Logo

हिंदू धर्मात देव, आत्मा याला जागा आहे पण मनुष्याच्या जीवनाला कोठे आहे ? -डॉ. बाबासाहेब आंबेडकर

- 07/06/2022   Tuesday   7:41 am
हिंदू धर्मात देव, आत्मा याला जागा आहे पण मनुष्याच्या जीवनाला कोठे आहे ? -डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मुंबई येथील बौद्धधर्म सल्लागार समितीतर्फे दिनांक १४ जानेवारी १९५५ रोजी वरळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आयोजित करण्यात आले. सभेला ५० हजारापेक्षा जास्त समुदाय हजर होता.

                हिंदू धर्मात देव, आत्मा याला जागा आहे
                  पण मनुष्याच्या जीवनाला कोठे आहे ?
                  -डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 या सभेला संत गाडगे महाराज, श्री. अनंत हरी गद्रे, श्री. संत मोडके महाराज, कांबळे, करमाळेकर तसेच दलित फेडरेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
      "बऱ्याच दिवसांपासून मी असा एक निर्णय घेतला होता की, कोणत्याही सार्वजनिक कार्यात नुसत्या व्याख्यानासाठी कधीच हजर राहावयाचे नाही.   कारण नुसत्या व्याख्यानबाजीचा मला कंटाळा आला आहे.   व्याख्यानात माझा सारा जन्म गेला आहे, उभी हयात गेली आहे.  तथापि, माझ्या व्याख्यानांचा समाजावर काहीच परिणाम झाला नाही, असे नाही.   आज माझ्यापुढे अस्पृश्य समाजात जी जागृती झालेली दिसून येत आहे, ती माझ्या व्याख्यानांचेच फळ आहे, असे मी अभिमानाने सांगू शकतो.

      जागृती हे जरी समाजाच्या उन्नतीचे मुख्य अंग असले तरी नुसत्या जागृतीचा उपयोग नाही.   समाजाच्या उन्नतीकरिता काही विधायक कार्यक्रमाची आवश्यकता आहे.  समाजात एखाद्या माणसाने जागृती केली व त्याच्या मरणानंतर समाजाला दिशा दाखविणारा दुसरा एखादा कर्तबगार पुरुष निर्माण झाला नाही, तर एकखांबी तंबूप्रमाणे समाज मोडकळीस येतो.

      मला आता काहीतरी विधायक कार्यक्रम करायला पाहिजे.   परंतु त्याकरिता पैशाची अत्यंत जरूर आहे.   त्यासाठी पैसा हवा आहे.   मी एक मोठा याचक आहे.   समाजातील इतर लोकांचे अंतरंग जर निर्मळ असेल व त्या निर्मळ अंतःकरणाच्या लोकांना आपले कार्य मंगल आहे असे वाटले व त्यांनी जर द्रव्याची मदत केली तर आम्हाला ती हवीच आहे; परंतु त्यांच्या मदतीवर आपण विसंबून राहून चालणार नाही.   आपण आपल्या बळावर उभे राहिले पाहिजे.

      "ज्याचे मढे तोच खांद्यावर उचलतो"   तद्वतच आपल्या कार्याचा भार आपणच उचलला पाहिजे.   आपल्या कार्याला आपणच मुक्त हस्ताने दान दिले पाहिजे.

      *आज माझा धर्मोपदेशाचा उपोद्घात आहे.   बौद्ध धर्मासंबंधी मला सांगावयाचे आहे.   बौद्ध धर्माची माझी घोषणा आजकालची नसून मी चौदा वर्षांचा विद्यार्थी होतो तेव्हापासूनची आहे.   चौदा वर्षांचा असताना बौद्ध धर्माशी माझा परिचय झाला.    चौदा  वर्षांचा असतानाच रामायण, महाभारत, कृष्णलीलामृत, शिवलीलामृत, श्रीधराख्यान वगैरे सर्व मराठी ग्रंथ माझ्या वडिलांनी मजजवळून दहा दहा वेळा वाचून घेतले होते.   वडिलांच्या अशा वागण्याचा निदान त्यावेळी तरी मला कंटाळा आला होता.*

      एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये असताना मी कुठली तरी एक परीक्षा पास झालो होतो.   ज्या 'बटाट्याच्या चाळीत' मी राहात होतो तेथील लोकांनी मी पास झाल्याबद्दल अभिनंदनपर सभा घ्यावयाचे ठरविले.   दादा केळूस्करांना मध्यस्थी घालून मोठ्या प्रयासाने तेथील लोकांनी माझ्या वडिलांची परवानगी घेतली.   एक टेबल खुर्ची मांडून सभेस सुरुवात झाली.   पण काय, सभेला काही निवडक लोक सोडून कोणीच हजर नाही.   जो तो लंगोटी लावून आपापल्या उंबरठ्यावर व ओट्यावर पान, तंबाखू चघळीत बसलेला होता.   सभेचे महत्त्व कोणालाच समजलेले नव्हते.

      पण आज परिस्थिती निराळी आहे.   आज अस्पृश्य समाज जागृतीने बराच पुढे आहे.   लहानपणी माझ्या अभिनंदनाप्रित्यर्थ जी पहिली सभा घेण्यात आली तिचे अध्यक्ष श्री. दादा केळूसकर होते.   त्यावेळेला मी सभेत काय वेडेवाकडे बोल बोललो असेन ते मला आता आठवत नाही.   भाषण संपल्यानंतर केळूस्करांनी गौतम बुद्धाचे छोटेसे चरित्र मला बक्षीस म्हणून दिले. रामायण-महाभारतासारखे बरेच ग्रंथ मी वाचून काढले होते.   तसेच हेही पुस्तक मी वाचले.   परंतु बुद्धाची शिकवण व इतर ग्रंथांची शिकवण यात बरीच तफावत आहे, असे मला आढळून आले.   पुढे या पुस्तकासारखी नवीन नवीन पुस्तके जसजशी मी वाचू लागलो तसतसा माझ्या डोक्यात नवा प्रकाश पडू लागला.   बुद्ध धर्म कसा व हिंदू धर्म कसा, दोहोत किती भेद आहे, किती निराळी दृष्टी आहे हे मला कळू लागले.

      माझे वडील म्हणत असत की, आपण गरीब आहोत.   पण आपली महत्त्वाकांक्षा अत्यंत दांडगी पाहिजे.   महाभारतातील द्रोणाचार्य गरीब होते.   द्रोणाच्या मुलांना त्यांची आई पाण्यात बाजरीचे पीठ मिसळून दूध म्हणून पाजित असे.   कर्ण हा गरीबीतूनच वर आला.   थोर पुरुष नेहमी गरीबीतून जन्माला येतात.   हाती पडलेले गौतम बुद्धाचे चरित्र वाचून माझे मन डळमळू लागले आणि मग इतर धर्मग्रंथांचे पठण मला बरोबर वाटले नाही.   वडील वारल्यानंतर अशा धर्मग्रंथ पठणाची ब्याद माझ्या मागून निघून गेली.

      *उच्च शिक्षणासाठी म्हणून मी अमेरिकेला गेलो.   तेथेही बुद्ध धर्माचा बराच अभ्यास केला.   बुद्ध धर्म काय आहे हे समजावून घेण्याकरिता व बुद्ध धर्म-चरित्राने मनात उडविलेली खळबळ शमविण्याकरिता मी तेथे बरेच वाचन केले.   बराच विचार केला.   तेव्हा हिंदू धर्म व बुद्ध धर्म यातील अंतर मला कळून चुकले.   बौद्ध धर्माचे माझे वेड बरेच पुरातन आहे.*
   
      *लोक म्हणतात राजकारणात माझी हानी झाली.   आता बुद्ध धर्मानेही माझे नुकसान होणार आहे.   परंतु नुकसान माझे होणार आहे, ते नुकसान सोसण्यास मी तयार आहे.   धर्म ही माझी खाजगी बाब आहे.   बुद्ध धर्म मला पटला.   तो मी उचलला.   राजकारणातील खोट्या निवडणुका मला नको आहेत.   खोट्या निवडणुकांनी मी महामंत्री सुद्धा होऊ शकेन; पण ते मला नको.   राजकारण म्हणजे क्रिकेटचा खेळ नव्हे.   तो एक सांप्रदाय आहे.   रामानंदी, कबीरपंथी माणसाला तू पंथ सोड, असे सांगितल्याने तो पंथ सोडणार नाही.   त्याचप्रमाणे माझा धर्म अटळ आहे.   हा धर्म मी एकदा स्वीकारला, मग मला त्या मार्गानेच गेले पाहिजे.*

      *बौद्ध धर्म मी स्वीकारला आहे.    तुम्हीही स्वीकारा.   नुसत्या अस्पृश्य समाजानेच तो स्वीकारून चालणार नाही तर साऱ्या  भारताने व त्याबरोबर साऱ्या जगानेही बुद्ध धर्म स्वीकारावा, अशी माझी इच्छा आहे. (टाळ्या)*

      *बुद्ध धर्म मी का स्वीकारला, ते तुम्हास सांगतो.   याची कारणमीमांसा करणे योग्य आहे.   गौतम बुद्धाला पहिल्या प्रथम पाच शिष्य मिळाले.   त्यांना पंचवर्गीय भिक्खु असे म्हणतात.   एकंदर चाळीस शिष्य झाल्यानंतर बुद्धाला वाटले आपण शिष्यांना अनुज्ञा करावी.   धर्मप्रचारासाठी दूरदूर पाठवावे.   त्यावेळी बुद्ध धर्माची व्याख्या गौतम बुद्धाने शिष्यात सांगितली ती अशी : 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, हिताय, सुखाय, देव मनुस्सानं, धम्म आदी कल्याणं, मध्य कल्याणं, अंति कल्याणं '.*
     
       बुद्ध धर्म हा बहुजन लोकांच्या हिताकरिता, सुखाकरिता, त्यांच्यावर प्रेम करण्याकरिता आहे.   हा धर्म नुसत्या माणसांनीच स्वीकारून चालणार नाही, तर देवांनीसुद्धा त्याचा स्वीकार करावयास पाहिजे. (टाळ्या)   
ज्याप्रमाणे ऊस हा मुळातही गोड असतो, मध्येही गोड असतो व शेंड्यासही गोड असतो, त्याचप्रमाणे *बुद्ध धर्म सुरवातीलाही कल्याणकारक आहे, मध्येही कल्याणकारक आहे व शेवटीही कल्याणकारक आहे.   या धर्माचा आदि, मध्य, अंत सर्व गोड, हितकारक व कल्याणकारी असे आहेत.*  

       पण कोणीही मला सांगावे की, आमचा हिंदू धर्म-ज्याला मी ब्राह्मणी धर्म समजतो-हा  'बहुजन हिताय, बहुजन सुखाय ' आहे काय ?   ब्राह्मण व इतर विद्वान लोक सांगतात की, ब्राह्मणी धर्माची संस्कृती १० हजार वर्षांपूर्वीची आहे.   जुनी संस्कृती आहे, पण आजही हिंदू धर्मात ७ कोटींच्यावर अस्पृश्य आहेतच.   समाजातून बहिष्कृत केल्यामुळे जंगलात राहाणारे वन्य व चोऱ्या करून उपजीविका करणारे असंख्य गुन्हेगार लोकही या धर्मात आहेत.   सांगा, अशा हिंदू धर्माला  ' बहुजन हिताय, बहुजन सुखाय ' धर्म म्हणता येईल काय ?

      जगातील काही कम्युनिस्ट वगळले तर असा एकही मनुष्य आढळणार नाही, ज्याला धर्म नको आहे.   त्याचप्रमाणे धर्म आम्हालाही पाहिजे.   पण तो सत् धर्म हवा.   असा सत् धर्म म्हणजे जेथे सर्व लोक समसमान राहातील, सर्वांना सारखीच संधी मिळेल, तोच खरा धर्म.   बाकीचे सारे अधर्मच होत.

      *हिंदू धर्माच्या शिकवणीप्रमाणे जर सर्वत्र ब्रह्मच आहे तर मग महारात, मांगात, चांभारातही ते असले पाहिजे.   मग हिंदू धर्मात अशी असमानता का ?*

      *इ. स. १९१० साली जेव्हा हिंदु-मुसलमानात जातीयवादावर बखेडा सुरु झाला तेव्हा हिंदू कोणास म्हणावे, हिंदूची व्याख्या काय, असा कठीण प्रश्न उपस्थित झाला.   तेव्हा भारतातील अकरा विद्वानांनी अकरा निरनिराळ्या व्याख्या केल्या.*   *हिंदू शब्दाच्या व्याख्येतील बेबनाव व बेबंदशाही खरोखरच हास्यास्पद आहे.   कुणाचाही ताळमेळ बसत नाही.*   

सावरकरांची हिंदू शब्दाची व्याख्या पाहा-
     *' आसिंधु: सिंधु पर्यंता यस्य भारत भूमिका ।*
     *पितृभुभु: पुण्यभुश्चैव सवै हिंदु: इति उच्यते ।।*
      
तर राधाकृष्णन यांची व्याख्या काही निराळीच आहे.   ती टिळकांच्या व्याख्येशी जुळते घेत नाही.   टिळकांचा ' हिंदू ' म्हणजे-
    *' प्रामाण्य बुद्धिर्वेदषु साधनानाम् अनेकता उपास्या नाम नियम: '*
      असे मानणारा आहे.   टिळकांच्या दृष्टीने  ' हिंदू '  म्हणजे वेदांना प्रमाण मानणारा पुरुष.   मग धर्माचरणात त्याची साधना काही जरी असली तरी चालेल.   एखाद्या हिंदू मनुष्याने वेदांना प्राधान्य देऊन  'पिराची' जरी पूजा केली तरी हरकत नाही, तो हिंदूच.   टिळकांच्या या व्याख्येला काय ठाव आहे.   मग सांगा, असा धर्म  'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' होईल काय ?  (टाळ्या)

       बुद्ध धर्माची प्रतिष्ठापना पाहून बऱ्याच लोकांनी कोल्हेकुई सुरू केली आहे.   वर्तमानपत्रातून ओरड केली.   पण मला आताच त्यांच्याकडे पाहावयास वेळ नाही.   एकदा सर्वांचे लिखाण होऊन जाऊ दे.   माझ्याविरुद्ध कोण कोण काय लिहितात हे बघू.   त्यांची लेखणी बंद झाली म्हणजे मी माझी लेखणी उचलीन.

      *धर्म हा प्रत्येक मनुष्यमात्राच्या जीवनाला अत्यंत आवश्यक व पोषक आहे.   इतर धर्माप्रमाणे आत्मा आहे काय ?   तो कोठे बसला आहे, हे मला माहीत नाही.   अंगठ्याएवढा आहे, की तो काळजाजवळ बसला आहे, कोणास ठाऊक ?   देव मला अजून दिसला नाही.   हिंदू धर्मात देव, आत्मा याला जागा आहे.   पण मनुष्याच्या जीवनाला कोठे जागा आहे ?*

      *"बुद्ध धर्मात मात्र भेदभाव नाही.   सर्वत्र समसमानता आढळून येईल.   बुद्धधर्मात देव, आत्मा यांचा विचार केलेला नसून माणसाने माणसाशी कशा प्रकारे वागले पाहिजे, याचा विचार केलेला आढळतो.   या धर्मात नीतीचे संबंध सांगितले आहेत, म्हणून हा सत् धर्म आहे.   बाकीचे धर्म झूट आहेत."*  
 ब्राह्मण आणि पुजाऱ्यांनी हिंदू धर्म बनविला आहे.   बुद्ध धर्मात मोक्ष मिळवून देण्यासाठी ख्रिश्चन लोकांसारखे पाद्री नाहीत व आत्म्यास सद्गती देणारे, पूजाविधी व यज्ञयाग करणारे ब्राह्मण तर मुळीच नाहीत.

      जो धर्म माणसाला कल्याण साधायला कारणीभूत होईल तोच धर्म.   बुद्ध धर्माचे अधिष्ठान हे जीवनात कल्याण साधायला अत्यंत आवश्यक आहे.   म्हणून या धर्माची महती आहे.

      अमेरिकेत ख्रिस्ती धर्माचा प्रादुर्भाव फार पुरातन कालापासून होता व आहे; परंतु अमेरिकेसारख्या प्रभावी राष्ट्रात दोन हजारावर बुद्ध भिक्षु आहेत.   पिढ्यान् पिढ्या चालत आलेला ख्रिस्ती धर्म लोकांनी सोडला व बौद्ध धर्म घेतला आहे.

      अमेरिकेमध्ये फौजेतील शिपाईसुद्धा बुद्ध धर्म अनुयायी आहेत.   एवढेच नव्हे तर बुद्ध धर्माबद्दल आस्था म्हणून शिपाई लोक आपल्या ड्रेसवर (गणवेश) बुद्ध धर्माचे चिन्ह लावतात.   अमेरिकन सरकारला बौद्ध चिन्ह वापरण्याबद्दल कायदे करण्यास त्यांनी भाग पाडले आहे.   अमेरिकेत एक नुकताच अवाढव्य विहार बांधण्यात आला.   त्याला साऱ्या जगातील देशांमधून जवळजवळ २० लाख रुपये देणगी मिळाली.

      जर्मनीत तर विचारायलाच नको.   बुद्ध धर्म प्रचारसंस्था हजारोंनी गणल्या जातात.   युरोपात असा एकही देश नाही की, जेथे बुद्ध धर्माचा प्रचार होत नाही.   *भगवान गौतम बुद्ध हा जगप्रसिद्ध युगपुरुष आहे.*   तेथील लोकांना रामाची, कृष्णाची, विष्णुची ओळख नाही.

      *जगाला हिंदुस्थानची आठवण म्हणजे गौतम बुद्धाची आठवण होय.   हिंदुस्थान देश हा याच जगप्रसिद्ध पुरुषाची जन्मभू म्हणून ओळखला जातो.   अजाणपणे ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेले हिंदी विद्वान लोक आज पश्चातापाने विव्हळ होऊन असे कबूल करीत आहेत की, तुलनात्मक दृष्टीने बौद्ध धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे.*

      *"आपणाला कल्याणकारक बुद्ध धर्म पाहिजे.   आपले पूर्वज अज्ञानी होते.   महारकी, भीक मागणे हीच यांची वर्तने.   त्यांना धर्माची काय आवड ?   पण आपण स्वावलंबी बनलो आहोत.   इतर वर्गांच्या जोडीला जाऊन आपल्याला उभे राहायचे आहे.  धर्मामध्ये उन्नतीचा मार्ग मोकळा हवा."*

      माझ्या इतर मित्रांचा असा समज आहे की, धार्मिक बाबींमुळे आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल.   मी काही आर्थिक प्रश्न हाती घेणार आहे.   धार्मिक बाबींमुळे आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल, असे 'एखाद्या गड्याचे अथवा भाऊचे' म्हणणे असेल तर त्याने मला आपली आर्थिक योजना दाखवावी.   मला जर त्या योजनेची कल्पना पटली तर मी माझी सर्व शक्ती त्या कार्याला वेचीन.

      ख्रिस्ती धर्मात व बुद्ध धर्मात अंतर आहे.   ख्रिस्ती धर्मात येशूने सांगितले आहे की, गरीब लोकहो, तुम्ही दारिद्र्याला भिऊ नका.   मेल्यावर सारे जग तुमचेच आहे.   (हंशा)   अशी बुद्ध धर्मात आर्थिक बाब डावलेली नाही.   

      एकदा अनाथपिंडीकाने भगवंताला आर्थिक बाबीबद्दल प्रश्न विचारला होता.   तेव्हा भगवंताने उत्तर दिले, "संपत्ती ही मानवी जीवनाला अत्यंत आवश्यक आहे.   संपत्ती गोळा करावी.   पण तिचा उपयोग दुसऱ्याला नाडण्यासाठी, गुलामगिरीत डांबण्यासाठी कधीही करू नये.   ती शुद्ध साधनांनी मिळवून तिचा सदुपयोग झाला पाहिजे."   *धर्म व अर्थ या दोन्हीही गोष्टी माणसाला अत्यंत आवश्यक आहेत.*   जीवनोपयोगी वस्तुंच्यासाठी धर्म व अर्थही पाहिजेत.

      वर्षातून एकदा तरी शेती नांगरण्याचे काम मालकाने केले पाहिजे, अशी शाक्य लोकांत रूढी होती.   त्याप्रमाणे भगवंताने वडिलांना प्रश्न केला, "दुसऱ्याच्या कष्टाचे फळ आम्ही खावे हे रास्त आहे काय ?"   आमचे अन्न आम्हीच कष्टाने मिळवून खाल्ले पाहिजे.   धर्म व अर्थ या दोन्हीही गोष्टी जोडीनेच केल्या पाहिजेत.   तेव्हा आपल्या योजनेने आर्थिक हानी होईल हे त्यांनी मला पटवून द्यावे.   नुसत्या अर्थानेही अनर्थ होईल.   अर्थामध्ये धर्म हवा आहे.

      कम्युनिझम हा कसा जगला ?   तो कसा टिकून राहिला ?   ही शक्तीची बाब आहे.   शक्ती आणि जबरदस्तीने तो टिकला आहे.   त्यांना प्राॅपर्टी, मालमत्ता हवी.   रशियामध्ये प्राॅपर्टीसाठी यादवी माजली आहे.   रशियातील कडक शिस्त बाळगणारे जमीनदार लुप्त होताच लोक उसळी मारून उठतील, बेबंदशाही माजेल आणि मग समाजाचा व्यवहार बेबंदशाहीने चालू लागेल.   बुद्धाचा धर्म कम्युनिझममध्ये आहे.   बुद्ध धर्मातील भिक्षुंप्रमाणेच कम्युनिस्टांना ठराविक जीवनोपयोगी वस्तू ठेवण्याचा अधिकार आहे.   तांब्या, पाणी गाळण्यासाठी कापड व वस्तरा या तीन वस्तू होत.   

      *भगवान बुद्धाचा अंत होऊन दोन हजार वर्षे लोटली पण अजूनही हा धर्म जोमाने फोफावतो आहे, त्याला कुणी शास्ता नाही की सर्वाधिकारी नाही.   अंत:काळी भगवंताला त्यांच्या शिष्याने विचारले,  'भगवंत तुम्ही गेल्यानंतर तुमच्या पश्चात या धर्माचे काय होणार ? याला कुणीतरी शास्ता ठेवा'  तेव्हा भगवंताने उत्तर दिले की  "माझ्या गैरहजेरीत धर्म हाच तुमचा शास्ता आहे.   तो जर पाळीत नसाल तर त्याचा काय उपयोग ? विशुद्ध मनाने घेतलेला धर्म हाच तुमचा शास्ता."*

      जगाचा व्यवहार धर्माने चालला आहे.   एखाद्या बाळंत झालेल्या बाईला सांगितले की हे मूल तुझा शत्रू आहे.   तू त्याला दूध पाजू नकोस.   त्यामुळे तू अशक्त होशील, म्हातारी होशील, तुझे सौंदर्य कमी होईल, हे मूल तुला काळ ठरणार आहे.   तर त्या मुलाची आई हे ऐकेल काय ?   ती कितीही दु:ख झाले, आजारी असली तरी मुलाला दूध पाजील.   मुलाचे प्रतिपालन करणे हा तिचा धर्म आहे.   जगाचे सर्व व्यवहार धर्माने चालले आहेत.

      पुण्यातील अर्धपोटी राहून खाना घेऊन (जेवणाचे डबे) जात असतात.   बिरयाणी, पुलाव अशा प्रकारचे जेवण असते.   पण ते लोक कर्तव्य बुद्धीने व प्रामाणिकपणे डबे पोचते करतात.   म्हणून धर्म हा सर्वांनी पाळला पाहिजे.   तो सत् धर्म पाहिजे.   अधर्म नको-तो सुकर्म पाहिजे.   दुष्कर्म नको.

      *धर्मासंबंधी लोकांच्या मनावर किती परिणाम आहे, हे स्वतः जाऊन बघायला पाहिजे.   मी नुकताच ब्रह्मदेशाला जाऊन आलो.   तिकडे काही गोष्टी आश्चर्यकारक आहेत.   तिथे दर्जात कमी अगर जास्त असा भेदभाव नाही.   कोणत्याही प्रकारच्या उच्चनीच भावनेला, वासनेला थारा नाही.   जातीयतेला थारा नाही.   तिथे खरी खरी लोकशाही नांदत आहे.   त्यांची घरे म्हटली म्हणजे टेबल किंवा खाटेसारखी वाटतात.   १५-२० फूट आकाराची.   वरती लाकडे व त्यावर चटया लावलेल्या असतात.   भिंती, विटा, चुना, लोखंड वगैरे पाहिजे तितकी काळजी आपल्याकडे घेतली जाते.   त्यांच्या घराचा दरवाजा चटयांचाच असतो.   लाथ मारली तर ही घरे कोसळून पडतील.*   

      तेथील लोक संध्याकाळी ६ वाजता जेवतात.   संध्याकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत भटकतात.   तेथील चहाची दुकाने बंद झाली की ते चहाचं सामान जेथल्यातेथेच ठेवतात; परंतु सामानाची चोरी होत नाही.   आपल्याकडे सिमेंटमध्ये लोखंड घातलेल्या भिंतीसुद्धा चोर फोडतात. (हंशा)

      दुसरी गोष्ट म्हणजे ब्रह्मी लोक पैसा जपून ठेवत नाहीत.   खायचं व दानधर्म करायचा, हाच पैशाचा उपयोग.  त्यांचा बँकेत पैसा नाही.   *बुद्धाचं सांगणं आहे की काहीच नित्य नाही.*

      मंडाले पर्वतावरील बुद्धाचे मंदीर मी पाहावयास गेलो.   मंदीर बघण्यासाठी मी १,०८० पायऱ्या चढलो.   अर्थात् मनाचा निश्चय म्हणून.   एरव्ही मला चढायला त्रास होतो.   या मंदिरात बुद्धाची १४ फूट उंचीची उभी मूर्ती आहे.   ही संपूर्ण सोन्याची बनविलेली आहे.   तेथेच उंच ठिकाणी एक पागोडा बांधला आहे.   त्यात जवळ जवळ अर्धा कोटी रुपयांचे सोने आहे.   सकाळी ते रात्री ११ वाजेपर्यंत लोक प्रार्थनेला येतात व जातात.   रात्री ११ नंतर तेथे कोणी बसत नाही.   मूर्तीला जवळ जवळ ६०० वर्षे झालीत.   पण कोणीही गुंजभर सोने चोरलेले नाही.   पण आमचे इकडे देवीचे दागिने ब्राह्मण पुजारीच चोरून नेतो.  (हंशा)

      *तेथील लोक खोटे बोलत नाहीत.   चोरी करीत नाहीत.   कारण बुद्ध धर्माची शिकवणच तशी आहे.*   

      *येथे जोपर्यंत हिंदू धर्म आहे तोपर्यंत महारवाडा, मांगवाडा हे राहाणारच.   या धर्माची नीतीच  अशी आहे.  झुणकाभाकरीसारखा कार्यक्रम धर्म व रूढी यात बदल करू शकत नाहीत.   समाजसुधारणेचे घोंगडे पांघरणारे ब्राह्मण, धर्ममार्तंड जोपर्यंत येथे आहेत तोपर्यंत हे असंच चालणार.   झुणकाभाकर, सत्यनारायण करणाऱ्यांनीही बुद्ध धर्मात यावे, असे माझे सांगणे आहे.*   

      *एकदा बुद्धाला विशाखा नावाच्या शिष्याने प्रश्न विचारला की,  'धर्म म्हणजे काय ?'   "मलीन मनाला साफ करणे हाच धर्म होय" असे उत्तर मिळाले.   अस्पृश्यता काही रस्त्यात पडलेला धोंडा नाही, की समाजसुधारकांना बाजूला फेकून देता येईल.   जेव्हा आपला मनोधर्म बदलेल तेव्हाच धर्म बदलेल.*

      *जगात प्रथम धर्माची आवश्यकता खालच्या लोकांना वाटू लागली.   रोमन, इटालियन साम्राज्यात ख्रिस्ती धर्म प्रथम गरीबांनीच स्वीकारला.*   

      *ह्या देशाची संस्कृती एकस्वरूप आहे.   असा विद्वानांचा दावा आहे पण त्यांचा इतिहास खोटा आहे.   येथे संस्कृतीचे दोन प्रवाह सुरू आहेत.   एक ब्राह्मणी धर्म व दुसरा बौद्ध धर्म.   ब्राह्मणी धर्माचं घाण पाणी बुद्ध धर्माच्या स्वच्छ पाण्यात एक झालं.   हिंदू धर्माच्या घाण पाण्याला नाली काढून स्वच्छ पाणी बाजूला काढू या.*

       कृष्णाने गीतेत काय सांगितले आहे ?   मारा, हत्त्या करा.   गरीबांच्या उद्धाराबद्दल काही सांगितले आहे ?   तिचा काही उपयोग नाही.   मी गीतेवर लिहिणार आहे.

      *मी या धर्माची माहिती मिळवण्यासाठी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला आहे.   हा धर्म कसा खालावला याची कारणमीमांसा मी लिहित असलेल्या पुस्तकात करणार आहे.   धर्मांतरासाठी घाई करणार नाही.   आताच तुम्हाला मेंढरासारखा घेऊन जाणार नाही.   त्यासाठी मी एक पुस्तक लिहितोय.*

      *बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्याच्या नियमानुसार वागायला पाहिजे.   तरवारीच्या धारेप्रमाणे आचरण करणारे पाचच अनुयायी जरी मिळाले तरी पुष्कळ झाले !* 

     नंतर श्री. संत गाडगे महाराज व इतरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण केल्यावर सभा विसर्जित झाली.
▪️▪️▪️
-------------------------------------------------------
संदर्भ : *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* 
           *लेखन आणि भाषणे*
           *खंड_१८, भाग_३*
क्रमांक : ३३० (पृष्ठ क्र. ४२५)
-------------------------------------------------------
संकलन :एन.पी.जाधव
        मो. 8793839488

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: