Logo

खरंच आपण प्रजासत्ताक भारताचे नागरिक आहोत ? प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल

- 25/01/2022   Wednesday   11:20 pm
खरंच आपण प्रजासत्ताक भारताचे नागरिक आहोत ? प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल

माझ्या देशावर माझं प्रेम आहे...पण ते उफाळून येतं फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला. इतर दिवशी मी प्रजासत्ताक भारतासाठी काय करतो? या प्रश्नाचं उत्तर देशातील अनेक तरुण-तरुणींकडे व नागरिकांकडे नाही.

 स्वतःच्या जगण्यामध्ये देशासाठी जगणं आम्ही विसरुन गेलो आहोत. त्यामुळेच अत्याचार, भ्रष्टाचार अशा विकृतींनी डोकं वर काढलं आहे. देश महासत्ता होण्यासाठी प्रत्येकानंच देशाच्या विकासाचं स्वप्न पाहावं.पण त्याला कृतीची जोड हवी.कृती करण्याची व तितक्याच तत्परतेने कार्य करण्याची जिद्द प्रत्येकात हवी. या प्रजासत्ताकदिनी हीच शपथ घेऊन वाटचाल करण्याची व आत्मपरीक्षण  प्रत्येकांनी करण्याची गरज आहे.

भारत माझा देश आहे, अशी आपण अभिमानाने प्रतिज्ञा म्हणतो. पण आपण आपल्या देशासाठी वैयक्तिक पातळीवर काही प्रयत्न करतो का? असा प्रश्न उभा राहतो. एका बाजूला आपण भारत हा प्रगतीपथावरील देश आहे असं म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला आपण अनेक समस्यांना सामोरं जातोय. त्यातील एक समस्या म्हणजे स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि त्यांना दिली जाणारी वागणूक! देशात अशी खेडी आहेत जेथे स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. शहरी भागातही स्त्रियांवर अनेकप्रकारे अत्याचार होतात. स्त्रियांना अनेक बंधनं लादली जातात. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, मात्र स्त्रियांना या सर्वापासून स्वातंत्र्य कधी मिळणार?

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही आपण अजून विकसनशील देशांच्या यादीतच आहोत.एक विकसीत देश, एक महासत्ता बनण्याचे आपले स्वप्न आहे.स्वप्नं बघावं, मात्र त्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरणव्यासाठी त्याला कर्तृत्वाची जोड देण्याची गरज आहे.आम्हाला अधिकार माहीत आहे ,आम्ही अधिकाराची मागणी करतो,मात्र कर्तव्य विसरतो.  आपण देशातले साधे नियम पाळू शकत नाही. नियम मोडणे हेच आपल्याला स्वातंत्र्य वाटते.देश सध्या कोरोनाच्या तिसऱ्या उंबरठ्यावर आहे.कोरोना नियम पाळण्याचे वारंवार आवाहन करून देखील आम्ही नियम पाळत आहोत काय..? मात्र सर्वसामान्य जनतेस नेते,राजकारणी कोरोना नियमांचे सरळ सरळ उल्लंघण करत आहे.या अंतर्गत कोट्यवधींचा दंड वसूल केला जात आहे.दंड भरू मात्र नियम पाळणार नाही,अशी मानसिकता आमची झालेली आहे.मग असा देश प्रगती करेल काय.? 

इतर विकसित देशांची तुलना करता त्यांचे लष्करी सामर्थ्य, पैसा, पायाभूत सुविधा याचा आपण विचार करतो. पण त्या देशातल्या लोकांची मानसिकता आपण जाणून घेत नाही. ते वाहतुकीचे नियम पाळतात. मग ते नियम मोडणारे पुढारी असो वा सेलिब्रिटी, त्याला शिक्षा होते. ते न चुकता कर भरतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकत नाहीत. स्थानिक प्रशासनाने जी चौकट घातली आहे, ती त्यांना बंधन वाटत नाही. आपण मात्र अगदी याच्या उलटे वागतो. येथे शांतता राखा, असे लिहिले असेल तिथे हमखास कलकलाट असतो, ‘येथे थुंकू नये’ असे लिहिलेल्या पाटीवरच लाल पिचकार्‍यांची रांगोळी असते, ‘नो पार्किंग’ची पाटी असते,  किंवा  'येथे थुंकू नये' ला विद्रुप जरून 'इथे थुंकू का' अस करून टाकतात. ‘कृपया रांगेची शिस्त पाळा’ असे लिहिलेल्या ठिकाणीच झुंबड असते. येथे स्वच्छता राखा, असे लिहिलेल्या पाटीखालीच कचर्‍यांचा डोंगर असतो. एक ना अनेक, म्हणजे नियम हे मोडण्यासाठीच असतात, अशी आपली धारणा असते. या सगळ्यात आजची तरुणाई काही वेगळा विचार करते आहे का? देशावर त्यांचे प्रेम आहे, पण ते फक्त स्वातंत्र्य दिन किंवा २६ जानेवारीलाच उफाळून येते. एरव्ही मी, माझे करिअर, माझी नोकरी, माझी प्रेयसी यातच ही तरुणाई बुडालेली असते. म्हणूनच प्रत्येकाने विचार केला पाहिजे, की मी या देशासाठी काय करतो?

मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आणि आपण ही पद्धती अजूनही टिकवून ठेवली आहे. लोकशाहीने अनेक सुविधा, अधिकार, हक्क आपल्याला दिले आहेत. दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत /राज्य विधानसभा निवडणुकीत मतदारांनी बजाविलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्रात व राज्यात  शासन स्थापन होते. येथे चांगली माणसे/राज्यकर्ते असावेत, असे एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला वाटत असेल, तर कोणतीही सबब न सांगता प्रत्येकाने मतदान करावे.
चांगले राज्यकर्ते निवडून येण्यासाठी आपल्या प्रत्येकाचे एकेक मत महत्त्वाचे आहे. ते देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठीही खूप गरजेचे आहे. त्यामुळे मतदान टाळू नये. मतदानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना देशात कसा बदल हवा आहे, त्यांना कसे राज्यकर्ते हवे आहेत हे कळते. त्या दृष्टीनेही मतदान महत्त्वपूर्ण आहे.
आपण कोण आहोत, आपल्याला जीवनात काय हवे आहे ते ठरविण्यासाठीही मतदानाची मदत होऊशकते, कारण मतदानाच्या माध्यमातून राज्यकर्ते निवडले जातात आणि योग्य व चांगले राज्यकर्ते निवडून दिले तर आपल्याला जे हवे आहे, त्या अपेक्षा ते पूर्ण करू शकतात, पण त्यासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे.
वास्तविक पाहता भारतीय नागरिकांना आपल्या देशाच्या राज्य घटनेची स्थापना झाल्यानंतर वैश्विक मतदानाचा हक्क मिळाला.मात्र देशातील बहुतांश नागरिक मतदान करण्यापासून वंचीत असतात.

एक जबाबदार नागरीक म्हणून मी देशासाठी काय करू शकतो,याची शहानिशा करण्याची गरज आहे.
भारतीय घटनेने प्रत्येक भारतीयाला जसे अधिकार दिले आहेत, तशीच काही कर्तव्ये दिली आहेत.किंबहुना अधिकार आणि  कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.बर्‍याच वेळेला या कर्तव्यांकडे नागरिक दुर्लक्ष करतात. सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे, तिची जपणूक करणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे, याचा नागरिकांना विसर पडतो. परिसर स्वच्छ ठेवणे हीदेखील आपली जबाबदारी आहे, पण कचरा सर्रास रस्त्यावर, स्टेशनवर आपण टाकतो.ज्या बस व रेल्वे मध्ये आपण प्रवास करतो तिथेच घाण करून टाकतो. पान खाऊन चहूकडे थुंकणे तर काहींचा जणू छंदच. आपण इतके बेजबाबदार आहोत, की काही झाले की लगेच या सगळ्यांसाठी राजकीय नेतेच जबाबदार आहेत, असे म्हणून त्यातून अंग काढण्याचा प्रयत्न करतो. राजकारण्यांना प्रश्न विचारण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करण्याची आज खरी गरज आहे. नाले, गटार हे सांडपाणी वाहून नेण्यासाठी असतात, कचरा टाकण्यासाठी नाही, पण तरीही नाल्यांना डम्पिंग ग्राऊंडचे रूप आलेले दिसते. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा टाकावा, अशा सूचना वारंवार पालिकेकडून दिल्या जातात. तरीही हा नियम लोकांनी अक्षरश: पायदळी तुडवतात. वाहतुकीचे नियम जितके आपल्याकडे मोडले जात असतील, तितके क्वचितच इतरत्र मोडले जात असतील. अस्ताव्यस्त पार्किंग करणे, ओव्हरटेक करणे या गोष्टी अगदी छातीठोकपणे आपल्याकडे केल्या जातात. नियम मोडण्यात सुशिक्षित-अशिक्षित दोघेही आघाडीवर. शिकून माणूस सुशिक्षित होतो, पण सुसंस्कृत होत नाही. त्यामुळे नियम पाळण्यासाठी गरज कडक कायद्याची नाही, तर गरज आहे सद्सद्विवेकबुद्धीची. गरज आहे, पालकांनी नियम पाळण्याची आणि मुलांवर उत्तम नागरी संस्कार करण्याची.

९५६१५९४३०६

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: