Logo

सळसळत्या पर्वाचा अस्त..!

- 09/02/2023   Thursday   7:45 pm
सळसळत्या पर्वाचा अस्त..!

ज्येष्ठ पत्रकार बबन कांबळे यांचे ८ फेब्रुवारी रोजीअकाली झालेले निधन दुःखद आणि धक्कादायक आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेत फुले-आंबेडकरी जाणीवेचे जे पत्रकारितेचे विश्व आहे त्याची आणि एकूणच पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे.

 एकविसाव्या शतकात प्रवेश करताना फुले- आंबेडकरी चळवळ विलक्षण आवर्तात सापडली होती. सर्वदूर निरुत्साह पसरला होता. राजकारण, समाजकारण, धम्मकारण या आघाड्यांवर अपेक्षित काम होत नव्हते. अशा काळात, म्हणजे २००३ साली, बबन कांबळे यांनी धुरंधर जिद्दीने वृत्तरत्न सम्राट नावाचे दैनिक सुरू केले आणि बघता बघता चळवळीत नवचैतन्य पसरले. उत्साह सळसळू लागला. सम्राटचे नाव गावोगावी ऐकू येऊ लागले. नाक्यानाक्यावरील स्टॉलवर सम्राट दिसू लागला. लोक सम्राट वाचू लागले. इतर पेपर्स काहीशा तटस्थपणे आणि रुक्षपणे वाचले जात. सम्राट वाचला जाई तोच मुळी एका वैचारिक- सांस्कृतिक निष्ठेने. गावात एखाद्या दिवशी सम्राट आला नाही तर लोक अस्वस्थ होत. खास सम्राट मिळविण्यासाठी एस. टी. पकडून परगावी जात. हे चित्र वेगळे होते. पूर्वी कधी असे घडलेले नव्हते. बुद्ध- जिजाऊ- शिवराय- जोतीराव- सावित्रीबाई- शाहू- बाबासाहेब- अण्णाभाऊ यांचा परिवर्तनवादी विचार पायाभूत मानून सुरू झालेली सम्राटची घोडदौड दिवसेंदिवस लोकप्रिय होत गेली. पुरोगामी माणसांना सम्राट वाचणे आवश्यक वाटू लागले. सम्राटमध्ये लेख छापून येणे लेखकांच्या दृष्टीने सन्मानाचे ठरू लागले. एक अभूतपूर्व वातावरण निर्माण झाले.

कुठल्याही चळवळीला वृत्तपत्राची गरज असते. वृत्तपत्र नसेल तर तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते, ही सम्राटची tagline अगदी खरी होती. सम्राटने चळवळीला पंख दिले. सम्राटच्या आगमनापूर्वी थंड पडलेली चळवळ पुन्हा नव्याने झेपावू लागली. सम्राटचे हे यश देदीप्यमान होते. सम्राटच्या याच यशातून प्रेरणा घेत अनेक नवनवी वृत्तपत्रं सुरू झाली आणि तीही जोरात चालली. त्यातली काही अल्पजीवी ठरली, तर काही अद्यापही चालू आहेत. सम्राटची ही कामगिरी लक्षणीय होती. फुले- आंबेडकरी चळवळीत वृत्तपत्रांची आणि नियतकालिकांची मोठी परंपरा होती आणि आहे. परंतु "दैनिक" या स्वरूपात एखादे वृत्तपत्र सलगपणे आणि महाराष्ट्रभर यशस्वी ठरल्याचे उदाहरण नव्हते. ते ऐतिहासिक काम सम्राटने करून दाखविले. याचे सर्व श्रेय अर्थातच संपादक बबन कांबळे यांचे आणि त्यांना तन-मन-धनाची पर्वा न करता साथ देणाऱ्या सहकाऱ्यांचे आहे.

सावित्रीबाई, जिजाबाई, रमाबाई, अहिल्याबाई इत्यादी महान महिलांचा आदर्श समाजासमोर यावा यासाठी बबन कांबळे यांनी सम्राटमधून सतत प्रयत्न केले. सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी आणि स्मृतिदिनी सम्राटचे संग्राह्य ठरावेत असे विशेषांक काढले. घटस्थापना ते दसरा या नऊ दिवसात दररोज एक याप्रमाणे नऊ बहुजन महानायिकांची माहिती सम्राटमध्ये छापली जात असे. नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या नेसण्याचा जो भोंगळ प्रकार हल्ली बोकाळला आहे त्यापासून बहुजन स्त्रियांना-मुलींना परावृत्त करण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न होता. बौद्धधर्मियांनी दैनंदिन आचरणात बावीस प्रतिज्ञा कसोशीने पाळाव्यात, हाही त्यांचा आग्रह असे. त्यासाठी ते सम्राटमधून जोरदार (प्रसंगी कठोर) मोहीम चालवत. त्यांचे अग्रलेख सुस्पष्ट आणि धारदार असत. वंचित- उपेक्षित समाजातील कुणावर अत्याचार झाला की त्यांच्या संपादकीयातून तलवारीचा खणखणाट ऐकायला येत असे. अन्यायपीडितांना न्याय मिळवून दिल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. 

बबन कांबळे यांना "धम्मचळवळ" या विषयात विशेष रूची होती. बहुजनांना बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याची का आवश्यकता आहे, या विषयावर आम्ही २०१२ साली मुंबईत राज्यव्यापी निष्ठांतर परिषद आयोजित केली होती. त्यात हनुमंतराव उपरे, लक्ष्मण माने, एकनाथ आव्हाड असे अनेक दिग्गज उपस्थित राहिले होते. धर्मांतर करू पाहणारे विविध जातीजमातीमधील कार्यकर्ते आणि विचारवंत मोठ्या संख्येने आले होते. प्रभादेवीचे रविंद्र नाट्य मंदिर खचाखच भरले होते. सत्यशोधक चळवळीत आयुष्यभर कार्य केलेल्या भालचंद्र माळी या वयोवृद्ध कार्यकर्त्याच्या हस्ते उदघाटन झालेल्या या परिषदेच्या उदघाटनसत्रात एकनाथ आव्हाड आणि बबन कांबळे यांनी केलेली भाषणं महत्त्वाची होती. बबन कांबळे हे समोरच्या श्रोत्यांशी संवाद साधत प्रभावी पद्धतीने भाषण करत. त्यात विद्वत्तापूर्ण अवघड शब्द नसत. साधी सोपी भाषा. पण त्याचा श्रोत्यांच्या मनावर परिणाम झाल्याशिवाय राहात नसे. रात्री साडेदहा वाजता संपलेल्या या परिषदेच्या समारोपाच्या सत्रात लक्ष्मण माने आणि हनुमंतराव उपरे यांनी केलेली भाषणं विचारांना चालना देणारी होतीच. परंतु तरी बबन कांबळे यांचे भाषण आगळेवेगळे आणि लक्षात राहणारे ठरले. 

सम्राट हा फक्त पेपर नव्हता आणि बबन कांबळे त्याचे फक्त संपादक नव्हते. त्याहूनही ते बरेच काही अधिक होते. हे "अधिक" गेली वीस वर्षे एका सळसळत्या पर्वाच्या रूपाने फुले-आंबेडकरी चळवळीने अनुभवले आहे. मूल्याधिष्ठित पत्रकारिता जगलेल्या या लढवय्या पत्रकाराला अखेरचा क्रांतिकारी जयभीम !!!

संदीप सारंग

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: