Logo

आपले संविधान भाग-६० भाग तिसरा-मूलभूत अधिकार धर्म स्वातंत्र्याचा अधिकार

- 17/05/2022   Tuesday   7:23 am
आपले संविधान भाग-६० भाग तिसरा-मूलभूत अधिकार धर्म स्वातंत्र्याचा अधिकार

भारतीय संविधानाने दिलेल्या धर्म स्वातंत्र्याबाबत आपण माहिती घेत आहोत. कालच्या भागात आपण बघितले की, आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या पद्धतीने धर्माचे आचरण करण्याचा अधिकार आहे.

आता व्यक्तीच्या धर्म स्वातंत्र्याबाबत आपण बघितले; *पण काय आपल्या राज्याला पण धर्म आहे?* ह्या प्रश्नाचं उत्तर मिळते ते १९७६ मध्ये झालेल्या ४२ व्या घटना दुरुस्तीमध्ये! 
   *१९७६ मध्ये ४२ वी घटनादुरुस्ती करून आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकेत एक अतिशय महत्त्वाचा शब्द जोडण्यात आला; तो म्हणजे धर्मनिरपेक्षता (Secularism).* हा शब्द स्पष्टपणे सांगतो की, राज्याचा धर्म काय आहे. धर्मनिरपेक्ष या संकल्पनेचा अर्थ खूप महत्त्वाचा आहे. *एस.आर.बुमाई विरुद्ध भारतीय संघ* या केस मध्ये सुप्रीम कोर्टाने धर्मनिरपेक्षतेचा अर्थ अधिक स्पष्ट केलेला आहे. *धर्मनिरपेक्ष राज्याचा अर्थ राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही; परंतु राज्य मात्र सर्व धर्मांच्या प्रसार-प्रचार आणि विकासासंदर्भात समान तत्त्वावर काम करेल.* कोणत्याही एखाद्या विशिष्ट धर्माला प्राधान्य दिले जाणार नाही.
    आता राज्याला कोणताही धर्म नाही म्हटल्यावर १९९२ मध्ये यासंदर्भात देखील सुप्रीम कोर्टात एक केस दाखल झाली होती. *जर राज्याला कोणताही धर्म नाही म्हटल्यावर, मग राज्य नास्तिक आहे का??* याबाबत पण सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे निकाल दिला की, *राज्याचा जरी कोणताही अधिकृत धर्म नसला, तरी राज्य मात्र नास्तिक नाही.* कारण राज्य देशातील सर्व धर्मांच्या प्रसार-प्रचार व विकासाच्या बाबतीत जर समान तत्त्वावर काम करत असेल, तर मग ते नास्तिक कसे? फक्त कुठल्याही एका विशिष्ट धर्माला प्राधान्य देणार नाही. त्यामुळे राज्य नास्तिक पण नाही.
   आता धर्मनिरपेक्षता (secularism) हा शब्द अमेरिकन राज्यघटनेतून घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. परंतु अमेरिकेतील आणि भारतातील धर्मनिरपेक्षतेमध्ये खूप फरक आहे. *अमेरिकेची धर्मनिरपेक्षता नकरात्मक बाजूची असून भारतातली धर्मनिरपेक्षता मात्र सकारात्मक बाजुची आहे, असे म्हटले जाते.* असे का? तर अमेरिकेत सरकारने स्वत:ला धर्मापासून पूर्णतः अलिप्त करून घेतलेले आहे. *तेथील सरकार धार्मिक बाबतीत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही.* परंतु भारतात मात्र तसे नाही. भारतात धर्माच्या अनुषंगाने कायदे देखिल शासन बनवू शकतात, हे अनुच्छेद-२५ चा अभ्यास करताना आपल्या लक्षात येईलच. *म्हणजेच भारतात सरकार तटस्थ आणि निरपेक्ष पद्धतीने सर्व धर्मांच्या बाबतीत काम करू शकते.*
    *क्रमशः*
                      *संकलन-नुरखॉं पठाण*
                                 *गोरेगाव रायगड.*
                                 *7276526268*

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: