्ते जाणिवपुर्वक खोटा आणि भ्रामक प्रचार करत आहेत.
ब्राम्हण, क्षेत्रीय व वैश्य हे मुलनिवासी नसतील तर मग छत्रपती शिवाजी महाराज, शाहु महाराज हे क्षेत्रीय राजे बामसेफ़च्या आदर्श्यांच्या यादीत कसे ह्याचे उत्तर बामसेफ़ देत नाही.त्याचे कारण बामसेफ़ला केवळ सत्ता हवी आहे.संघपरिवार व बामसेफ़ ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत.खालच्या जातीचे संघटन करण्यासाठी वरच्या जातींना शिव्या घालायच्या.आणि गोळा केलेल्या सहा हजार जाती हिंदुत्वाशी जोडुन बाबासाहेबांच्या जाती तोडण्याच्या लढ्याला शह द्यायचा हा डाव आहे.
त्या करीता आंबेडकरी नेतृत्व उभे होवु नये म्हणुन आंबेडकरी चळवळीतील नेत्यांच्या बदनामीची, खालच्या स्तरावर जावुन शिव्या घालण्याची मोहीम सुरु केली आहे.समदुखी: असणा-या लहान जाती समुहांनी आंबेडकरी नेते, पक्ष ह्यांना मते देउ नये ह्यासाठी त्यांना दलाल, भड्वे सांगितले जाते.संघाला पुरक असाच हा सर्व प्लान आहे.कांशीराम, मायावतींनी देखील उत्तर प्रदेशात सत्ता मिळविण्यासाठी तिनदा भाजपा आणि संघाचा पाठिंबा घेतला होताच.त्यामुळे आज उत्तर प्रदेशात भाजपाला अभुतपुर्व यश प्राप्त झाले आहे.बसपा आणि मायावतींच्या बॅंकखात्याचा तपशील ह्या सर्व बाबींची साक्ष देण्यास पुरेसा आहे.तोच आदर्श घेवुन बामसेफ़ कार्यरत आहे.बामसेफ़ला अपेक्षित व्यवस्था परिवर्तन हे समाजव्यवस्थेशी संबंधित नसुन सत्तेशी संबंधित आहे.म्हणुनच बामसेफ़ कधीच जातीय अन्याय, अत्याचार,आरक्षण, शिष्यवृत्ती, जातीय दंगल, अ‍ॅट्रोसिटी कायदा, एस सी एस टी बजेट  साठी एकदाही मोर्चा, आंदोलन, जनहीत याचिका दाखल करत नाही.रस्त्यावर उतरत नाही. तर ई व्ही एम मशिन साठी मात्र मोर्चे काढते. सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भाषा करते पण याचिका दाखल करत नाही.
हल्ली तर सोशल मिडीयावर वामन भक्तांनी बाबासाहेबां पेक्षा वामन मेश्राम ह्यांची भिती मनुवाद्यांना असल्याचा प्रचार सुरु केला आहे.हे खरे आहे का ? तर अजिबात नाही. कारण देशात भारत मुक्ती मोर्चा, बामसेफ़ मनुवादाला आव्हान ठरल्या असत्या तर दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश आधी वामन मेश्राम आणि विलास खरात ठार केले गेले असते.तब्बल २५ वर्षे ब्राम्हन, हिंदु देवी देवता ह्यांना जाहीररित्या शिव्यांची लाखोली वाहणारे मेश्राम व खरात हे पहीले लक्ष्य बनले असते.संघाला पुरक असेच कार्य करत असल्यानेच त्यांना मोकळे रान आहे.आणि गेली अनेक वर्षे शिव्या घालुन ब्राम्हण किंवा मनुवादी व्यवस्थेचे एक केसही वाकडे झालेले नाही.उलट देशातील अनेक राज्यात सत्ता व देशातील राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानासहीत एकहाती सत्ता स्थापन करता आलेली आहे.त्याचे कारण म्हणजे बामसेफ़च्या मुखवट्यात दडलेल्या संघपरिवाराच्या अजेंड्याला जाते.
 
राजेंद्र पातोडे
अकोला.
९४२२१६०१०१

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: