Logo

आपले संविधान भाग-६१ भाग तिसरा-मूलभूत अधिकार* , धर्म स्वातंत्र्याचा अधिकार

- 25/06/2022   Saturday   7:10 am
आपले संविधान भाग-६१ भाग तिसरा-मूलभूत अधिकार* , धर्म स्वातंत्र्याचा अधिकार

भारतीय संविधानाने दिलेल्या धर्म स्वातंत्र्याविषयी आपण माहिती घेत आहोत. याबाबत प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आजपासून आपण *अनुच्छेद-२५* काय आहे ते सविस्तरपणे पाहूया...

अनुच्छेद -२५:- सद्सदविवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसार--*

   *१):-* सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांच्या व या भागातील अन्य तरतुदींना अधीन राहून सद्सदविवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याच्या व त्याचा प्रसार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारख्याच हक्कदार आहेत.

     म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला आपल्या *सद्सदविवेक बुद्धीला* पटेल त्या धर्माच्या आचरणाचा अधिकार असेल. *यात नास्तिकता देखील अंतर्भूत आहे.* तसेच प्रत्येकाला आपल्या धर्माचे *विविध धार्मिक विधी करण्याचा अधिकार आहे.* शिवाय आवडीच्या *धर्मानुसार वागण्याचे* आणि त्या *धर्माचा प्रसार* करण्याचा देखील प्रत्येकाला अधिकार देण्यात आलेला आहे.

    अनुच्छेद-२५(१) वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की, यात मुख्यतः चार शब्दांवर अधिक जोर देण्यात आलेला आहे.

  *१) सद्सदविवेक बुद्धीचे स्वातंत्र्य:-*  येथे सद्सदविवेक बुद्धीचा संदर्भ व्यक्तीच्या अंतर्मनाशी संबंधित आहे. म्हणजेच *एखादी व्यक्ती त्याला अंतर्मनातून आवडणाऱ्या कोणत्याही धर्माला स्वीकारू शकते.* जर एखादी व्यक्ती एखाद्या धर्माला मानत नसेल, परंतु एखाद्या त्याच्या दृष्टीने पूजनीय असलेल्या महात्म्याला मानत असेल, तर त्याला तसं मानण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते पण त्याच्या मूलभूत अधिकारात मोजले जाते.

    याबाबत २०१४ मध्ये एक केस सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. केरळ राज्यातील काही व्यक्तींनी सांगितले की, आम्ही येशू ख्रिस्तांना आदरणीय तर मानतो पण, ख्रिश्चन धर्म मानत नाही. केरळ सरकारने विचारले की, मग तुमचा धर्म कोणता आहे?, ते तर सांगावे लागेल. लोकं म्हणाली, कसं सांगणार, आम्ही नास्तिक आहोत. ते सुप्रीम कोर्टात गेले. तेव्हा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, *नास्तिक असणे देखील त्या व्यक्तींचा मूलभूत अधिकार आहे.* कारण त्यांच्या अंतर्मनातून त्यांच्या सद्सदविवेकबुद्धीला ते पटलेले आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा समान दर्जा मिळण्याचा अधिकार आहे. *राज्य कोणालाही त्याचा धर्म विचारणार नाही.* ते पूर्णपणे  त्या व्यक्तीच्या स्वइच्छेवर अवलंबून आहे.

   *२) धर्माचे मुक्त प्रकटीकरण:-* प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीच्या धर्माचे मुक्तपणे प्रकटीकरण करण्याचा अधिकार आहे.

   *३) धर्माचे आचरण:-*  प्रत्येक व्यक्तीला आपल्या *आवडीच्या धर्माशी संबंधित असलेले विविध धार्मिक विधी, कर्मकांडे, उपासना इत्यादी करण्याचा अधिकार आहे.* आणि त्या त्या धर्माच्या उपासनेसाठी त्या त्या धर्माच्या प्रार्थना स्थळांवर देखील जाण्याचे स्वातंत्र्य आहे.

    यासंदर्भात अतिशय प्रसिद्ध अशी एक केस अलिकडच्या काळात सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. *केरळ राज्यातील शबरीमाला मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यास नाकारण्यात आले होते.* कारण होते या वयोगटातील महिलांना मासिक धर्म येत असल्याने, त्या दरम्यान मंदिराचे पावित्र्य भंग होऊ शकते. या वयोगटातील महिला या प्रवेशबंदी विरोधात सुप्रीम कोर्टात गेल्या. की आमच्या अनुच्छेद-१५ प्रमाणे मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होत आहे. *कारण अनुच्छेद-१५ स्पष्टपणे सांगते की, लिंगाच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीसोबत भेदभाव होणार नाही.* आणि मग येथे तसा भेदभाव का?

    *सुप्रीम कोर्टाने देखील या महिलांचे म्हणणे मान्य केले.* आणि निकाल दिला की, सदर मंदिरात या वयोगटातील महिलांना प्रवेशास घालण्यात आलेली बंदी उठविण्यात यावी आणि त्यांनाही मंदिरात प्रवेश देण्यात यावा.

  *४) धर्माचा प्रचार:-*  प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीच्या धर्माच्या विकासासाठी *सकारात्मक मार्गाने प्रचार करण्याचा अधिकार आहे.* परंतु नकारात्मक मार्गाने नाही.

    याबाबतीत *१९७७ मधील स्टॅनी स्लाव विरुद्ध मध्य प्रदेश* ह्या केसचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, *धर्माचा प्रसार करण्याचा अधिकाराचा असा अजिबात अर्थ नाही की, मनमानी पद्धतीने, जोर जबरदस्तीने व विविध प्रलोभने दाखवून दुसऱ्याचा धर्म परिवर्तन करणे.* अशा पद्धतीने धर्माचा प्रसार करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.

     *क्रमशः*

                      *संकलन-नुरखाॅं पठाण*

                                 *गोरेगाव रायगड*

                                 *7276526268*

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: