Logo

आपले संविधान-भाग ५९ भाग तिसरा-मूलभूत अधिकार धर्म स्वातंत्र्याचा अधिकार

- 05/04/2022   Tuesday   7:47 am
आपले संविधान-भाग ५९ भाग तिसरा-मूलभूत अधिकार धर्म स्वातंत्र्याचा अधिकार

संविधानाच्या भाग-तीन मध्ये आपण सर्व भारतीयांना देण्यात आलेल्या मूलभूत अधिकारांचा अभ्यास करत आहोत. आत्तापर्यंत आपण *समानतेचा अधिकार (अनुच्छेद-१४ ते १८), स्वातंत्र्याचा अधिकार (अनुच्छेद-१९ ते २२)

आणि शोषणाविरुद्धच्या अधिकाराविषयी (अनुच्छेद-२३ ते २४)*  सविस्तर माहिती घेतली. आजपासून आपण आपला *चौथा मूलभूत अधिकार असलेला धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराविषयी सविस्तर माहिती अनुच्छेद-२५ ते २८* च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
    धर्म स्वातंत्र्याच्या बाबतीत आपल्या संविधानात अनुच्छेद-२५ ते २८ असे एकूण चार कलमे आहेत. ते सविस्तरपणे जाणून घेण्याअगोदर, आपल्याला *धर्म स्वातंत्र्य म्हणजे काय? हे समजून घेणे आवश्यक आहे*. धर्म स्वातंत्र्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की, *आपल्या भारत देशात प्रत्येक व्यक्तीला आपल्या पद्धतीने धर्माचे आचरण करण्याचा वा स्वीकार करण्याचा अधिकार आहे.* कोणतीही व्यक्ती स्वेच्छेने कोणताही धर्म स्वीकारू शकते. येथे धर्माचा अर्थ फक्त हिंदू, मुस्लिम, बौद्ध एवढाच अभिप्रेत नाही; तर ह्या विविध धर्मांतर्गत देखील विविध प्रकारचे धर्माचरण होताना आपण बघतो. *म्हणजेच एकाच धर्माची असलेली लोकं वेगवेगळ्या पंथांना मानणारे असतात.* उदा. हिंदू धर्मात शैव, वैष्णव, वारकरी पंथ; मुस्लिम धर्मात सिया व सुन्नी; जैन धर्मात दिगंबर व श्वेतांबर इत्यादी. आणि म्हणूनच प्रत्येकाला आपापल्या श्रद्धेप्रमाणे आपापल्या पद्धतीने धर्माचरण करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे.
    आपण जर अधिक बारकाईने बघितले, तर आपल्या लक्षात येईल की, या पद्धतीचा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार फक्त २५ ते २८ या चार कलमांमधूनच मिळालेला आहे असं नाही; तर याची तार आपल्या मागील अभ्यासलेल्या कलमांसोबत देखील जोडलेली आहे.
   *अनुच्छेद-१४ सांगते की, कायद्यानुसार सर्व समान आहेत.* याचा अर्थ असा की, वेगवेगळ्या धर्माचे पालन व आचरण करणारे सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा आहे. आपण कुठल्याही धर्माचे आचरण केले तरी त्या दर्जात फरक पडत नाही. 
   *अनुच्छेद-१५ मध्ये पण धर्म, जात, पंथ, लिंग याआधारे आपल्या सोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.* म्हणजेच कोणत्याही धर्माचे आचरण आपण करू शकतो वा कोणताही धर्म आपण स्वीकारू शकतो. आपल्यासोबत त्याआधारे कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही.
   *अनुच्छेद-१६ मध्ये देखील सार्वजनिक क्षेत्रात रोजगाराची संधी ही धर्म, जात, वंश यांच्या आधारे नाकारली जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.* म्हणजेच इथे आपण कुठल्याही धर्माचे असलो वा स्वीकारला तरी आपल्या सोबत रोजगाराची संधी मिळताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही.
    *अनुच्छेद-१७ मध्ये देखील अस्पृश्यता नष्ट करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.* म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला अस्पृश्य म्हणून एखाद्या धार्मिक कृती वा आचरणापासून रोखण्यात येत असेल, तर याचा अर्थ त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे धर्माचरण करू दिले जात नाहीये; आणि त्याला तसं न करु देणे हे त्याच्या धर्म स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. आणि *म्हणूनच तर अनुच्छेद-१७ नुसार अस्पृश्यता थेट संपवण्यात आली आहे.* म्हणजेच कुठे ना कुठे इथे पण धर्म स्वातंत्र्याचा संबंध आहे.
    *अनुच्छेद-१९ आपल्याला अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य देतो.* म्हणजेच कुठे ना कुठे आपण आपल्या आवडीचे धर्माचरण करून आपल्या धर्मालाच तर अभिव्यक्त करत असतो ना! 
   *म्हणजेच थोडक्यात अनुच्छेद-१४, १५, १६, १७, १९ हे सर्व कुठे ना कुठे धर्म स्वातंत्र्याशी संबंधित आहेत; एकमेकांशी सुसंगतपणे जोडल्या गेले आहेत.* म्हणजे जर धर्म स्वातंत्र्याशी संबंधित असलेल्या अधिकारांचे उल्लंघन होत असेल, तर कुठे ना कुठे ह्या सर्व अनुच्छेद-१४,१५,१६,१७,१९  या सर्वांचे देखील उल्लंघन होऊ शकते.
    *क्रमशः* 
                   *संकलन-नुरखॉं पठाण*
                               *गोरेगाव-रायगड*
                               *7276526268*

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: