Logo

प्रगल्भ लोकशाहीसाठी प्रत्येकाने मदतानाचा हक्क बजाविलाच पाहिजे- प्रा डॉ सुधीर अग्रवाल

- 25/01/2022   Tuesday   5:33 pm
प्रगल्भ लोकशाहीसाठी प्रत्येकाने मदतानाचा हक्क बजाविलाच पाहिजे- प्रा डॉ सुधीर अग्रवाल

गेल्या दोन दशकात देशातील साक्षरता मोठ्या प्रमाणावर वाढली. मात्र, मतदारांचा निवडणुकीतील आणि मतदानातील घटता सहभाग चिंता निर्माण करणारा ठरत आहे.

या पार्श्वभमिवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग प्रत्येक वर्षी  गांभिर्याने विचार करत नवनवीन संकल्पना राबवित आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सरकारी यंत्रणा विविध स्तरावरून प्रयत्न करीत आहे. शाळांच्या माध्यमातून पालकांना निवडणुकीत मतदान करणारे आवाहन पत्रे पाठवली गेली जात आहेत. तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदानासाठी नावे नोंदवून मतदान करण्याबाबत महाविद्यालयीन स्तरावर प्रतिज्ञा घेतल्या गेल्या आहेत.

निवडणूक आयोगाने २५ जानेवारी २०११ रोजी राष्ट्रीय मतदार दिवसाचा प्रारंभ केला.  निवडणूक आयोगाची मतदार दिवसानिमित्त यंदाची थीम (मध्यवर्ती कल्पना) ‘लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता’  महिला, युवक, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि दुर्लक्षित घटकांवर आयोग लक्ष केंद्रित करत मतदारांना जागृत करत आहे

मतदान ही लोकशाहीतील अत्यंत आवश्‍यक प्रक्रिया आहे. मी एकट्याने मतदान केल्याने काय फरक पडणार ही प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. मतदार नोंदणीवरही त्याचा परिणाम दिसतो. असे असले तरीही प्रगल्भ लोकशाहीसाठी प्रत्येकाने मदतानाचा हक्क बजाविलाच पाहिजे. 

आपल्याकडे स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट) व प्रजासत्ताकदिन (२६ जानेवारी) या दोन्ही दिवशी प्रत्येकाच्या अंगात देशसेवा, राष्ट्रभक्ती, देशाबद्दल प्रेमाची भावना उफाळून येते; मात्र त्यानंतर देशाबद्दल फार आस्था दिसत नाही. लोकशाही ही शेवटच्या वर्गापर्यंत झिरपली पाहिजे, यासाठी प्रत्येक भारतीयाने सजगपणे लोकशाही मूल्य रुजविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या मताला एकच किंमत आहे. 
अगदी करोडपती आणि शेवटच्या घटकातील अशा दोन्ही वर्गांतील व्यक्तीच्या मताची एकच किंमत आहे. म्हणूनच प्रत्येकाने मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य मानले पाहिजे. मतदान करणे हा खरं तर देशसेवेचाच एक भाग आहे. लोकशाही सुदृढ व सक्षम असेल, तर देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, विकासाला गती मिळते. 

 निवडणुकांच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर मतदान नोंदणी करून घेणे आवश्‍यक आहे. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक तरुण-तरुणीने मतदार नोंदणी करून घेतलीच पाहिजे आणि न चुकता मतदानाचाही हक्क बजाविलाच पाहिजे. 
 
मतदानानिमित्त सुटी आहे म्हणून या सुटीचा आनंद उपभोगण्यासाठी सहलीचा बेत काढणार असाल तोच खरा देशद्रोह ठरू शकतो. मतदान न करणे आणि पुढची पाच वर्षे ओरडत राहणे हा नाकर्तेपणाच आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान कसे करता येईल यासाठी प्लॅनिंग करा, संपूर्ण कुटुंबीयांना सोबत घेऊन मतदानाचा हक्क बजाविण्याची गरज आहे. विशेष म्हणजे घरातील तरुण मंडळींनी यासाठी पुढाकार घेऊन मतदान करून घेणे आवश्‍यक आहे.

राष्ट्रीय मतदार दिन म्हणजे लोकशाहीला बळकट करणारा दिवस. प्रत्येक व्यक्तीने आपला मतदान करण्याचा अधिकार हा वापरलाच पाहिजे. हल्ली राजकीय, तसेच सामाजिक अनास्थेमुळे मतदान न करण्याकडे जनतेचा कौल दिसतो; पण ही उदासीनता झटकून मतदानाचा हक्क बजावूनच आपण सत्तांतर करू शकतो. सजग नागरिकांनो, जागे व्हा आणि आपला मतदानाचा हक्क जरूर बजावा.हे नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे.

९५६१५९४३०६

Leave a Comment

Name:
Email:
Mobile No.:
Subject:
Comment: