Logo

पराक्रम दिवस नेताजींचा जन्म दिवस - हिरालाल पगडाल

- 23/01/2022   Sunday   7:47 am
पराक्रम दिवस नेताजींचा जन्म दिवस -  हिरालाल पगडाल

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी तत्कालीन बंगाल प्रांतातील कटक येथे झाला. कटक कसेही वाचा उलटे वाचा सुलटे वाचा ते कटक असेच वाचावे लागते, तसेच

 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाचा कसाही शोध घ्या  तेथे फक्त देशप्रेम  आणि देशप्रेमच सापडते. नेताजींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने २३ जानेवारी हा दिवस 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
      सुभाषबांबूच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस तर आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस सुप्रसिध्द वकील होते, ते कटक महानगरपालिकेत दीर्घकाळ  सदस्य होते, बंगाल विधानसभेचे आमदार होते, इंग्रज सरकारने त्यांना रावबहादूर हा किताब बहाल केला होता. जानकीनाथ आणि प्रभावती यांना एकूण १४ अपत्ये होती( ८मुले आणि ६ मुली)  त्यातील सुभाष नववे ( मुलात ५ वे ) होते.
      सुभाषचंद्र बोस हे लहानपणापासूनच तल्लख बुद्धिमत्तेचे होते. त्यांना लष्करी शिक्षणाची ओढ होती पण तांत्रिक अडचणीमुळे त्यांना  लष्करी शिक्षणासाठी प्रवेश मिळाला नाही. महाविद्यालयात शिकत असतांनाच विद्यार्थी नेता म्हणून सुभाषबाबू प्रकाशझोतात आले होते. स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद घोष हे त्यांचे आदर्श होते. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात त्यांनी असमान्य चमक दाखल्यमुळे सुभाषबाबूंचे वडील जानकीनाथ आणि बंधू शरदबाबू यांनी त्यांना आयसीएस परीक्षेसाठी इंग्लंडला पाठवले. तेथेही सुभाषबाबूंनी आपली चमक दाखवली. १९२० साली ते आयसीएस परीक्षा उत्तीर्ण झाले. पण सुभाषबाबूंना  इंग्रज सरकारची प्रशासकीय सेवा करणे मान्य नव्हते. आपले आदर्श अरविंद घोष आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांशी ती प्रतारणा ठरली असती. त्यांनी ब्रिटिश सरकारची प्रशासकीय सेवा न करण्याचा निर्णय घेतला तसे पत्र त्यांनी आपले बंधू शरदबाबू आणि देशबंधु चित्तरंजन दास यांना पाठवले. आपला राजीनामा मंत्री मांटेंग्यू यांना पाठवून दिला.
          सुभाषबाबूंनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेण्याचा निर्धार केला.    गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी सुभाषबाबूंना महात्मा गांधी यांची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार  २० जुलै १९२१ रोजी सुभाषबाबू मुंबईत महात्मा गांधींना भेटले. ही या दोघांची पहिलीच भेट होती. गांधीजींच्या भेटीने सुभाषबाबू प्रभावित झाले. गांधीजींनी त्यांना कोलकात्यात जाऊन देशबंधु चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सांगितले. त्यानुसार सुभाषबाबूंनी देशबंधूंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी देशात असहकार चळवळ जोरात होती.चोरीचौरा हिंसाचार आणि अग्निकांडामुळे व्यथित होऊन म.गांधींनी ऐन भरात असलेली असहकार चळवळ मागे घेतली. अनेक काँग्रेसच्या नेत्यांना हा निर्णय आवडला नाही. त्यातच १९२२ च्या काँग्रेस अधिवेशनात प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा ठराव संमत झाला. हा निर्णय पं. मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, विठ्ठलभाई पटेल, न.चि.केळकर आदी काँग्रेस नेत्यांना मान्य नव्हता. त्यांनी प्रांतिक निवडणुकीत भाग घेण्यासाठी काँग्रेस अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. देशबंधु अध्यक्ष तर मोतीलालजी सचिव झाले. स्वराज्य पक्षाने कोलकाता महापालिका निवडणुक लढवली आणि जिंकली. देशबंधु कोलकात्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केली. सुभाषबाबूंनी महापालिकेच्या कामात आमूलाग्र बदल घडवून आणला. कोलकात्याच्या सर्व रस्त्यांना त्यांनी देशभक्तांची नावे दिली. स्वातंत्र्य आंदोलनात शहीद झालेल्यांच्या नातेवाईकांना महापालिकेच्या नोकरीत सामावून घेतले. 
          १९२२ मध्ये बंगालमध्ये महापूर आले होते. या महापुराची स्थिती सुभाषबाबूंनी ज्या शिताफीने आणि जबाबदारीने हाताळली त्याने संपूर्ण देश  प्रभावित झाला. सुभाषबाबूंच्या अफाट कार्यशक्तीचे देशाला दर्शन झाले. महात्मा गांधी म्हणाले देशात कुठेही नैसर्गिक संकट आले तर मला सुभाषचीच आठवण येते इतके सुभाषबाबू या कामात वाकबगार होते.
      भारतीय राष्ट्रीय काँगेस मध्ये सुभाषबाबू सक्रिय झाले, पं.जवाहरलाल नेहरू आणि सुभाषबाबू यांनी काँग्रेसमध्ये तरुणांनी सहभागी व्हावे यासाठी इंडिपेंडन्स लीग स्थापन केली. काँग्रेसमधील तरुण वर्गाचे नेतृत्व पं.जवाहरलाल नेहरू आणि सुभाषबाबू यांच्याकडे आले. दोघेही   समाजवादी विचारसरणीचे होते. १९२७ साली भारतात आलेल्या सायमन कमिशनवर काँग्रेसने बहिष्कार टाकला. या आंदोलनात जवाहरलालजी आणि सुभाषबाबूंनी सक्रिय सहभाग घेतला. दोघेही काँग्रेसचे महत्वाचे नेते बनले. दरम्यानच्या काळात दोघांनाही अनेकदा इंग्रजांनी अटक करून तुरुंगात टाकले. 
     काँग्रेसने पं. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारताची भावी राज्यघटना कशी असेल हे ठरवण्यासाठी  घटना समितीची स्थापन केली. त्यात सुभाषबाबू सदस्य होते. या समितीने जो अहवाल सादर केला तो नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.नेहरू रिपोर्ट मध्ये वसाहतीच्या स्वराज्याची (डोमिनीयन स्टेटस) मागणी करण्यात आली होती. त्यासाठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत दिली.
      १९२८ साली काँग्रेसचे अधिवेशन पं. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली कोलकात्यात भरले, या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेशात अध्यक्षांना मानवंदना दिली.     
      काँग्रेसमधील तरुणनेते जवाहरलालजी व सुभाषबाबू यांचा वसाहतीच्या स्वराज्याला विरोध होता. त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि तरुण यांच्यात महात्मा गांधी यांनी मध्यस्थी केली. नेहरू रिपोर्ट नुसार डोमियनन स्टेटस (वसाहतीचे स्वराज्य) साठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत द्यावी.त्या मुदतीत इंग्रजांनी डोमिनीयन स्टेटस न दिल्यास संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात यावी असे ठरले.
         नेहरू आणि सुभाष या तरुण नेत्यांना इंग्रजांनी काहिनाकाही कारणाने अनेकदा तुरुंगात टाकले.१९३० मध्ये सुभाषबाबू तुरुंगात होते त्याच वेळी कोलकाता महानगरपालिका निवडणुका झाल्या, सुभाषबाबू तुरुंगात असतांना कोलकात्याचे महापौर झाले. इंग्रज सरकारला सुभाषबाबूंना तुरूंगातून सोडण्याशिवाय पर्याय नव्हता.
        वसाहतीच्या स्वराज्यासाठी काँग्रेसने इंग्रज सरकारला दिलेली एक वर्षाची मुदत संपली. डिसेंबर १९३० मध्ये काँग्रेसचे अधिवेशन पं. जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले. त्यात पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर झाला. नेहरू,सुभाष यांच्या विचारांचा काँग्रेसने स्वीकार केला. पूर्ण स्वातंत्र्यासाठी सविनय कायदेभंग चळवळ चालू झाली. देशभर २६ जानेवारी हा दिवस स्वराज्याच्या प्रतिज्ञेचा दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरले. २६ जानेवारी १९३१ रोजी सुभाषबाबूंच्या नेतृत्वाखाली कोलकात्यात स्वराज्याचे झेंडावंदन चालू असतांना ब्रिटिश सोजिरांनी अमानुष लाठीहल्ला केला,त्यात सुभाषबाबू घायाळ झाले. देशभर याची तीव्र प्रतिक्रिया उमटली.
       लाहोर कटाच्या आरोपाखाली शहीद भगतसिंग यांना फाशीची सजा सुनावण्यात आली. या शिक्षेविरोधात  देशात असंतोष उफाळून आला. महात्मा गांधींनी भगतसिंग यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत असा आग्रह सुभाषबाबू व इतर कॉंग्रेजनांनी  धरला. त्यानुसार गांधीजींनी प्रयत्नही केले, गांधी आयर्विन यांच्यात मोठा पत्रव्यवहार झाला तो प्रसिध्द झालेला आहे. गांधींजीच्या प्रयत्नानुसार ब्रिटिशांच्या तुरुंगात कैदी असलेल्या ९०००० राजकैद्यांची सरकारने सुटका केली पण भगतसिंग यांच्या सुटकेची मागणी सरकारने मान्य केली नाही कारण सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, आयसीएस लॉबी भगतसिंग यांच्या शिक्षेबाबत जास्त  आग्रही होती. २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना इंग्रज सरकारने फाशी दिली. देशभर आगडोंब उसळला. सुभाषबाबू देखील व्यथित झाले, महात्मा गांधींनी शिष्टाई सफल झाली नाही या बद्दल सुभाषबाबूंनी जाहीर नाराजी प्रकट केली.
     १९३२ मध्ये सुभाषबाबूंना पुन्हा अटक झाली, यावेळी त्यांना अल्मोडाच्या तुरुंगात ठेवले होते, तेथे त्यांची तब्येत बिघडली. ब्रिटिश सरकारने उपचारासाठी त्यांची रवानगी युरोपात केली. १९३३ ते १९३६ या काळात सुभाषबाबू युरोपातच होते. त्याकाळात त्यांची इटलीचा फॅसिस्ट हुकूमशहा मुसोलिनी बरोबर चर्चा झाली, मुसोलिनीकडून त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला मदत करण्याचे आश्वासन मिळवले. आयर्लंडचे नेते डी. विलेरा यांच्याशी त्यांची भेट झाली. विठ्ठलभाई पटेल आणि त्यांची इंग्लंडमध्येच भेट झाली. दोघांनी एक संयुक्त निवेदन प्रसिध्दीस दिले. त्यात महात्माजींचे काही विचार  आपल्याला मान्य नाहीत हे स्पष्ट केले होते. विठ्ठलभाई पटेल आजारी होते, सुभाषबाबूंनी त्यांची तेथे शुश्रूषा केली. त्याने विठ्ठलभाई इतके प्रभावित झाले की, त्यांनी आपल्या मृत्युपत्रात सर्व संपत्ती सुभाषबाबूंना द्यावी असे लिहिले होते. विठ्ठलभाई पटेलांचे   निधन झाले. त्यांचे बंधु सरदार वल्लभभाई पटेल यांनी या मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान दिले. सरदारांनी विठ्ठलभाई पटेल यांची सर्व संपत्ती हरिजन सेवक संघास दान केली. 
     सुभाषबाबू युरोपात असतांनाच त्यांची एमिली शेंकल यांच्याशी मैत्री झाली.पुढे त्यांनी एकमेकांशी विवाह केला,त्यावेळी ही बाब सार्वजनिक झाली नव्हती पण १९९३ मध्ये  त्यांची मुलगी अनिता बोस फाफ हिने या विवाहाची सार्वजनिक वाच्यता केली.त्याला बोस कुटुंब आणि भारतीयांनी मान्यता दिली.
     सुभाषबाबू भारतात आल्यांवर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून दिले. १९३८ मध्ये काँग्रेसचे ५१ वे अधिवेशन हरिपुरा येथे झाले. या अधिवेशनच्या अध्यक्षपदासाठी महात्मा गांधींनी सुभाषबाबूंच्या नावाचा आग्रह धरला. सुभाषबाबू हरिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांचे अध्यक्षीय भाषण खूपच प्रभावी झाले. बंगलोरला त्यांनी विश्वेश्वरय्या सायन्स काँग्रेसची स्थापना केली. चीन जपान युध्दात चिनी सैनिकांची शुश्रूषा करण्यासाठी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे एक वैद्यकीय पथक चीनला पाठवले.
      १९३९ च्या त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनापूर्वी सुभाषबाबू आणि महात्मा गांधी यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. सुभाषबाबू लोकशाही विरोधी शक्ती बरोबर मैत्री करण्याच्या बाजूने होते तर महात्माजींचा  त्याला सक्त विरोध होता. दोघात वैचारिक मतभेद झाले. या पार्श्वभूमीवर त्रिपुरी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुभाषबाबू निवडून आले, त्यांनी महात्माजींनी पाठिंबा दिलेले पट्टाभी सितारामय्या यांचा पराभव केला. गांधीजींनी हा पराभव स्वीकारला आणि कॉंग्रेसपासून अलिप्त  राहण्याचे जाहीर केले.सुभाषबाबू निवडून आले आहेत त्यांनी त्यांच्या मतानुसार काँग्रेस चालवावी अशी भूमिका घेतली. त्यामुळे काँग्रेस वर्कींग कमिटीतील दोन वगळता इतर सदस्यांनी वर्कींग कमिटीचे राजीनामे दिले. सुभाषबाबू यांच्यापुढे मोठा पेच उभा राहिला. त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला.
           यानंतर जगावर दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमा व्हायला सुरुवात झाली. इटलीचा फॅसिस्ट हुकूमशहा मुसोलिनी, जर्मनीचा हुकूमशहा हिटलर आदी हुकूमशाही राष्ट्रे विरुध्द इंग्लंड ,फ्रांस आदी लोकशाहीवादी राष्ट्रे असे जागतिक ध्रुवीकरण होत आले होते. महात्मा गांधी आणि काँग्रेस यांनी लोकशाही तत्व महत्वाचे मानले.त्यांनी हुकूमशाही राष्ट्रांना मदत न करण्याचे धोरण घेतले. महात्मा गांधींचा साधनसुचितेवर विश्वास होता. चांगल्या गोष्टींच्या प्राप्तीसाठी वाईटगोष्टींची मदत घेणे चूक आहे,अंतिमतः त्यातून वाईटच निर्माण होते अशी म. गांधींची भूमिका होती.    
दुसरे महायुध्द सुरू होताच सुभाषबाबूंनी  शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, इंग्रज आता अडचणीत आहेत, त्यांचा निर्णायक पराभव करण्याची हीच वेळ आहे त्यासाठी इंग्रजांच्या शत्रूंची मदत घेतली पाहिजे अशी भूमिका जाहीर केली. सुभाषबाबूंच्या फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाने युध्द प्रयत्नात उघडपणे ब्रिटिशविरोधी भूमिका घेतली. इंग्रजांनी सुभाषबाबूंना त्यांच्या राहत्या घरी नजर कैदेत ठेवले. सुभाषबाबूंनी १६ जानेवारी १९४१ रोजी पठाणाचा  वेष परिधान करून पोलिसांना चकवा दिला. ते पेशावर मार्गे काबुलला गेले. तेथे इटलीच्या दूतावासात त्यांनी आश्रय घेतला. तेथून ते रशिया मार्गे जर्मनीला पोहोचले. हिटलरची भेट घेतली. हिटलरने अपेक्षित मदत न केल्याने त्यांनी पाणबुडीद्वारे जपानला जाण्याचा साहसी निर्णय घेतला. जपानने सुभाषबाबूंना सन्मानाची वागणूक दिली.जपानी पंतप्रधान हिदेकी तोजो  यांनी  नेताजींना सर्वप्रकारचे सहकार्य देऊ केले.
   थोर क्रांतिकारक रास बिहारी घोष यांनी जपानच्या ताब्यातील भारतीय युद्धकैदी सोडवून घेऊन त्यांच्या साहाय्याने स्वतंत्रता भारत परिषद स्थापन केली होती.सुभाषबाबू पूर्व आशियात पोहोचताच रासबिहारी बाबूंनी सुभाषबाबूंना या फौजेचे नेतृत्व करण्याची विनंती केली.
     ५जुलै १९४३ रोजी सिंगापूरच्या टॉवून हॉल मध्ये त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली, ते स्वतः या सेनेचे सुप्रीम कमांडर बनले. त्यांनी चलो दिल्लीचा नारा दिला, जयहिंद चा पुकारा केला. ते आपल्या भाषणात म्हणाले " तुम मुझे खून दो, मै तूमे आझादी दूगा".
त्यानंतर त्यांनी जपानी बर्मा,कोहिमा, इंफालवर हल्ला केला. जपानच्या मदतीने अंदमान आणि निकोबार ही बेट ताब्यात घेतली त्यांना शहीद आणि स्वराज्य अशी नावे दिली.
    २१ ऑक्टोबर १९४३ रोजी त्यांनी सिंगापूरमधून स्वतंत्र आझाद हिंद सरकारची घोषणा केली स्वतः त्या सरकारचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि युध्दमंत्री बनले. या सरकारला जपान, इटली, जर्मनी, फिलिपाईन्स, कोरिया, आयर्लंड,चीन,मंचौको आदी अकरा राष्ट्रांनी मान्यता दिली. कॅप्टन लक्ष्मी यांच्या नेतृत्वाखाली महिलांची स्वतंत्र 'झाशी राणी रेजिमेंट' बनवली. आझाद हिंद सेनेच्या एका तुकडीचे नाव 'गांधी ब्रिगेड' होते.
      ४ एप्रिल १९४४  ते  २२ जून १९४४ या काळात आझाद हिंद सेनेने इंग्रजांशी पुन्हा एकदा तुंबळ युध्द केले. सुरुवातीला आझाद हिंद सेनेची सरशी होत होती परंतु युध्दाची जागतिक स्थिती बदलली जपानी सैन्याने माघार घेतल्यामुळे आझाद हिंद सेनेलाही माघार घ्यावी लागली.
    ६ जुलै १९४४ रोजी नेताजींनी रंगून रेडिओ वरून भारतीयांना उद्देशून भाषण केले. त्यात महात्मा गांधींचा उल्लेख 'राष्ट्रपिता' असा केला. आणि या युद्धात यशस्वी होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले तसेच आशिर्वाद मागितला. गांधीजींनी सुभाषबाबूंना 'नेताजी' म्हणून संबोधले.
     दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांची सरशी झाली. मुसोलिनी पळून गेला, हिटलरने आत्महत्या केली.अनेक राष्ट्रांनी माघार घेतली अशावेळी रशियाची मदत घेण्यासाठी १८ ऑगस्ट१९४५ ला नेताजी विमानाने फारमोसाकडे निघाले. त्यानंतर त्यांचे काय झाले याबाबत संदिग्धता कायम आहे. एक खरे आहे की, त्या नंतर ते कुणाच्याही नजरेला पडले नाही. जपान सरकारने मात्र सुभाषबाबू विमान अपघातात सापडले, त्यात ते जखमी झाले. त्यांचे शरीर मोठ्या प्रमाणात जळालेले होते, जपानच्या दवाखान्यात त्यांचे निधन झाले अशी बातमी दिली. त्यांनी त्यांची रक्षा देखील जपून ठेवली आहे, परंतु बोस कुटुंब विमान अपघातात सुभाषबाबूंचे निधन झाले ही वार्ता मान्य करण्यास तयार नाही. परंतु जपानमध्ये आजही १८ ऑगस्ट हा दिवस सुभाषबाबूंचा स्मृतीदिन शहिद दिन म्हणून साजरा होतो.
       येथील सनातन विचारांच्या काही मंडळींनी सुभाषबाबूंच्या मृत्यू बाबत भारत सरकारवर विशेषतः नेहरूंवर आधारहीन आरोप केले. भारताचे विद्यमान पंतप्रधान मोदी यांनी २०१४ साली सुभाषबाबूंशी संबंधित सर्व कागदपत्रे सार्वजनिक केली आणि ती कागदपत्रे पाहिल्यावर सुभाषबाबूंच्या मृत्यूशी निगडित नेहरू आणि काँग्रेसवर जे आरोप केले होते ते सर्व खोटे ठरले.
     सुभाषबाबू आणि जवाहरलाल हे महात्मा गांधीजींचे स्वातंत्र्यलढ्यातील दोन हात होते. दोघांचेही गांधीजींवर निरतिशय प्रेम होते. दुर्दैवाने सुभाषबाबू स्वातंत्र्याची रम्य पहाट पहायला उपस्थित नव्हते पण जो पर्यंत आकाशात सूर्य चंद्र आहे तो पर्यंत सुभाषचंद्र नाव अमर आहे.
       सुभाषबाबूंना त्यांच्या १२५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. हा दिवस पराक्रम दिवस आहे.आजच्या दिवशी सुभाषबाबूंच्या पराक्रमाचे स्मरण करू या.
- - हिरालाल पगडाल, संगमनेर
-     ९८५०१३०६२१

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: